श्लोक १ ते १०
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्वैव किमकुर्वत संजय ॥१॥
पुसे धृतराष्ट्र । संजयालागोनि । मोहित होवोनि । पुत्र -प्रेमें ॥१५१॥
म्हणे सांगें मज । जें का धर्मालय । तेथें झालें काय । कुरु -क्षेत्रीं ॥१५२॥
जेथें ते पांडव । आणि माझे पुत्र । मिळाले एकत्र । युद्धालागीं ॥१५३॥
एवढया वेळांत । परस्परें त्यांनीं । काय केलें झणीं । सांगें मज ॥१५४॥
संजय उवाच
दृष्टाव तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥२॥
तिये वेळीं काय । संजय तो बोले । सैन्य उफाळलें । पांडवांचें ॥१५५॥
कल्पांताच्या वेळीं । कृतांताचें मुख । पसरावें देख । जैशा रीती ॥१५६॥
तैसें तें घनदाट । उठे एकवाट । जणूं काळकूट । उसळलें ॥१५७॥
किंवा वडवाग्नि । पेटे अकस्मात । भेटे महा -वात । तों चि त्यासी ॥१५८॥
मग त्याच्या ज्वाला । शोषोनि सागरा । झोंबाव्या अंबरा । जैशा रीती ॥१५९॥
तैसा दळ -भार । पाहतां दुर्धर । भासला भेसूर । तिये काळीं ॥१६०॥
ठाकतां सामोरा । हत्तींचा मेळावा । जैसा उपेक्षावा । सिंहराजें ॥१६१॥
तैसा नाना व्यूहीं । कोशल्यें रचिला । तुच्छ तो लेखिला । दुर्योधनें ॥१६२॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥
राजा दुर्योधन । मग द्रोणापासीं । येवोनि तयासी । काय बोले ॥१६३॥
म्हणे देखिलें का । कैसें उभारलें । सैन्य उसळलें । पांडवांचें ॥१६४॥
वाटे गिरि -दुर्ग । जणूं ते चालते । रचिले भोंवते । नाना व्यूह ॥१६५॥
राजा द्रुपदाचा । पुत्र धृष्टद्युम्न । ज्यासी विद्या -दान । केलें तुम्हीं ॥१६६॥
तुमचा जो तज्ञ । शिष्य असामान्य । तेणें चि हें सैन्य । उभारिलें ॥१६७॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्व द्रुपदश्व महारथः ॥४॥
तैसें चि विशेष । शस्त्रास्त्रीं प्रवीण । वीर जे निपुण । क्षात्र -धर्मीं ॥१६८॥
सामर्थ्य योग्यता । तेविं पराक्रम । भीमार्जुनांसम । असे ज्यांचा ॥१६९॥
तयांची हि नांवें । कौतुकें साचार । प्रसंगानुसार । सांगतों मी ॥१७०॥
महायोद्धा येथें । सात्यकी विराट । महारथी श्रेष्ठ । द्रुपद हि ॥१७१॥
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्व वीर्यवान ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्व नर पुङ्गवः ॥५॥
युधामन्युश्व विक्रान्त उत्तमौजाश्व वीर्यवान ।
सौभद्रो द्रौपदेयाश्व सर्व एव महारथाः ॥६॥
शूर चेकितान । आणि काशिराजा । वीर उत्तमौजा । धृष्टकेतु ॥१७२॥
शैब्यराजा तैसा । युधामन्यु पाहें । येथें आला आहे । कुंतिभोज ॥१७३॥
पुरुजितादिक । सकळ हे राजे । देखा हा विराजे । अभिमन्यु ॥१७४॥
जो प्रतिअर्जुन । सुभद्रेचा प्राण । द्रौपदी -नंदन । आणिक हि ॥१७५॥
ऐसे हे सकळ । महा -रथी वीर । असंख्य अपार । आले येथें ॥१७६॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥
भवान्भीष्मश्व कर्णश्व कृपश्व समितिंजयः ।
अश्वत्थामा विकर्णश्व सौमदत्तिस्तथैव च ॥८॥
आतां आमुचिया । सैन्याचे नायक । प्रख्यात सैनिक । भूमंडळीं ॥१७७॥
प्रसंगें तयांचें । करितों वर्णन । कळावें म्हणोन । तुम्हांलागीं ॥१७८॥
सांगतों त्यांतील । मुख्य पांच सात । तुम्ही आधीं ज्यांत । नामवंत ॥१७९॥
तेजोनिधि जणूं । प्रतापाचा सूर्य । देखा भीष्माचार्य । गंगा -पुत्र ॥१८०॥
रिपु -मतंगजा । जो का पंचानन । शौर्यशाली कर्ण । तो हा येथें ॥१८१॥
एकला ह्यांतील । विश्व हि निर्मील । किंवा संहारील । मनोमात्रें ॥१८२॥
थोर धनुर्धर । येथें कृपाचार्य । पुरे ना हा काय । एकला चि ॥१८३॥
विकर्ण हा वीर । येथें अलीकडे । देखा पलीकडे । अश्वत्थामा ॥१८४॥
ज्याचें सदा वाटे । काळातें हि भय । तेविं समितिंजय । सौमदत्ति ॥१८५॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥९॥
बहु आणिक हि । वीर जे सकळ । नेणे ज्यांचें बळ । विधाता हि ॥१८६॥
शस्त्रविद्येमाजीं । होती पारंगत । जे का मूर्तिमंत । मंत्रविद्या ॥१८७॥
सर्व अस्त्रें झालीं । जेथोनियां रुढ । वीर जे अजोड । जगामाजीं ॥१८८॥
पराक्रमी पूर्ण । अर्पावया प्राण । सिद्ध प्रतिक्षण । माझ्यासाठीं ॥१८९॥
पतिव्रतेचा तों । पतिपायीं भाव । तैसें मी सर्वस्व । वीरांसी ह्या ॥१९०॥
आपुलें जीवित । लेखिती थोकडें । जे का कार्यापुढें । आमुचिया ॥१९१॥
ऐसे स्वामीभक्त । निःसीम उत्तम । युद्धकला -मर्म । जाणती जे ॥१९२॥
कलेसी कीर्तीसा । होती जे जीवन । जन्मला जेथून । क्षात्रधर्म ॥१९३॥
सर्वागें संपूर्ण । ऐसे असंख्यात । आमुच्या सैन्यांत । वीर येथें ॥१९४॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥१०॥
सर्व हि क्षत्रियां । माजीं जो वरिष्ठ । जगीं योद्धा श्रेष्ठ । भीष्माचार्य ॥१९५॥
तयालागीं मुख्य । सेनापति केलें । अधिकार दिले । सर्व हि ते ॥१९६॥
आपुल्या सामर्थ्ये । आवरोनि सेना । उभारी हा नाना । दुर्ग जैसे ॥१९७॥
ह्याजपुढें काय । त्रैलोक्याचा पाड । मज हें उघड । दिसे येथें ॥१९८॥
समुद्र तों पाहें । आधीं चि दुस्तर । वडवाग्नि भर । देई त्यासी ॥१९९॥
किंवा काळाग्नीतें । मिळे महा -वात । तैसा गंगा -सुत । सेनापति ॥२००॥
ऐशा ह्या सैन्याशीं । झुंजवेल कोणा । पांडवांची सेना । दिसे थोडी ॥२०१॥
आडदाडं भीम । पहा सेना -नाथ । बोलोनि हें स्वस्थ । राहिला तो ॥२०२॥