Get it on Google Play
Download on the App Store

आरंभ

आत्मरुपा तुज । करीं नमस्कार । तुझा जयजयकार । असो देवा ॥१॥
ॐकारस्वरुपा । तूं चि सर्वा मूळ । व्यापोनि सकळ । राहिलासी ॥२॥
सर्व सर्वातीत । तूं चि सर्वात्मक । विषय तूं एक । वेदांलागीं ॥३॥
‘नेति नेति’ ऐसें । बोलती ते वेद । स्वरुप अगाध । तुझें देवा ॥४॥
जाणावयाजोगा । आपणा आपण । म्हणोनियां मौन । वेदांसी हि ॥५॥
आत्मरुपा देवा । तूं चि गणाधीश । बुद्धीचा प्रकाश । सकलांच्या ॥६॥
आतां ऐका ऐसें । म्हणे श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ज्ञानदेव ॥७॥
पूर्ण शब्दब्रह्म । गणेशासी मूर्ति । सजलीसे किती । मनोरम ॥८॥
वर्णरुप शोभे । शरीर निर्मळ । सौंदर्य सोज्ज्वळ । खुले तेथें ॥९॥
कैसी रसपूर्ण । देहाची ठेवण । प्रकटली खाण । लावण्याची ॥१०॥
वेगळाल्या स्मृती । ते चि अवयव । सौंदर्याची ठेव । अर्थ-शोभा ॥११॥
अठरा पुराणें । शोभती साचार । जणूं अलंकार । रत्नमय ॥१२॥
वेंचोनियां नाना । प्रमेयांचे मणी । पद्याचे कोंदणीं । बैसविलें ॥१३॥
सहज सुंदर । शब्दांची रचना । वस्त्र तें चि जाणा । रंगदार ॥१४॥
साहित्याचा धागा । नाजूक अत्यंत । दिसे ओतप्रोत । झळाळत ॥१५॥
काव्य-नाटकें तीं । जणूं घागर्‍या च । ऐसें वाटे साच । निर्धारितां ॥१६॥
आणि अर्थ-ध्वनि । करी रुणझुण । हालतां चरण । गणेशाचे ॥१७॥
नाना प्रमेयांची । चातुर्ये गुंफण । करोनि पैंजण । घडिलासे ॥१८॥
योग्य पदें हींच । तेथ रत्नें भलीं । जरी विलोकिलीं । सूक्ष्मदृष्टी ॥१९॥
व्यासादिक कवि- । श्रेष्ठांची जी मति । तो चि शेला कटीं । शोभतसे ॥२०॥
नितांत निर्मळ । तयाचे पदर । झळकती सुंदर । अग्रभागीं ॥२१॥
सहा शास्त्रें तीच । भुजांची आकृति । वेगळाले देती । अभिप्राय ॥२२॥
म्हणोनिया हातीं । आयुधें हि भिन्न । दाखवाया खूण । आपुलाली ॥२३॥
तर्क तो परश । न्याय तो अंकुश । मोदक सुरस । वेदात्नाचा ॥२४॥
बौद्ध-वार्तिकांचें । जें का बौद्धमत । तो चि छिन्न दंत । योगाहातीं ॥२५॥
मग सांख्यमत । तो चि पद्महस्त । स्वभावें जो देत । वर-दान ॥२६॥
धर्मसूत्रें जीं का । धर्मसिद्धिप्रद । तो चि येथें सिद्ध । अभयहस्त ॥२७॥
निर्मळ विवेक । सरळ ती सोंड । जेथें महानंद । स्व-सुखाचा ॥२८॥
संवाद तो दंत । दुजा शोभे संगें । समत्वाच्या योगें । शुभ्रवर्ण ॥२९॥
ज्ञानरुप भले । पहा सूक्ष्म डोळे । शोभती आगळे । विघ्नेशाचे ॥३०॥
दोन हि मीमांसा । ते चि दोन्ही कान । ऐसें माझें मन । सांगे मज ॥३१॥
गंडस्थलांतून । स्वभावें संतत । बोधमदामृत । पाझरे जें ॥३२॥
तेथें मुनिजन । होवोनि भ्रमर । जाहले अमर । सेवितां तें ॥३३॥
मर्ते द्वैताद्वैत । पावती ऐक्यातें । तुल्यबलें तेथें । गंडस्थलीं ॥३४॥
नाना तत्त्वार्थाचीं । सतेज पोंवळीं । कैसीं विराजलीं । गजाननीं ॥३५॥
दशोपनिषदें । पुष्पें सुगंधित । नित्य उधळीत । ज्ञान-रेणू॥३६॥
सहज सुंदर । मनोरम अति । शोभती मुकुटीं । पहा कैसीं ॥३७॥
अकार पाउलें । उकार उदर । दिसे मनोहर । विशालत्वें ॥३८॥
मकार तो महा-। मंडलासारिखा आकार आलेखा । मस्तकाचा ॥३९॥
अ उ म हे तिन्ही । होतां एकवट । ॐकार प्रकत । दिसूम लागे ॥४०॥
गुरुकृपें आदि- । बीज तें वंदिलें । जेथ सामावलें । शब्द-ब्रह्म ॥४१॥
आतां वंदितसें । देव शारदेस जिचा वाग्विलास । नित्य नवा ॥४२॥
चातुर्य-वागर्थ-। कलेची स्वामिनी । विश्वासी मोहिनी । घालिते जी ॥४३॥
भवार्णवीं जेणें । तारियलें मज । तो श्रीगुरुराज । हृदयीं माझ्या ॥४४॥
म्हणोनियां प्रेम । वाटतसे फार । मज सारासार- । विचाराचें ॥४५॥
पायाळूच्या डोळां । घालितां अंजन । पाहूं शके धन । भूमिगत ॥४६॥
किंवा चिंतामणि । होतां हस्तगत । सर्व मनोरथ । सदा पूर्ण ॥४७॥
ज्ञानदेव म्हणे । तैसा पूर्णकाम । झालों घेतां नाम । जाणत्यानें ॥४८॥
म्हणोनियां भावें । गुरु-नाम घ्यावें । कृतकृत्य व्हावें । जाणत्यानें ॥४९॥
वृक्षाचिया मूळीं । घालितां उदक । देखा शाखादिक । संतोषती ॥५०॥
किंवा भावें होतां । सागरीं सुस्नात । जैसीं घडतात । सर्व तीर्थे ॥५१॥
अमृताची गोडी । चाखिली जयानें । सेविले तयानें । सर्व रस ॥५२॥
तैसा भक्तिभावें । मियां वारंवार । केला नमस्कार । श्रीगुरुसी ॥५३।
इच्छावें जें मनें । तें तें यथारुचि । पुरविता तो चि । म्हणोनियां ॥५४॥
आतां सावधान । ऐका श्रोतेजन । कथा जी गहन । भारताची ॥५५॥
विवेक-वृक्षांचे । अपूर्व उद्यान । कौतुकांची खाण । सकल हि ॥५६॥
सर्व सुखांचे जी । असे जन्म-स्थान । कीं महा-निधान । प्रमेयांचें ॥५७॥
नऊ हि रसांचा । परिपूर्ण देखा । सुधा-सिंधु जी का । रसाळत्वें ॥५८॥
सर्व विद्यांचें जी । असे मूळस्थान । मोक्षाचें निधान । प्रकटलें ॥५९॥
किंवा जी का सर्व । शास्त्रांची आधार । धर्माचें माहेर । सकलहि ॥६०॥
शारदेच्या शोभा- । रत्नांचे भांडार । नातरी जिव्हार । सज्जनांचें ॥६१॥
किंवा महाबुद्धी । माजीं व्यासांचिया । देखा स्फुरोनियां । सरस्वती ॥६२॥
त्रिलोकामाझारीं । जाहली प्रकट । ऐशा सर्वश्रेष्ठ । कथारुपें ॥६३॥
काव्यराज नांव । म्हणोनि ह्या ग्रंथा । रसां रसाळता । येथोनी च ॥६४॥
पावली शब्दश्रे । येथें सत्‍-शास्त्रता । वाढली मृदुता । महा-बोधीं ॥६५॥
चातुर्य तें येथें । शाहणें जाहलें । प्रमेय नटलें । गोडपणें ॥६६॥
सुखाचें सौभाग्य । पोसलें ह्या ठायीं । थोरपणा येई । उचितासी ॥६७॥
येथें माधुरीसी । आली मधुरता । तेविं सुरेखता । शृंगारासी ॥६८॥
कलेसी कौशल्य । प्राप्त झालें भलें । पुण्या तेज आलें । आगळें चि ॥६९॥
जनमेजयाचे । म्हणोनि निःशेष । हारपले दोष । अनायासें ॥७०॥
पाहतां क्षणैक । रंगासी आगळें । तेज तें चढलें । सुरंगाचें ॥७१॥
तेविं येथोनी च । थोर भलेपणा । लाधलासे जाणा । सद्‌गुणांसी ॥७२॥
उजळे त्रैलोक्य । सूर्य-प्रकाशांत । व्यास-मति-व्याप्त । विश्व तैसें ॥७३॥
चोखाळोनि भूमि । पेरियलें बीज । विस्तारें सहज । जैशा रीती ॥७४॥
यथारुचि तैसे । स्वभावें सर्वार्थ । झाले प्रफुल्लित । भारतीं ह्या ॥७५॥
किंवा नगरांत । रहावया जावें । मग सभ्य व्हावें । जिया परी ॥७६॥
तैसें व्यासोक्तीचें । तेज प्रकटलें । तेणें उजळलें । सर्व कांहीं ॥७७॥
तारुण्यीं बहर । दिसे आगळाच । स्त्रियांअंगीं साच । सौंदर्याचा ॥७८॥
ना तरी वसंतीं । प्रकटतें ठेव । उद्यानीं अपूर्व । वनश्रीची ॥७९॥
नाना अलंकारीं । नटोनि सुवर्ण । दावी बरवेपण । आगळें चि ॥८०॥
तैसें व्यासोक्तीनें । होतां अलंकृत । होय शोभा प्राप्त । कोणातें हि ॥८१॥
म्हणोनिया वाटे । इतिहासें काय । घेतला आश्रय । भारताचा! ॥८२॥
प्रतिष्ठा संपूर्ण । लाभावी म्हणोन । अंगीं लीनपण । धरोनियां ॥८३॥
अठरा हि पुराणें । आख्यानांचे द्वारा । येथें आलीं घरा । भारताच्या ॥८४॥
देखा जें जें महा- । भारतीं नाढळे । शोधितां न मिळे । त्रैलोक्यीं तें ॥८५॥
म्हणोनियां ऐसें । बोलती यथार्थ । असे व्यासोच्छिष्ट । जगत्रय ॥८६॥
ऐका परमार्था । जी का जन्म-स्थान । सर्वा रसीं पूर्ण । जगामाजीं ॥८७॥
ऐसी सर्वोत्तम । शुद्ध अनुपम । जी का मोक्ष-धाम । अद्वितीय ॥८८॥
वैशंपायन तो । मुनि तीच कथा । सांगे नृपनाथा । जनमेजया ॥८९॥
जो का भारताचा । सुगंध-पराग । विख्यात प्रसंग । गीतानामें ॥९०॥
यादवांचा राणा । प्रभु कृष्णनाथ । संवादला जेथ । अर्जुनाशी ॥९१॥
व्यासें मंथोनिया । वेदांचा सागर । काढिलें अपार । नवनीत ॥९२॥
ज्ञानाग्नीच्या योगें । कढवितां विवेकें । पावे परिपाकें । साजूकता ॥९३॥
इच्छिती विरक्त । भोगिती जें संत । ज्ञाते रमती जेथ । सोहंभावें ॥९४॥
करावें श्रवण । जें का भक्तजनीं । जें का त्रिभुवनीं । आदिवंद्य ॥९५॥
बोलिलें तें थोर- । भारताचें सार । प्रसंगानुसार । भीष्मपर्वी ॥९६॥
वाखाणिती ज्यास । शिव-ब्रह्मदेव । भगवद्भीता नांव । सुविख्यात ॥९७॥
सेविती जें नित्य । सनकादिक मुनी । विनम्र होवोनि । अत्यादरें ॥९८॥
शरद्‌ ऋतूमाजीं । चंद्रकलेंतील । कण जे कोमल । अमृताचे ॥९९॥
करोनियां मन । मृदुल आपुलें । चकोराचीं पिलें । वेंचिती ते ॥१००॥
तैसी च ही अति । हळुवारपणें । कथा श्रोतृजनें । अनुभवावी ॥१०१॥
मूकपणें येथें । करावा संवाद । घ्यावा रसास्वाद । अतींद्रिय ॥१०२॥
बोलाचिया आधीं । प्रमेयाची खूण । घ्यावी आकळून । यथार्थत्वें ॥१०३॥
घेवोनि पराग । भृंग जैसे जाती । परि तें नेणती । पद्म-दळें ॥१०४॥
त्या च परी व्हावी । येथें कुशलता । प्रेमें हा सेवितां । गीता-ग्रंथ ॥१०५॥
चंद्रोदयीं त्यासी । देई आलिंगन । स्व-स्थानीं राहोन । कुमुदिनी ॥१०६॥
कैशा परी घ्यावा । प्रीतीचा संभोग । जाणे सांगोपांग । तीच एक ॥१०७॥
तैसा तो चि जाणे । तत्त्वतां गीतार्थ । गंभीर प्रशांत । चित्त ज्याचें ॥१०८॥
अहो ग्रंथाचें ह्या । करावें श्रवण । पंक्तीसी बैसोन । पार्थाचिया ॥१०९॥
ऐशा योग्यतेचे । तुम्ही संतजन । द्यावें अवधान । कृपाबुद्धी ॥११०॥
तुमचें हृदय । सखोल म्हणोनि । पायीं विनवणी । सलगीची ही ॥१११॥
ऐकोनियां जैसा । बालकाचा बोल । प्रेमें येई डोल । मायबापां ॥११२॥
तैसा तुम्हीं मातें । आपुला लेखिला । अंगीजार केला । संतजनीं ॥११३॥
म्हणोनि जें उणें । साहाल तें सुखें । कासया हें मुखें । विनवावें ॥११४॥
परी आगळीक । आणिक ती येथ । पाहें मी गीतार्थ । कवळाया ॥११५॥
ऐका प्रभो तुम्हां । संत श्रोते जनां । करितों प्रार्थना । ह्या चि लागीं ॥११६॥
हें तों अनावर । न झाला विचार । वायां चि हा धीर । केला येथें ॥११७॥
नाहीं तरी देखा । प्रकाशतां सूर्य । काजव्याची काय । शोभा तेथें ॥११८॥
किंवा र्चोचीनें च । अब्धि आटवाया । प्रवर्तली वायां । टिटवी जैसी ॥११९॥
नेणता मी तैसा । असोनि सर्वथा । सांगाया गीतार्थ । सिद्ध झालों ॥१२०॥
ऐका आकाशातें । कवळूं पहावें । तरी मोठें व्हावें । त्याहुनी हि ॥१२१॥
म्हणोनि हें माझ्या । योग्यतेबाहेर । आघवें साचार । पाहूं जातां ॥१२२॥
अहो गीतार्थाचें । काय थोरपण । स्वयें विवरुन । दावी शंभु ॥१२३॥
जेथ ती भवानी । पावोनि आश्चर्य । विचारितां काय । बोले तिज ॥१२४॥
देवी तुझें रुप । नाकळे गे जैसें । नित्य नवें तैसें । गीता-तत्त्व ॥१२५॥
योगनिद्रेमाजीं । जयाचा कीं घोर । वेदार्थ-सागर । रुप झाला ॥१२६॥
तो चि सर्वेश्वर । बोलिला प्रत्यक्ष । तत्त्व हें अलक्ष्य । अर्जुनाशीं ॥१२७॥
ऐसें जें गहन । वेदां जेथें मौन । तेथें मी अजाण । काय बोलूं? ॥१२८॥
अपार हें सार । कैसें आकळावें । कोणें धवळावें । भानु-तेज ॥१२९॥
मशकानें कैसा । आकाशाचा प्रांत । धरावा मुठींत । सांगा बरें ॥१३०॥
परी मज येथं । आधार तो एक । म्हणोनि निःशंक । बोलतसें ॥१३१॥
ज्ञानदेव म्हणे । माझा पाठीराखा । निवृत्ति तो देखा । गुरुराव ॥१३२॥
एर्‍हवीं मी एक । अज्ञान बालक । झाला अविवेक । जरी येथें ॥१३३॥
तरी संतकृपा-। दीपक सोज्ज्वळ । तेणें चि सबळ । केलों आतां ॥१३४॥
अहो लोहाचें हि । होतसे सामर्थ्य तें पूर्ण । परिसाचें ॥१३५॥
किंवा मृतातें हि । लाभे सजीवता । तया मुखीं जातां । अमृत तें ॥१३६॥
जरी का वाग्देवी । सरस्वती भेटे । तरी वाचा फुटे । मुक्यातें हि ॥१३७॥
वस्तुसामर्थ्याचें । बळ हें केवळ । नसे हो नवल । येथें कांहीं ॥१३८॥
जयातें लाभली । कामधेनु माता । सर्व कांहीं हाता । येई त्याच्या ॥१३९॥
तैसा श्रीसमर्थ । म्हणोनि हा ग्रंथ । रचावया हात । घातला मीं ॥१४०॥
तरी श्रोतेजन । येथें जें जें न्यून । तें तें घ्यावें पूर्ण । करोनियां ॥१४१॥
आणि जें अधिक । घ्यावें तें मानोनि । ऐसी विनवणी । माझी तुम्हां ॥१४२॥
बाहुली ती नाचे । जैसी सूत्राधीन । तैसा मी बोलेन । बोलविल्या ॥१४३॥
द्यावें अवधान । अहो संतजन । व्हावें कृपापूर्ण । मजवरी ॥१४४॥
साधूंचा अंकित । निरोप्या मी दूत । मज ते नटवोत । निजेच्छेनें ॥१४५॥
होवोनि प्रसन्न । तंव गुरुदेव । म्हणती प्रस्ताव । पुरे आतां ॥१४६॥
हें तों सर्व कांहीं । आम्हालागीं ठावें । न लगे बोलावें । ज्ञानदेवा ॥१४७॥
आम्ही तुजलागीं । दिलें वरदान । गीतार्थ-व्याख्यान । करी त्वरें ॥१४८॥
श्रीगुरु-वचन । ऐकोनि सादर । आनंद-निर्भर । होवोनियां ॥१४९॥
म्हणे श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ऐका सावकाश । कथाभाग ॥१५०॥