नरहरी म्हणे जन्मा यावे
सत्य ज्योतिलिंग बारा । प्रातःकाळीं स्मरण करा । कोटि कुळें उद्धारा । भव तरा बापहो ॥ १ ॥
वाराणसी विश्वनाथ । मोक्षदाता तो समर्थ । पुरवील अंतरीचें आर्त सोमनाथ । सोरटी ॥ २ ॥
ॐकार ममलेश्वर । सेतबंध रामेश्वर । भीम उगमीं भीमाशंकर । घृणेश्वर वेराळीं ॥ ३ ॥
नागनाथ अमृतोदकीं । विश्वजन केलें सुखी । परळी वैजनाथ सुखी । सुकृत साचें जन्माचें ॥ ४ ॥
त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचें काज । त्याही तेजामाजीं तेज । महाकाळ उज्जनी ॥ ५ ॥
दुजे कैलास भुवन । श्रीशैल्य मल्लकार्जुन । वाचे स्मरतां धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र तें ॥ ६ ॥
ब्रद्रिकेदार उत्तरें । ज्याचें स्मरणें भव हा तरे । ध्यान धरितां वृत्ति नुरे । निज निश्चळ दासाची ॥ ७ ॥
नरहरी म्हणे जन्मा यावे । शुद्ध सत्य प्रेम भावें । वाचे हरी गुण गावें । मालो जपे सर्वदा ॥ ८ ॥