नरहरी जाणूनि शेवटीं
सकळ धर्माचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन ॥ १ ॥
दया क्षमा समाधान । घ्यावे संतांचें दर्शन ॥ २ ॥
संत संग वेगीं । वृत्ति जडों पांडुरंगीं ॥ ३ ॥
नरतनु येयाची बा कदां । भावें भजा संत पदा ॥ ४ ॥
भुलूं नका या संसारीं । हरी उच्चारी उच्चारी ॥ ५ ॥
सर्व जायाचें जायाचें । हरि नाम हेंचि साचें ॥ ६ ॥
विठोबा रक्षिल शेवटीं । उभा कर दोन्ही कटीं ॥ ७ ॥
नरहरी जाणूनि शेवटीं । संतचरणा घाली मिठी ॥ ८ ॥