उगी उगी गे उगी
उगी उगी गे उगी
आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी
ढगावरून ती चाले गाडी
शुभ्र पांढरी जरा वाकडी
ससा सावळा धावत ओढी
असली अद्भुत गाडी कुठली रडणार्यांच्या कुढ्या जगी
चांदोबाच्या बघ माथ्यावर
निळसर काळी छत्री सुंदर
नक्षत्रांची तिजसी झालर
हसणार्यांच्या घरी पिकवितो सर्व सुखाची चंद्रसुगी
उगी, पहा तो खिडकियात
चांदोबाचा आला हात
स्नात आईचा जणु दुधात
घे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी