इवल्या इवल्या वाळूचं
इवल्या इवल्या वाळूचं, हे तर घरकुल बाळूचं
बाळू होता बोटभर, झोप घेई पोटभर
वरती वाळू, खाली वाळू, बाळू म्हणे की, "इथेच लोळू"
उन्हात तापू लागे वाळू, बाळूला ती लागे पोळू
या इवल्याशा खोपेत, बाळू रडला झोपेत!
एक वन होतं वेळूचं, त्यात घर होतं साळूचं
साळू मोठी मायाळू, वेळू लागे आंदोळू
त्या पंख्याच्या वार्यात, बाळू निजला तोर्यात!
एकदा पाऊस लागे वोळू, भिजली वाळू, भिजले वेळू
नदीला येऊ लागे पूर, बाळू आपला डाराडूर
भुर्रकन् खाली आली साळू आणि म्हणाली, "उठ रे बाळू"
बाळू निजला जैसा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा
साळुनं मग केलं काय? चोचीत धरला त्याचा पाय
वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच
बाळूचं घरकुल वाहून गेलं, साळूचं घरटं राहून गेलं!
साळू आहे मायाळू, बाळू बेटा झोपाळू
वाळू आणि वेळूवर ताणून देतो खालीवर
साळू म्हणते, "गाऊ, खेळू", बाळू म्हणतो, "इथंच लोळू."
आमची गोष्ट आखुड, संध्याच्या पाठीत लाकूड