राजस्थान
राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला,त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात.प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.