मी खरंच शिकतोय का??
प्रत्येक आईवडिलांचं आपल्या मुलाबद्दल एक स्वप्न असतं.त्याने जीवनात खूप मोठं व्हावं,यशाचं उंच शिखर गाठावं आणि त्यासाठीच ते आपल्या मुलाला चांगलं उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.त्यांना चांगल्या शाळेत पाठवतात.शालेय शिक्षण झाल्यानंतर यशाची पाऊलवाट,जीवनाची जडणघडण म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण आणि मग त्याला चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन देतात कला,विज्ञान,वाणिज्य अश्या शाखांमध्ये ते याच उद्देशाने कि आपला मुलगा खूप शिकला पाहिजे.अकरावी आणि बारावी च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पदवीच शिक्षण घेण्यासाठी बहुदा बाहेर गावी पाठवतात.कोणी अभियांत्रिकी कोणी वैद्यकीय क्षेत्रात कोणी कला तर कोणी विज्ञान(BSC) या शाखांमध्ये आपली पदवी घेतात.तिथे त्याच्या राहण्याखाण्याची सोय आईवडील करून देतात.त्याला महिन्याला पैसे पाठवतात,त्याला शिक्षणात कसलीच अडचण येऊन नये याची काळजी ते नक्कीच घेत असतात.हे झालं आईवडिलांचं आपल्या मुलाप्रती कर्त्यव्य आणि एक अपेक्षा असते त्यांची कि आपल्या मुलाने आपल्याशी प्रामाणिक राहून शिक्षण घ्यावं.त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करावं.पण खरंच अस करतो का हो आपण ??
आपले आईवडील स्वतः कष्ट करून दिवसभर राबराब राबून पोटाला चिमटा देऊन आपल्याला पैसे पुरवतात.स्वतःला असो कसही पण आपल्याला कमी पडू देत नसतात.याच उत्साहाने,अपेक्षेने कि आपला मुलगा बाहेरगावी शिकतोय अभ्यास करतोय.हे सगळं खरंय हो पण याची जाणीव आहे का कोणाला ??
हल्ली मुलं या सगळ्याची जाणीव न ठेवता पाठवलेल्या पैशांचा दुरूपयोग करताना दिसतात.मुली/मुलं ,व्यसन,वाईट गोष्टी या सगळ्यावर पैसे उडवत बसतात. विसरतात ते आईवडील त्यांनी पाहिलेली स्वप्न त्यांचे कष्ट खरच वाईट वाटतं बघून.असं करणं म्हणजे आपल्या आईवडिलांना सरळ सरळ फसवल्यासारखेच आहे.पण यात नकळत आपलंही मोठं नुकसान होत आहे हे बहुदा कळत नसावं.मग हे अस वागल्यानंतर एक प्रश्न पडतो मी खरंच शिकतोय का?? शिक्षणाच्या नावाखाली पैसे उडवणे मजा मस्ती करणे हाच तो प्रामाणिकपणा का आपला ?