समास ५ वा
स्वानुभवनिरूपण
या समासात ओवी १-६ मध्ये पूर्वसमासातल्या (४/३५-३६) ओव्यांशी संबधित असा आपला अनुभव शिष्य निवेदन करीत असून, ७-१८ सद्गुरुचे उपसंहारात्मक विवेचन आहे; त्यातील १४-१५ ओव्यांत बंध व मोक्ष यांचे वर्म सांगितले आहे. ओव्या १९ ते २२ शिष्याच्या प्रशंसेपर उद्गारपूर्वक दृढतेसाठी परत उपदेश असून, २३ मध्ये शिष्य पूर्ण साक्षात्कारी झाल्याची सद्गुरुंची ग्वाही आहे. ओवी २४-२५ गुरुशिष्य ऎक्याचा सोहळा असून, २६ मध्ये जो कोणी असा शरण निस्संदेह होईल त्यास मोक्षप्राप्ति निश्चित होईल असे ग्रंथमाहात्म्यपर आश्वासन असून, ओवी २७-२८ ग्रंथ समाप्ति आहे.
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथांचिया माहेरा ॥
सार्थक जालें जी दातारा । तुमच्या कॄपाकटाक्षें ॥१॥
(चवथ्या समासातील ३५-३६ ओव्यांत म्हटल्याप्रमाणे कृतार्थ झालेला शिष्य श्रीगुरुचरणी आता स्वानुभव निवेदन करीत आहे.) हे अनंतकोटीब्रह्मांडनायका, सद्गुरुनाथा ! स्वामीराजा ! मायबापा ! आपला जयजयकार असो. भिन्नत्वाच्या भावनेमुळे अनाथ झालेल्या आम्हा जीवांचे आपण प्रत्यक्ष माहेरच - पूर्ण विश्रांतीचे आश्रयस्थानच आहात ! आपल्या कृपावलोकनाने, हे ज्ञानदातारा ! मी धन्य झालो आहे. माझ्या जीविताचे सार्थक झाले. ॥१॥
या मनाचेनि संगति । जन्म घेतले पुनरावृत्ती ॥
माया माईक असोन, भ्रांती । वरपडा जालों होतों ॥२॥
महाराज ! या मनाच्या संगतीने, त्याच्या ऒढीने आजपावेतो अनेक की हो जन्म घेतले ! मिनरूपी (मी - माझे) ही माया केवळ माझीच कल्पना असूनहि, ही खरी असून मला बंधनकारक आहे या भ्रांतीने मी भुललो के हो होतो ! ॥२॥
जी मी मानवी किंकर । येकायेकीं जालों विश्वंभर ॥
संदेह तुटला थोर । यातायातीचा ॥३॥
दयाळा ! केवढे आश्चर्य हे ! किंकर्तव्यमूढ असा एक तुच्छ मानवी जीव मनाचा दास होतो मी आजपावेतो ! परंतु आपल्या कृपेने तत्क्षणीच विश्वहि ज्यापुढे तुच्छ असा विश्वव्यापी, महानाहूनहि महान, परब्रह्म परमेश्वरस्वरूप झालो की हो ! पूर्णत्वाविषयीचा माझा सर्व संदेह आता पार नाहीसा झाला व त्यामुळे सर्व प्रकारच्या त्रासाचा घोरहि कायमचा मिटला. ॥३॥ (यातायात = त्रास)
मी संसारींहून सुटलों । पैलपार पावलों ॥
मीच सकळ विस्तारलों । सर्वांभूतीं ॥४॥
स्वामिराजा ! दुरतिक्रम अशा जन्ममरणाच्या या संसृतीपासून मी आता कायमचाच मुक्त झालो. चिंतेच्या या दुस्तर महासागराला ओलांडून - पार करून - आता मी सुखी झालो; कारण सर्व चराचरात स्वरूपतः मीच व्यापून असल्याचा विलक्षण अनुभव आपल्या कृपेने मला आला आहे. ॥४॥
मी करून अकर्ता । मी परेहून पर्ता ॥
मजमध्यें वार्ता । मीपणाची नाहीं ॥५॥
गुरुनाथा ! 'मी' जाणिवेचाहि जाणता आहे असा अनुभव आल्याने, तनमनाने हे सर्व कर्म करीत असूनही, स्वरूपतः मी अकर्ताच आहे ! मी हा आत्माराम इतका परिपूर्ण आहे की,..... पण काय करू? येथे मीपणाची तर वार्ताच - मागमूसहि - नाहि, त्यामुळे हा स्वानुभव आता महाराज ! आपल्याला सांगू तरी कसा हो? ॥५॥
ऎसें जें निजबीज । गाळीव मीपणाचा फुंज ॥
तो मुरलियां सहज । सीधचि आदिअंती ॥६॥
सर्व अनर्थाचे बीज जो 'मीच ब्रह्म' असा अतिसूक्ष्म ज्ञानगंड तोही आता आपल्या कृपेने दयाळा, निशेःष विरून गेला. त्यामुळे या अहंकारभ्रांतीच्या पूर्वीचे, निरतिशय, निर्विकल्प, निर्विकार असे जे आत्मस्वरूप ते आता जसेच्या तसेच अक्षुण्ण, विलसत आहे. ॥६॥ (गाळीव = गाळलेला, अतिसूक्ष्म)
ऎसा शिष्याचा संकल्पु । जाणोनि बोले भवरिपु ॥
संसारसर्प भग्नदर्पु । केला जेणें ॥७॥
संसृतिमूळ जो 'अहं' रूपी सर्प त्याचा गर्व नष्ट करणारे, त्यास नामोहरम करणारे, जन्ममृत्युचे कट्टर वैरीच जणु असे श्रीसद्गुरुनाथ आपल्या कॄतार्थ शिष्याचा वरील प्रमाणे अंतर्भाव जाणून, प्रशंसेने धन्योद्गार काढू लागले. ॥७॥
जें स्वामीच्य ह्र्दई होतें । तें शिष्यासी बाणलें अवचितें ॥
जैसें सामर्थ्ये परीसातें । लोहो आंगी बाणे ॥८॥
ज्याप्रमाणे परिसाच्या सामर्थ्यानें तुच्छ लोखंडास सुवर्णाचे दिव्यत्व येते त्याचप्रमाणे या श्रीसद्गुरुच्या अमृतमय प्रवचनाच्या अंतःस्पर्शाने त्यांच्यात नित्य विराजमान असलेला निजनिरतिशय शांतीच्या केवलत्वाचा अवर्णनीय भाव अकस्मात् शिष्याच्या ह्रदयात उदित झाला, स्मृतीत जागृत झाला. आपण तेच आहोत याची सनातन संवेदना जागृत होऊन ठसावली. ॥८॥
स्वामीपरीसाचा स्पर्श होतां । शिष्य परीसचि जाला तत्त्वतां ॥
गुरुशिष्याची ऎक्यता । जाली स्वानुभवें ॥९॥
परिसामुळे लोखंडास सुवर्णत्व येते खरे; परंतु परिसत्व मात्र त्यास प्राप्त होत नाही. तसे येथे नसून, सद्गुरुरूपी परिसाच्या अंतःस्पर्शाने शिष्यहि परिसच, सद्गुरुरूपच झाला. स्वानुभवैक्याने गुरुशिष्य दोघेहि स्वरूपीं तत्त्वतः एकरूपच, अभिन्नच झाले. ॥९॥
गुज स्वामीच्या ह्रदईचें । शिष्यास वर्म तयाचें ॥
प्राप्त जालें योगियांचें । निजबीज ॥१०॥
शब्दाने कधीहि प्रगट न करता येणारा केवल ब्रह्मत्वाचा सद्गुरुच्या ठायी विलसणारा अद्वितीय भाव, त्याचे वर्म उमजल्याने, शिष्यास अकस्मात प्राप्त झाला. ऎक्यतेचा योग साधणाऱ्या योग्यांचे जे अत्यंत गहन असे स्वरूपभूतच कैवल्यपद ते आता त्यास प्राप्त झाले, आपण तेच आहोत हे पूर्णपणे (त्याच्या मनीं) ठसले. ॥१०॥
बहुता जन्मांच्या सेवटीं । जाली स्वरूपेसीं भेटी ॥
येका भावार्थासाठीं । परब्रह्म जोडलें ॥११॥
त्यामुळे आता पुनर्जन्म संपलाच. पूर्वीच्या अनेक जन्माच्या शेवटी अर्थात या जन्मी शिष्यास स्वरूपप्राप्ति झाली आणि तीही एका भावबळानेच केवळ ! 'तत्त्वमसि' या सद्गुरुवचनावर अंतःकरणपूर्वक श्रद्धा-भाव ठेवल्याने त्यास सच्चिदानंद परब्रह्मपदाची प्राप्ति होऊ शकली. तो स्वतःच ते असल्याचा जगावेगळा अनुभव आला. ॥११॥
जो वेदशास्त्रांचा गर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ ॥
तयाचा येकसरां लाभ । जाला सद्भावें ॥१२॥
सर्व वेदशास्त्रांची प्रवृत्ति त्यांच्या अंतरीचा गुह्यभाव असे जे स्वयंपूर्ण निर्गुण निरतिशयानंद परमात्मास्वरूप; ते प्रगट करण्यासाठीच असते. तरीहि त्यांच्या (वेदांच्या) केवळ अभ्यासाने त्याची (परमात्म्याची) प्राप्ति मात्र होत नाही. सद्गुरुवचनांवर असलेल्या श्रद्धेच्या भावबळाने मात्र त्याची प्राप्ति पूर्णपणे-पूर्ण ऎक्याने त्या शिष्यास झाली. ॥१२॥ (येकसरां - एकसराने, अखंड, पूर्णपणे.)
जे ब्रह्मादिकांचें माहेर । अनंत सुखाचे भांडार ॥
जेणे हा दुर्गम संसार । सुखरूप होये ॥१३॥
असे हे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप, सृष्टीचे नियामक असे सर्व श्रेष्ठ ब्रह्मा आदि देवतांचेहि विश्रांतीचे केवळ माहेरघरच होय. सुखाच्या भावनेलाहि जन्म देणारे असे हे अविनाशी, अवीट स्वात्मसुखाचे भांडारच होय. एरवी दुरतिक्रम वाटणारा हा संसृतीचा महासागर, त्या स्वरूपाच्या प्राप्तिमुळे सुखपूर्वक क्षणात तरून जाता येतो. ॥१३॥
ऎसें जयास ज्ञान जालें । तयाचें बंधन तुटलें ॥
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेकें ॥१४॥
असा ज्याला स्वरूपसाक्षात्कार झाला त्याचे सर्व बंधन तुटलें, तो मुक्त झाला. हे बंधन वास्तविक नसून केवळ काल्पनिकच असल्याने, खरे पाहता कोणालाच ते नाही. परंतु अज्ञानाने 'मी जीव मज बंधन' या अविवेकाच्या भ्रांतीने, या जीवांनी आपल्याला संसारात दृढ बांधून घेतले आहे. ॥१४॥
संदेह हेचिं बंधन । निशेष तुटला तेंचि ज्ञान ॥
निःसंदेही समाधान । होये आपैसें ॥१५॥
आपल्या ब्रह्मत्वाविषयी दृढ विश्वास नसणे हेच खरे बंधन होय; कारण यामुळेच पुढे मी-ममता-संसार ही बंधपरंपरा निर्माण होते. हा अविश्वास पूर्णपणे नष्ट होणे हेच खरे ज्ञान होय. नुसते शाब्दिक ज्ञान तृप्तिकारक नसते. तात्पर्य, श्रीगुरुकृपेने हा विश्वास दृढ बाणला की मग साहजिकच या निजनिरतिशय तृप्तीचे समाधान प्राप्त होते. ॥१५॥
प्राणीयास माया सुटेना । अभिमानें त्रिपुटी तुटेना ॥
वृत्ति स्वरूपीं फुटेना । स्फूर्तिरूपें ॥१६॥
सद्गुरुंच्या 'तत्त्वमसि' या अमृतवचनांवर दृढविश्वास एवढेच मोक्षाचे सोपे कारण असूनही काय करावे पहा! या जिवांना 'मी - माझे' ही आसक्ती सुटत नाही. मी कर्ता या अभिमानामुळे कर्ता, कर्म, क्रिया ही त्रिपुटी व अर्थातच पुढील सर्वहि अनर्थ परंपरा काही केल्या त्यांना सोडवत नाही. तात्पर्य, त्यांची वृत्ति या अभिमानाने मलिन झाल्यानेच स्वस्वरूपाकडे स्फूर्तिरूपाने ती झेपावू शकत नाही. ॥१६॥
जे मायाजाळीं पडिलें । ते ईश्वरासी चुकले ॥
ते प्राणी सांपडले । वासनाबंधनी ॥१७॥
जे जीव या अहंममतारूपी मायेच्या जाळ्यात सापडले ते अर्थातच त्यात जास्त जास्तच गुरफटत गेले. उत्तरोत्तर नवनव्या वासनांच्या बंधनांनी जखडतच गेले. त्यामुळे ते आपल्या ईशत्वापासून - आत्मस्वरूपापासून जणु च्युत म्हणजे पतित झाले, आपल्या निर्बंध स्वरूपाला विसरले. ॥१७॥
जयाचें दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त जालें ॥
तयाचें बंधन तुटलें । निःसंगपणें ॥१८॥
ज्याचे दैव - दिव्यत्वाची जाणीव उदयाला येते अर्थात हे सर्व दुःख भोगण्यासाठी काही आपण नसून आपण कॊणीतरी महान असायला पाहिजे व ते आपण कोण ही जिज्ञासा ज्याच्या ठायी जागृत होते तो तिच्या तृप्तीसाठी श्रीगुरुंना शरण जातो व त्यांच्या कृपेने तो खरा कोण याचे ज जान त्याला प्राप्त होते. या ज्ञानाचाही संग सुटल्यावर, पूर्णपणे मीपणाविरहित झाल्यावर त्याचे सर्व बंधन आपोआपच नष्ट होते. ॥१८॥ (दिव्यते इति देवः, तस्य कारणं दैवम्)
सर्वसाक्षी तुर्या अवस्था । तयेचाहि तूं जाणता ॥
म्हणोनी तुज निःसंगता । सहजचि आली ॥१९॥
सामान्यतः जाणीव तीन प्रकारची दिसून येते. १) जागृत, ज्ञानमय २) स्वप्न, मूढत्व (शून्यत्व) मय ३) सुषुप्त - अज्ञानमय. या तिन्ही प्रकारच्या जाणिवेला जाणणारी जी शुद्धसत्त्वमय जाणीव ती चवथी म्हणून तिला तुर्या असे म्हणतात. ही सर्व काही जाणते म्हणून सर्वसाक्षिणी असते. ही अशी आहे असे जाणणारा तूच स्वतः असल्याने तुला - तुझ्या स्वरूपाला निःसंगता साहजिकच आहे आणि म्हणूनच आता तुला कसलेच बंधन उरले नाही. ॥१९॥
आपणासी तूं जाणसी । तरी ही नव्हेसी ॥
तूंपणाची कायेसी । मात स्वरूपीं ॥२०॥
आता तू स्वतःला निःसंग आत्माराम म्हणून ओळखलेस; तरी पण हे जाणणारा तुझा तूपणा (मी पण) काही तो आत्माराम नव्हे ! तुझ्या त्या आत्मस्वरूपी या जाणत्या तूपणाची - तुझ्या जाणत्या मीपणाची मातब्बरी ती काय? ॥२०॥
जाणता आणि वस्तु । दोनी निमाल्या उर्वरीतु ॥
तूंपणाची मातु । सहजचि वाव ॥२१॥
जाणणारा आणि जाणली जाणारी परब्रह्मवस्तु - ज्ञेयस्वरूप - या दोहीचेंहि प्रथम वेगळेसे वाटणारे भान मावळल्यानंतर, जे जाणिवेतीत असे निरतिशय निर्विकल्प शिल्लक रहाते तेथे या तूपणाचे तुझ्या मीपणाचे अस्तित्व यत्किंचितही नाही हे ओघानेच सहज स्पष्ट होते. ॥२१॥
आतां असो शब्दपाल्हाळ । तुझें तुटलें जन्ममूळ ॥
कां जें नाशिवंत सकळ । मदार्पण केलें ॥२२॥
आतां शब्दवडंबर पुरे झालें । मीपणासुद्धा सर्वहि नाशिवंत, मला अर्पण करण्याच्या मिषाने, तू निःशेष टाकिलेस. त्यामुळे आता पुनर्जन्माचे कारण संपले, आता तू मुक्त झालास. ॥२२॥
जें जें जाणोनि टाकिलें । तें तें नाशिवंत, राहिलें ॥
तुझे तुज प्राप्त जालें । अक्षईपद ॥२३॥
आब्रह्म जे जे काही तुझ्या जाणिवेत आले ते ते सगळे नाशिवंतच असे समजून त्याचा तू खरोखरच त्याग केलास. आता राहिले ते केवळ सर्वातीत अविनाशी निर्विकल्प असे स्वरूपच फक्त ते तूच असल्याने, माझ्या वचनाप्रमाणे तुला आता ते प्राप्तच झालेले आहे. ॥२३॥
ऎसें बोले मोक्षपाणी । ऎकोन शिष्य लोटांगणी ॥
निःसंदेह स्वरूपमिळणीं । दोघे येकचि जाले ॥२४॥
मोक्ष देणे हे केवळ ज्यांच्याच हाती आहे, ज्यांच्या कृपाकटाक्षानेच केवळ स्वानुभवप्राप्ति होऊ शकते असे स्वानुभवसम्राट सद्गुरुमहाराज आपल्या सच्छिष्याची निजप्राप्ति बघून प्रसन्नतेने वरीलप्रमाणे (ओवी २३) उद्गारते झाले. हे ऎकताच तो कृतार्थ शिष्य न-मनपूर्वक सद्गुरुचरणावर पडला, लोटला. सापेक्ष अशा शिष्यत्व व गुरुत्व या दोन्ही उपाधी आता संपल्यामुळे स्वस्वरूपी दोघेहि केवळ एकच झाले ! या दोघांचाही स्वानुभव आता निःसंदिग्धपणे एकच ठरला. ॥२४॥
ऎसा कृपाळु स्वामीराव । आदिपुरुष देवाधिदेव ॥
शिष्यास निजपदीं ठाव । ऎक्यरुपें दिधला ॥२५॥
असे अहेतुक (स. १/१९) कॄपाळु श्रीसद्गुरुनाथ, की जे प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपच होत, त्यांनी त्या शिष्याला त्याचे शिष्यत्व - लघुत्व घालवून स्वात्मपदी स्वस्वरूपी अखंड अभिन्नतेने आसरा दिला. तात्पर्य, आपली आत्मस्थिति त्यासहि बाणवून दिली. ॥२५॥
जो शिष्य स्वामीस शरण गेला । आणि संदेहावेगळा जाला ॥
तेणें जन्म सार्थक केला । जो देवांसी दुल्लभु ॥२६॥
याप्रमाणे जो शिष्य सद्गुरुंना शरण जाऊन, त्यांच्या कृपेने स्वरूपाविषयी निःशंक झाला त्यानेच केवळ हा देवदुर्लभ मानव जन्म, मोक्षप्राप्तीमुळे सार्थक केला असे म्हणावे लागेल. ॥२६॥
ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें । बोलताती अपारें ॥
परी अर्थासी कारण, येरें । येरा चाड नाहीं ॥२७॥
शिष्टरूढीनुसार ग्रंथाचे शेवटी महात्म्यवर्णन इ. पुष्कळ स्तुतिवचने असतात. सद्गुरु श्रीसमर्थ म्हणतात की या स्तुतीचा उपयोग तो किती? खरे हित ग्रंथातील भावार्थ बाणल्यानेच होणार. त्याचे विवरण तर पूर्वीच झालेले आहे; म्हणून आता शाब्दिक पाल्हाळाची गरज नाही. ॥२७॥
इति श्री आत्माराम । रामदासीं पूर्णकाम ॥
निःसंदेह जालें अंतर्याम । सद्गुरुचरणीं ॥२८॥
याप्रमाणे रामदास्यांना - मुमुक्षूंना पूर्णकाम करणाऱ्या ह्या श्री आत्माराम ग्रंथातील शेवटचा ५ वा समास सांगून झाला. निस्संदेहाने निर्मल झालेले अंतःकरण श्रीसमर्थसद्गुरुनाथचरणी समर्पित झाले, स्वरूपस्थित झाले. ॥२८॥
समास ५ वा संपूर्ण
(एकंदर ओव्या १८३)
॥ श्रीसद्गुरुनाथार्पणमस्तु ॥