Get it on Google Play
Download on the App Store

समास ४ था

साधननिरूपण

या समासात ओवी १-६ पूर्वसमासातल्या (३-३५) ओवींशी संबंधित मुख्य साधन म्हणजे श्रवण मनन निदिध्यासाने आत्मनिवेदन हे सांगून, ओवी ७ मध्ये ग्रंथ कोणते ऎकावे, वाचावे हे स्पष्ट केले आहे. ओवी ८ मध्ये शिष्याची साधनाविषयीची अनास्था असून, ओवी ९-१३ मध्ये त्याची ही भ्रांति फेडली आहे. त्यामुळे 'काहीच नाही !' अशी शून्यत्वाची कल्पना बळावू नये म्हणून दक्षतेने ओवी १४-१५ त शून्यत्वखंडण केले आहे. ओवी १६-१७ शून्यत्व का निर्माण होते ते सांगून १८-१९ अंतर्बाह्य दृश्य हे स्वरूप नसल्याचे स्पष्ट केले आहे. ओवी २०-२८ उपासनेविषयी शिष्याची शंका असून, २९ अखेर तिचे निरसण आहे. पुनरपि ओवी ३१-३१ अंतर्दृश्याचे निराकरण करून ३४ अखेर उपासनेचे महत्त्व पटवून दिले आहे. ओवी ३५ मध्ये शिष्याचा अनुभव विचारून ३६ मध्ये पुढल्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

जें सकळ साधनांचें सार । जेणें पाविजें पैलपार ॥
जेणें साधने अपार । साधक ते सीध जाले ॥१॥

(तिसऱ्या समासातील ३६ व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे आता मुख्य साधन सांगतात) सर्वहि साधनात श्रेष्ठ असे जे साधन की ज्याच्या योगाने भवसागर निश्चितपणे तरून जाता येतो आणि ज्यामुळे अगणित साधक आजपावेतो सिद्ध म्हणजेच मुक्त झालेही आहेत, ते साधन सांगतो, ऎक. ॥१॥

तें हे जाण रे श्रवण । करावे अध्यात्मनिरूपण ॥
मनन करितां समाधान । निजध्यासें पावती ॥२॥

ते साधन म्हणजे अध्यात्मनिरूपणाचे अत्यादराने, अंतःकरणपूर्वक श्रवण करावे. त्याचे मन नाहिसे होईतो मनन करणे अर्थात शोध घेणे आणि अशा वेळी जी उन्मनी स्थिती होते ती निदिध्यासाने (सतत अभ्यासाने) दृढ करणे हेच होय. यामुळेच समाधान प्राप्ति होते. ॥२॥

संत सज्जन महानुभावीं । परमार्थचर्चा करीत जावी ॥
हईगई सर्वथा न करावी । ज्ञातेपणेंकरूनी ॥३॥

संत सज्जन अशा श्रेष्ठ, स्वानुभव्यांच्या संगतीत आदराने अध्यात्मचर्चा नित्य श्रवण करीत जावी. 'मी ज्ञाता आहे' या केवळ शाब्दिक अशा शास्त्रभिमानाने श्रवणाची कधीहि टाळाटाळ करू नये. ॥३॥ (महानुभावी = महाअनुभवी, स्वानुभवी)

परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि आहे तत्त्वतां ॥
दिवसंदिवस शुधता । वृत्तीस होये नीच नवी ॥४॥

अशा परमार्थ चर्चेचा नित्य व्यासंग केला असता, दिवसानुदिवस वृत्ती शुद्ध, निर्मल होत जाते. हाच मुख्यतः असल्या चर्चेचा लाभ होय. ॥४॥ (उठाठेवी = व्यासंग, नीच नवी = नित्यनूतन)

श्रवण आणि मनन । या ऎसें नाहीं साधन ॥
म्हणोनी हें नित्य नूतन । केलें पाहिजे ॥५॥

अंतःकरणपूर्वक श्रवणमनन यासारखे साधन नाही. नकळतच मलिन होणारी वृत्ति यामुळे त्वरित निर्मल होते. म्हणून हे श्रवणमननाचे साधन नित्यनेमाने केले पाहिजे. नाविन्याविषयी जी उत्सुकता असते तसल्या आदराने हे केले पाहिजे. रोज तेच ते असे समजून कंटाळता कामा नये. ॥५॥

जैसे ग्रंथीं बोलिलें । तैसेंचि स्वयें पाहिजे जालें ॥
येथें क्रियेच्या माथां आलें । निश्चितार्थे ॥६॥

श्रवणात ग्रंथातील जसे निरूपण आपण ऎकतो, तसेच आपण स्वतः झाले पाहिजे. ते निरूपण अंगी बाणले पाहीजे. तसे होण्यासाठी क्रियेची म्हणजे साधनांची वा प्रयत्नांची आवश्यकता निस्संशय आहेच आहे. ॥६॥

जे ग्रंथी जो विचार । वृत्ती होये तदाकार ॥
म्हणोनी निरूपण सार । भक्ति ज्ञान वैराग्य ॥७॥

ग्रंथातील निरूपणाने श्रोत्यांची वृत्ति संस्कारित होत होत, तदाकार बनत असते, म्हणून विषयांचे वर्णनात्मक लौकिक साहित्य कामाचे नसून, भक्तिज्ञान वैराग्यवर्धक श्रेष्ठ अध्यात्मनिरूपणाचे ग्रंथच श्रवण करीत जावे. ॥७॥

तो शिष्य म्हणे स्वामी सर्वथा । सत्य करावी प्रतिज्ञा ॥
नाशिवंत घेऊन, साधनां । वरपडें न करावें ॥८॥

तोंच शिष्याने नम्रतेने हटकले की, "महाराज ! आपण सर्व जाणतच आहात. मागील आपली प्रतिज्ञा (१।३५-३६) आपण सत्य करावी. मजकडून अपेक्षिलेले नाशिवंत सर्व घेऊन, आता मला साधनाच्या कचाटीत कृपा करून अडकवू नका." ॥८॥

अरे शिष्या चित द्यावें । नाशिवंत तूंवा वोळखावें ॥
सांधन न लगे करावें । प्रतिज्ञाच आहे ॥९॥

अरे बाळा ! नीट लक्षपूर्वक ऎक. साधन करावे लागणार नाही. माझी ती प्रतिज्ञा मला मान्यच आहे ! परंतु त्यासाठी तू नाशिवंताला नीट ओळखले पाहिजेस. नुसत्या शब्दाने 'नाशिवंत' दिले (१।३६) असे बोलून भागणार नाही, तर तू प्रत्यक्ष सोडले पाहिजेस. ॥९॥ (चीत = चित्त)

प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऎसें बोलतो हा कोण ॥
नाशिवंत केले मदार्पण । त्याहिमध्यें तो आला ॥१०॥

बाबारे ! 'प्रतिज्ञा खरी करावी' असे बोलणारा हा आता कोण उरला आहे बरें? जरे सर्वहि नाशिवंत तू मला अर्पण केलेस तर त्यात पूर्वीच (२-३९) सांगितल्याप्रमाणे, हे बोलणारा तूहि आलासच. ॥१०॥

तूं म्हणसी जें दिधलें । तरी देयास कोण उरलें ॥
जे उरलें तें झुरलें । मजकडे ॥११॥

आताहि जे 'नाशिवंत आपणास दिले' असे तू म्हणतोस त्यातून ते देणारा हा तुझा 'मी' निराळा कसा उरला बरे? जे उरले असे वाटेल ते सर्व जाणिवेच्या प्रांतात असल्याने, नाशिवंतच असून, ते तर मदार्पण झालेले आहे. तात्पर्य, आता हे बोलणारा कोणी शिल्लक उरतच नाही. ॥११॥

तूं नाशिवंतामध्यें आलासी । आपणास कां रे चोरिसी ॥
नाशिवंत देता चकचकीसी । फट रे पढतमूर्खा ! ॥१२॥

याप्रमाणे तू तर नाशिवंतातच आलास; तर मग हे सर्व नाशिवंत देताना स्वतःला - तुझ्या मी ला - का बरे असे लपवून ठेवतोस? प्रतिज्ञा करूनहि तुझ्यासह सर्व नाशिवंत देण्यास आता का असा कचरतोस? पूर्वी (२-४०) नीट समजविले असताही एखाद्या पढतमूर्खाप्रमाणे वागतोस? धिक्कार असो तुझा ! ॥१२॥ (चकचकणें = कचरणे, का कू करणे)

शिष्य विचारून बोले । स्वामी कांहींच नाहीं उरलें ॥
अरे 'नाहीं' बोलणेंहि आलें । नाशिवंतामध्यें ॥१३॥

या भडिमाराने अंतर्मुख होऊन, जरासा विचार करून शिष्य कबूल करतो की, "महाराज ! आपले म्हणने मला पटले. नाशिवंत ते सर्व दिल्यावर बाकी खरोखर काहीच (ते देणारा मी सुद्धा) उरले नाही. " ही नाहीपणाची जाणीव (हे शून्यत्व) घालविण्यासाठी सद्‌गुरु त्वरितच उद्‌गारले की "अरे शहाण्या ! काहीच उरले नाही हे बोलणेहि नाशिवंतामध्येच आले की रे !" ॥१३॥

आहे म्हणतां द्या कांहीं । नाहीं शब्द गेला तोही ॥
नाहीं नाहीं म्हणतां कांहीं । उपजलें कीं ॥१४॥

'उरले आहे' असे वाटले तर ते मला दिले पाहिजेस, नसेल तर 'नाही' हा शब्दहि त्या नाशिवंतासवें अगोदरच दिला गेलेला आहे ! 'नाही, काहीच उरले नाही' असे आता म्हणताना काही तरी राहतेच की रे ! आणि ते म्हणजे 'नाहीच नाही' असे वाटणारी जी ही नाहीपणाची - शून्यत्वाची जाणीव, तिचा जाणणारा कोणीतरी. ॥१४॥

येथें सुन्याचा निरास आला । आत्मा सदोदित संचला ॥
पाहों जातां साधकाला । ठावचि नाहीं ॥१५॥

याप्रमाणे शून्यत्वाचा जाणता हा असतोच या खुलाशाने शून्यत्वाचे निराकरण झाले. शून्य हे खरोखरी शून्य नसते हे स्पष्ट झाले. शिष्याला अगोदरच 'मीही नाही' हे पटलेले आहे. शून्यत्वाचा निरास तर झालाच आणि आत्मस्वरूप तर सदोदित सर्वत्र विराजमान असल्याचे पूर्वीच (३-७ते१४) स्पष्ट झालेले असल्याने, आता 'हा साधक' असे वेगळेपणाने दाखविण्याला वावच उरला नाही. ॥१५॥

अभिन्नज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होतां धन्य ॥
वेगळेपणे वृत्तिसून्य । पावती प्राणी ॥१६॥

म्हणून वेगळेपण सोडून जो स्वरूपी पूर्णपणे एकवटला तोच खरा ज्ञानी होय. साधकपणाचे भिन्नत्व जाऊन जो साध्यच - स्वरूपच होईल तोच खरोखर धन्य होय. तात्पर्य, जो स्वतःला विसरून केवळ स्वरूपच होईल तोच खरा ! अन्यथा वर (१४) सांगितल्याप्रमाणे वेगळेपणाने राहू जाता 'काही नाही' या शून्यत्वाच्या भावनेत मात्र तो अडकून पडेल, फसेल. ॥१६॥

वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा ॥
'आत्माहि दिसेसा नाहीं' मता- । वरपडे होती प्राणी ॥१७॥

अशा रितीने भिन्नत्वाने साधन करू गेले तर मोक्ष - ऎक्यता केव्हाहि प्राप्त होणार नाही; परंतु शून्यत्वात मात्र फसावे लागेल. आत्मा हा काही दृश्य पदार्थ नव्हे म्हणून वेगळेपणे त्याची प्राप्ति केव्हाहि शक्य नाही. परंतु यामुळेच असे फसलेले लोक आत्मा वगैरे काही नाही असे शून्यमताचे अट्टाहासाने प्रतिपादन करतात. ॥१७॥

आपुलिया डोळा जें देखिलें । तें पंचभूतांमध्यें आलें ॥
ऎसें जाणोनी दृढ धरिलें । ते नाडले प्राणी ॥१८

(अथवा काहीजण प्रकाश, बिंदु, नाद, प्रणव, साक्षित्व इ. अंतर्दृश्यालाच - आध्यात्मिक खुणांनाच स्वरूप मानून बसतात. म्हणून स्पष्ट सांगतात की,) जे ज्ञानदृष्टीला कळते - ज्याचे म्हणून दर्शन होते ते सर्व पंचभौतिकच होय. मग ते अती सूक्ष्म तन्मात्रामय का असेना. ते काही शाश्वत स्वरूप नव्हे. असे असूनही तेच स्वरूप (अंतिम सत्य) म्हणून जे अट्टाहासाने मानतात, ते पूर्णपणे बुडाले, फसले असेच म्हणावे लागते. ॥१८॥ (डोळा = अंतर्दृष्टि)

जो पंचभूतांचा दास । तयास मायेमध्यें वास ॥
भोगी नीच नव्या सावकास । पुनरावृत्ती ॥१९॥

मग जे केवळ पंचभौतिक दृश्यांचे, या प्रपंचाचे दास झाले असतील; तर त्यांचे जीवन केवळ मायामयच होय. त्यामुळे त्यांना नित्य नवी पुनरावृत्ती भोगावीच लागणार. त्यांना जन्ममरण परंपरा वा सुखदुःखादि द्वंद्वे सुटणार नाहीत. ॥१९॥

तों शिष्यें विनंती केली । म्हणे आशंका उद्‌भवली ॥
पंचभूतांची सेवा केली । बहुतेकीं ॥२०॥

पंचभौतिकांची ही निंदा ऎकून शिष्याने विनंती पृच्छा केली की, "महाराज ! मला एक शंका आली आहे. कृपया तिचे समाधान करावे. बहुतेकांनी पंचमहाभूतांचीच - देवदेवतांचीच सेवा उपासना केलेली आहे, आणि - ॥२०॥

सकळ सृष्टीमध्ये जन । साधु संत आणि सज्जन ॥
करिती भूतांचे भजन । धातुपाषाणमूर्ती ॥२१॥

आजपावेतो जे साधू, संत, सज्जन या जगात झाले त्यांनी तर या देवदेवतांच्या धातुपाषाणादिक मूर्तींचेच म्हणजेच जड (दृश्य) पंचभौतिकांचे भजनपूजन केलेले आहे. इतकेच नव्हे तर - ॥२१॥

जे कोणी नित्यमुक्त जाले । तेहीं धातुपूजन केलें ॥
तरी ते पुनरावृत्ती पावले । किंवा नाहीं ? ॥२२॥

जे जीवन्मुक्त म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनीही पंचमहाभूतांचीच उपासना केलेली आहे. आपण तर पंचमहाभूतांची उपासना करणाऱ्यांना पुनरावृत्ती घडते (१९) असे म्हणता; तर मग ह्या महापुरुषांना पुनरावृत्ती घडली की मोक्ष मिळाला? ॥२२॥

ऎसा शिष्याचा अंतर्भाव । जाणॊनि आनंदला गुरुराव ॥
म्हणे सीघ्रचि हा अनुभव । पावेल आतां ॥२३॥

शिष्याच्या मनातील भाव ऒळखून, उपासनेविषयी त्याचे प्रेम जाणून; सद्‌गुरु आनंदित झाले. शुष्क ज्ञानाचा उपयोग तो काय? सूक्ष्माहंकार घालविण्यासाठी समर्पणासारखे साधन दुसरे नसल्याने शिष्याची ओढ बघून त्यांना विश्वास वाटला की, हा आता लवकरच स्वानुभवारूढ होऊ शकेल. ॥२३॥

ऎसें विचारूनिया मनीं । कृपादृष्टीं न्याहाळूनि ॥
शिष्याप्रती सुवचनीं । स्वामी बोलते जाले ॥२४॥

असा विचार करून, आपल्या कृतार्थ करणाऱ्या कृपादृष्टीने शिष्याला अवलोकून, श्रीसद्‌गुरु प्रेमळवाणीने त्याच्याशी पुढे बोलू लागले. ॥२४॥

प्राणी देह सोडून जाती । परी वासनात्मक शरीरें उरती ॥
तेणें पुनरावृत्ती भोगिती । वासना उरलिया ॥२५॥

प्राण्यांचे जीव स्थूलदेह सोडल्यानंतरहि, वासना उरल्याने सूक्ष्म देहाने असतात; व त्या अतृप्त वासनांच्या तृप्तीसाठी पुनरपि योग्य तो स्थूलदेह ते धारण करतात. याप्रमाणे स्थूलातून सूक्ष्म व त्यातून परत स्थूल अशा त्यांच्या पुनरावृत्ती, वासनेमुळे होतच असतात. ॥२५॥

मूळ या स्थूलदेहाचें । लिंगदेह वासनात्मक साचें ॥
राहाणें तया लिंगदेहाचें । अज्ञानदेहीं ॥२६॥

याप्रमाणे स्थूलदेहाला - या दृश्य शरीराला - कारण हा वासनामय लिंगदेहच - अदृश्य सूक्ष्म शरीर - होय. हे दोन्ही आकारात्मक असतात. वासना अज्ञानामुळे संभवते; म्हणून या सूक्ष्म देहाचें राहण्याचे ठिकाण त्याचें कारण - अज्ञानरूपी देह म्हणजेच कारणशरीर होय. ॥२६॥

कारण देह तोचि अज्ञान । आणि 'तो मी आत्मा' ऎसें ज्ञान ॥
तया नांव माहाकारण- । देह बोलिजे ॥२७॥

जे अज्ञान तोच कारणदेह आणि 'तो आत्मा मीच आहे' असे जे ज्ञान म्हणजे जे अज्ञानरूपी कारणाचेहि कारण, त्यालाच महाकारणदेह असे म्हणतात. हे दोन्ही वृत्यात्मक असतात. ॥२७॥ (ज्ञान आणि अज्ञान । दोन्ही वृत्तिरूपें समान ॥ --- दासबोध)

तरी मनाचा थारा तुटला । म्हणजे भवसिंधु आटला ॥
प्राणी निश्चितार्थे सुटला । पुनरावृत्तीपासुनी ॥२८॥

ज्ञान व अज्ञान या वृत्तीच असल्याने, वृत्तीला आधारभूत जे मन तेच जर नाहिसे झाले तर परत वृत्ति उत्पन्न होणार नाहीत आणि अर्थातच मग पुनरावृत्तीपासून तो सुटला - मुक्त झाला हे निश्चित होय. ॥२८॥ (मनाचा थारा = मनाचा आधार)

हेंचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ ॥
निःसंग आणि निर्मळ । आत्मा होईजें स्वयें ॥२९॥

ममतेरहित निःसंग व मीपणाविरहित निर्मल असे आत्मस्वरूप स्वतः आपणच आहोत असे अनुभवणे हेच तू विचारलेल्या (ओवी २० ते २२) भक्तीचे फळ होय. या भजनपूजनामुळे जन्ममरणरूपी संसृतीचे मूळ जो अहंकार तोच नष्ट होतो. ॥२९॥

संगातीत म्हणिजे मोक्ष । तेथे कैचें देखणे लक्ष ॥
लक्ष आणि अलक्ष । या दोहींस ठाव नाहीं ॥३०॥

'मी - माझे' या ओढीतून सुटणें, संगातीत होणे, म्हणजेच मोक्ष होय. जेथे 'मी' च नाही तेथे तो लक्ष्य ते कसले ठेवणार वा पाहाणार ते काय? तात्पर्य, दृश्य जे लक्ष्य व त्याचा अलक्ष्य - अदृष्ट द्रष्टा या दोन्हींसहि या मुक्तस्वरूपी वावच नाही. ॥३०॥

आत्मा म्हणोनी देखणीयास मिठी । घालू जातां मोक्षाची तुटी ॥
म्हणोनिया उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥३१॥

असे असल्याने आत्मा म्हणून जर अंतर्खुणांनाच (ओवी १८) मानले तर दृश्य व द्रष्टा हे दोन्ही तेथे असल्याने मोक्ष अशक्य होतो हे आता स्पष्टच झाले. म्हणून ही सर्व मतमतांतरे सोडून लगबगीने आत्मनिवेदन करावे. अर्थात मीपण निःशेष नाहीसे करावे. ॥३१॥ (देखणें - अतर्दृश्य (Mystic signs)

प्राप्त जाले अद्वैतज्ञान । अभिन्नपणें जे विज्ञान ॥
तेंचि जाण आत्मनिवेदन । जेथे मी-तूंपण नाहीं ॥३२॥

'मी तेच आहे' (अहं ब्रह्मास्मि) असे अद्वैतज्ञान प्राप्त झाल्यावर, 'मी' व 'ते' हे अतिसूक्ष्म भिन्नत्वहि जाऊन एकत्वाचा अनुभव आला म्हणजे ज्ञानाचे विज्ञान झाले, यालाच आत्मनिवेदन असे म्हणतात. येथे मीपण (ते समर्पित झाल्याने) व तू पण (द्रष्टा मीपणच नसल्याने) दोन्हीहि असू शकत नाहीत. ॥३२॥ (ज्ञान होणे - जाणीव होणे. विज्ञान होणें - अनुभव येणे)

ऎसी स्थिती जया पुरुषाची । तया पुनरावृत्ती कैंची ॥
जाणोनि भक्ति केली, दासाची । आवडी देवास अत्यंत ॥३३॥

ज्याला अशी आत्मनिवेदित स्थिती प्राप्त झाली त्याला पुनरावृत्ती ती कोठली? तू ज्यांच्याबाबत विचारले होतेस (ओवी २०-२२) त्यांनी 'मी तोच आहे" या भावनेने भक्ति केली म्हणून ते मुक्तच होत. अशा ज्ञानी भक्तांची श्रीप्रभूस अत्यंत आवडी प्रीति असते. ॥३३॥

पूर्वी दासत्व होतें केलें । त्याचें स्वामीत्व प्राप्त जालें ॥
आणि तयाचें महत्त्व रक्षिलें । तरी थोर उपकार कीं ॥३४॥

स्वानुभवहि असाच आहे. त्याच भावनेने मीसुद्धा पूर्वी दास्यत्व - पांचभौतिकाची सेवा केली म्हणून तर आज स्वामित्व स्वरूप स्थितीचा अधिकार पाप्त झालेले दिसते आहे. म्हणून जर त्या भक्तीचे माहात्म्य आम्ही राखले तर त्यात बिघडले कुठे? एकतर कृतज्ञता व दुसरा तुम्हा साधकांवर मार्गदर्शनाचा उपकार अनायासे होतोच कीं !!

आतां असो हें बोलणें । नाशिवंताचा विचार घेणें ॥
आणि मजपाशी सांगणे । अनुभव आपुला ॥३५॥

बरें, हे बोलणे आतां राहू दे. तू नाशिवंताबाबत नीट विचार कर आणि ते सर्वहि तू टाकले आहेस किंवा नाही याचा निवाडा घे. नीट विचार करून तुझा अनुभव तू मला सांग. ॥३५॥

आतां पुढिलीये समासीं । शिष्य सांगेल अनुभवासी ॥
दृढ करूनिया तयासी । सांगती स्वामी ॥३६॥

आता पुढल्या समासात, शिष्य विचार करून आपला अनुभव सांगेल. तो ऎकून, दृढतेसाठी सद्‌गुरु आणखीही विवेचन करतील. ॥३६॥

इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम ॥
ऎका सावध वर्म । आत्मज्ञानाचें ॥३७॥

याप्रमाणे रामदास्यांना - मुमुक्षूंना पूर्णकाम करणारा, स्वरूप साक्षात्कार घडविणारा - जो आत्माराम ग्रंथ त्यातील चवथा समास सांगून झाला. आत्मज्ञानाचे वर्म, जे आता पुढे सांगण्यात येईल, ते लक्षपूर्वक ऎका. ॥३७॥

समास ४ था संपूर्ण

आत्माराम

समर्थ रामदास स्वामी
Chapters
समास १ ला समास २ रा समास ३ रा समास ४ था समास ५ वा