Get it on Google Play
Download on the App Store

समास १ ला

त्यागनिरूपण

या समासात ओवी १-४ श्रीगणेश, ५-६ श्रीशारदा, ७-१० श्रीसद्गुरु, ११-१५ श्रीराम, १६-१७ संत आणि सज्जन श्रोते यांचे नमनपूर्वक मंगलाचरण असून ओवी १८-२४ विषयोपन्यास, ग्रंथ सांगण्याचे कारण दिले आहे. ओवी २५-२९ "तू कोण" ह्या मूलग्राही प्रश्नाने शिष्यास अंतर्मुख करून, "तुझे येथे काहीच नाही" असा निर्वाळा देऊन "मी" पण त्यागाचा उपदेश केला आहे. ओवी ३०-३५ त्यागाचेच जास्त सूक्ष्म विश्लेषण करून, "मला देण्याच्या निमित्ताने नाशिवंत तितके सर्व सोड, तरच स्वहित होणे शक्य" असे सांगून येथे लबाडीचा उपयोग नाही म्हणून स्पष्ट बजाविले आहे. ओवी ३६-३७ शिष्याने स्वामी आज्ञा मान्य केल्याचे पाहून आणि त्यास आश्वासून सद्गुरु अन्यत्र जाण्यास निघाल्याचे वर्णिले आहे. ३८-३९ पुढच्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

जयास लटिका आळ आला । जो मायागौरीपासूनि जाला ।
जालाचि नाही तया अरूपाला । रूप कैचें ? ॥१॥

(कार्यारंभी विघ्नविनाशकाचे स्मरण करण्याचा प्रघात आहे. ग्रंथाच्या उद्देशानुसार येथे निर्गुणगणेशस्वरूपाचेच नमन करून मंगलाचरण केले आहे.) जिचे वेगळे अस्तित्वच मुळी दाखविता येत नाही अशा मायामय गौरीपासून उत्पन्न झाल्याचा ज्याच्यावर मिथ्याच आरोप करतात; परंतु विवेकपूर्ण पहाता जो उत्पन्न होणे शक्य नाही आणि म्हणूनच जो सतत रूपरहित आहे त्याला रूप - नावरूप कोठून बरे असणार? ॥१॥

तेथें स्तवनाचा विचार । न घडे निर्विकारीं विकार ॥
परी तयास नमस्कार । भावबळें माझा ॥२॥

निर्विकार स्वरूपात कसलाच-नावरूपाचाही विकार संभवत नसल्याने अशा या स्वरूपाच्या स्तवननमनाचा विचारच अशक्य; तथापि तन्मयत्वाच्या भावबलाने का होईना त्याला नमस्कार असो. ॥२॥

जयाचेनि वेदशास्त्रेंपुराणें । जयाचेनि नाना निरूपणें ॥
जयाचेनि स्वसुखा लाधणें । शब्दीं निशब्द ॥३॥

ज्या निर्विकार स्वरूपाच्या आधारावरच सगळे चारही वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे नाना निरुपणाच्या योगे आपले हे सुखस्वरूप कसे अनुभवावे हे "शब्दी निःशब्द" अर्थात नाशिवंत शब्दातील अविनाशी भावार्थ तेवढा ग्रहण करण्याच्या मार्गाने सांगतात, त्याला माझे नमन असो. ॥३॥

जें शब्दास आकळेना । जें शब्दावीण सहसा कळेना ॥
कळलें ऎसेंही घडेना । जिये स्वरूपीं ॥४॥

वेदादिकांनाही प्रत्यक्ष शब्दाने ज्याचे यथातथ्य वर्णन करता येत नाही; स्वानुभवी सद्‌गुरुच्या शब्दांशिवाय सहजी जे कळतहि नाही आणि श्रवणानंतरही "हे कळले आहे" असे द्वैतभावाने म्हणता येत नाही असे हे सर्व तऱ्हेने विलक्षण असे स्वरूप आहे; त्याला माझे नमन असो. ॥४॥

ऎसें सदा सर्वत्र संचलें । जे तर्का न वचे अनुमानलें ।।
तें जयेचेनि प्राप्त जालें । आपरूप आपणासी ॥५॥

वर वर्णिलेलें सर्वत्र परिपूर्ण असे आपले नित्य निजस्वरूप की जे बौद्धिक तर्काच्या कसल्याही कसरतीने जाणता येत नाही; ते सद्‌गुरुच्या स्वानुभवाच्या ज्या जाणिवेमुळे आपल्यालाही अकस्मात अनुभवता येते तिला नमन असो. ॥५॥

नमन तिचीया निजपदां । माया वाग्देवी शारदा ॥
जयेचेनि प्रवर्तती संवादा । संत माहानुभाव ॥६॥

त्या माया, सरस्वती, शारदा इ. नावांनी संबोधिल्या जाणाऱ्या जाणिवेच्या निजपदी नमस्कार असो. या जाणिवेने उत्स्फूर्त होऊन साक्षात्कारी श्रेष्ठ संत आत्मस्वरूपाच्या सुखसंवादास प्रवृत्त होतात. ॥६॥

आतां वंदीन सद्‌गुरुस्वामी । जेथे 'राहिले' तोचि मी ॥
आणी निवारलीं निजधामीं । पांचहि जेणें ॥७॥

सर्वही पंचभौतिक सृष्टीचे विवेकाने निवारण करून जे आपल्या निजस्वरूपी सदैव स्थित आहेत आणि जे माझेही स्वस्वरूप असल्याचे ज्यांच्या कृपेने मला आकलन झाले आहे; त्या माझ्या श्रीसद्‌गुरुस्वामींना आता वंदन करतो. ॥७॥

तया निजपदाकडें । आनंदे वृत्ति वावडे ॥
पद लाघलियां जडे । तद्रूप होउनि ॥८॥

श्रीसद्‌गुरुस्वामींच्या कृपेने जाणीव मोहरून, वर वर्णिलेल्या निजस्वरूपाकडे आनंदाने झेपावते आणि अशा सतताभ्यासाने अखेरीस तद्‌रूप होऊन तेथेच स्थिरावते. ॥८॥

स्वामीकृपेचा लोट आला । मज सरोवरी सामावला ॥
पूर्ण जालिया उचंबळला । अनुभव उद्‌गार ॥९॥

(सद्‌गुरुंच्या स्मरणाने सद्‌गदित होऊन श्रीसमर्थ कृतार्थोद्‌गार काढतात की) माझ्या सद्‌गुरुंच्या स्वानुभवकृपामृताचा जो हा अनिवार लोंढा आला तो मी रूपी या सरोवरात पूर्णपणे रिचवला गेला; इतका की ते आता काठोकाठ भरून वाहू लागले आहे. ॥९॥

माझे सद्‌गुरुकृपेचे बळ । मजमाजीं सांठवले तुंबळ ॥
तेणें बळें स्वानंदजळ । हेलाऊं लागे ॥१०॥

माझ्या सद्‌गुरुंच्या कृपामृताच्या बळाने माझे अंतःकरण इतकें तुडुंब भरले आहे की, त्यातील स्वानंदामृत आता तुझ्यासाठी उचंबळू लागले आहे. ॥१०॥

आता नमस्कारीन राम । जो योगियांचे निजधाम ॥
विश्रांती पावे विश्राम । जये ठायीं ॥११॥

जो योग्यांचे-भक्तांचे निजनिरतिशय सच्चिदानंदस्वरूप आहे, जेथे परमसुखदायी स्वरूपानुभवाची विश्रांतीही विराम पावते; अशा श्रीरामरायाला आता मी नमस्कार करतो. ॥११॥

जो नांवरूपावेगळा । जो ये मायेहून निराळा ॥
जेथे जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥१२॥

जे नामरूपातीत आहे, जे मायेहून अलिप्त आहे कारण जेथे या मायेच्या मीपणाच्या जाणिवेचे सामर्थ्यही सर्वथैव विरून जाते असे माझ्या श्रीरामप्रभूचे सत्यस्वरूप आहे. ॥१२॥

जेथे भांबावला तर्क । जेथे पांगुळला विवेक ॥
तेथे शब्दांचे कौतुक । केंवि घडें? ॥१३॥

जेथे मनाचा तर्क कुंठित होतो, जेथे बुद्धीचा विवेकही लंगडा पडतो अशा मनबुद्धीअगोचर श्रीरामस्वरूपाच्या बाबतीत शब्दांच्या नुसत्या कसरतींचे ते काय बरे चालणार?

जयालागी योगी उदास । वनवासी फिरती तापस ॥
नाना साधनी सायास । जयाकारणें करितो ॥१४॥

ज्याच्या प्राप्तीसाठी योगी साधक अनासक्त होऊन निरंजन अशा वनात नाना कष्टकारक साधनादिकांनी युक्त अशी घोर तपश्चर्या करीत फिरतात ॥१४॥

ऎसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ॥
उपमाच नाहीं निरोपम । रूप जयाचें ॥१५॥

असा हा श्रीराम सर्वांचा केवळ आत्माच होय. कार्यदृष्टीने तो सगुण आहे तर आत्मदृष्टीने निर्गुण आणि तद्‌रूपतेने तर तो सगुणनिर्गुणातीत असा परिपूर्ण आहे. त्याचे रूप इतके परिपूर्ण असल्यामुळेच ते उपमेरहित आहे. ॥१५॥

आतां वंदीन संत सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते ॥
माझीं वचनें पराकृतें । सांगेन तयापासीं ॥१६॥

आता मी कृपाळू संतांना आणि अंतःकरणातील भावाचे आकलन करणाऱ्या सज्जन श्रोत्यांना वंदन करतो. त्यांना ही माझी मराठी भाषेतील उत्स्फूर्त वचने मी सांगेन म्हणतो.

तयांचे वर्णावे स्वरूप । तरी ते स्वरूपाचेचि बाप ॥
जें वेदांसी सांगवेना रूप । ते जयांचेनि प्रगटें ॥१७॥

वेदवाणीही जेथे तोकडी पडते त्या स्वस्वरूपाच्या तत्त्वज्ञानाला ज्यांनी जन्म दिला आणि ज्यांच्या कृपेनेच केवळ ते अनुभविता येणे शक्य होते त्या संतांचे वर्णन कोठवर करावे बरे. ॥१७॥

आतां शिष्या सावधान । ऎक सांगतो गुह्यज्ञान ॥
जेणें तुझे समाधान । आंगी बाणे ॥१८॥

शिष्या ! आतां सावध हो. गुह्यज्ञान गुह्यज्ञान म्हणून ज्याला म्हणतात ते आता सांगतो, दक्षतेने ऎक. यामुळे तुझ्या ठायी पूर्ण समाधान बाणेल. ॥१८॥

तुवां आशंका नाहीं घेतली । परंतु मज तुझी चिंता लागली ॥
कां जें तुझी भ्रांति फिटली । नाहींच अद्यापि ॥१९॥

तू शंका विचारली नाहीस हे खरे; परंतु मला तुझी चिंता लागली आहे. कारण स्वरूपज्ञानाविषयींची तुझी खोटी समजूत अजून समूळ निवारली गेल्याचे दिसत नाही. ॥१९॥

दासबोधींचे समासीं । निर्मूळ केलें मीपणासी ॥
तया निरूपणेहि वृत्तीसी । पालट दिसेना ॥२०॥

'दासबोधाच्या' (एकवीस समासींच्या) तेराव्या समासात मीपण कसे निराधार आहे - हा तुझ्या कल्पनेचा खेळच तुला कसा नडतो आहे हे स्पष्टपणे सांगितले. तरीहि अद्यापि तुझ्या ह्या मीपणाच्या भावनेत बदल झालेला दिसून येत नाही आहे. ॥२०॥

म्हणोनि न पुसतां सांगणें । घडलें शिष्या तुजकारणें ॥
आतां तरी सोय धरणें । श्रवणमननाची ॥२१॥

म्हणून, विचारल्याशिवाय न सांगण्याचा शिष्ठदंडक (नापृष्ठस्य वक्तव्यम्) बाजूस सारून हे शिष्या ! तुझ्या हितासाठी हे सांगणे घडत आहे. बाळा ! आता तरी श्रवणमननाची कास धर बरे. ॥२१॥

चातकपक्षी वरीचा वरी । चंचु पसरून थेंबुटा धरी ॥
जीवन सकळही अव्हेरी । भूमंडळीचें ॥२२॥

पृथ्वीवरील जलाचा अव्हेर करून, ज्या आर्ततेने चोच पसरून चातकपक्षी पावसाचा सूक्ष्म थेंबही वाया न दवडिता वरच्या वर आत्मसात करतो ॥२२॥

तैसा शब्दवरुषाव होतां । असों नेदावी वेग्रता ॥
श्रवणपुटीं सामावितां । मनन करावें ॥२३॥

तशाच आर्ततेने एकही शब्द फुकट न दवडितां, सद्‌गुरूमुखांतून होणाऱ्या शब्दवर्षावाचें श्रवण करावें; इतर विषयांचे चिंतन त्या वेळी बिलकुल असू नये. इतकेच नव्हे तर मननाद्वारे त्यातील अर्थही आत्मसात करीत जावा. ॥२३॥

लागवेग जाणोन शब्दाचा । आवांका पाहावा मनाचा ॥
शब्दाआंतील गर्भाचा । सांटावा घ्यावा ॥२४॥

(हे मनन कसे करावे) सद्‌गुरुंच्या प्रत्येक शब्दाचा निरूपण विषयांशी संबंध काय, तो उच्चारतांना त्यांच्या मनांत हेतु कोणता आहे हे जाणून तो शब्द जो भाव दर्शवितो तो आत्मसात करावा. ॥२४॥

अरे तूं कोण कोणाचा । कोठून आलासी कैंचा ॥
ऎसा विचार पूर्वीचा ।घेई बापा ॥२५॥

बाळा ! तू आहेस कोण? कोणाचा आहेस? येथे आलास कोठून? कसा आलास? इ. प्रश्नांचा पूर्वीच सांगितलेला विचार आता तरी नीट करू बघू ! (जुन्या दासबोधात - २१ समासीत सांगितलेला. ओवी २०) ॥२५॥

अरे तां जन्मांतर घेतलें । काय मानितोसि आपुलें ॥
ऎसें तुवां विचारिलें । पाहिजे आतां ॥२६॥

'हे माझे' असे मानतोस तर अशी तुझी कितीतरी जन्म जन्मांतरे झाली आहेत. पूर्वीच्या जन्मांतील संबंध जर आता काही राहिला नाही तर या जन्मातलाही कितीसा बरे टिकणार आहे? अशा तऱ्हेचा विचार आता तू केला पाहिजेस. ॥२६॥

येथे तुझे कांहींच नाहीं । भुलला आहेस काई ॥
चुकोनी आलासी, जाई । जेथीचा तेथें ॥२७॥

अशा विचारानें तुला पटेल की येथे 'केवळ तुझेच' असे म्हणता येणारे काहीही नाही; तर मग याच्या मोहात विनाकारण का बरे गुंतला आहेस? आसक्तीच्या या चुकींमुळेच तू येथे आला आहेस. आता ही आसक्ती सोडून आपल्या मूळ ठिकाणी जा कसा ! ॥२७॥

तूं समर्थाचें लेकरूं । अभिमानानें घेतला संसारु ॥
अभिमान टाकितां, पैलपारु । पावशील बापा ॥२८॥

बाबारे ! परमेश्वरापासून तुझी उत्पत्ती असल्याने तूहिं तद्‌रूपच आहेस. परंतु हे विसरून जीवत्वाचा अभिमान घेतल्याने तू ह्या जन्ममृत्युरूपी भवसागरात अडकला आहेस. म्हणून हा अभिमान सोडताच तू याच्या पैलतीराला सहजींच पावशील; अर्थात मुक्त होशील बरे. ॥२८॥

ईश्वरापासून जालासि । परी तूं तयासी चुकलासी ॥
म्हणोनी हे दुःख भोगिसी । वेगळेपणें उत्कट ॥२९॥

ईश्वरापासून - त्याच्यामुळेच तर तुझी उत्पत्ती ! परंतु त्या आदिकारणाला तू विसरलास आणि 'मी जीव' म्हणून वेगळेपणा धरून बसल्याने हे या संसाराचे तीव्र दुःख तू भोगतो आहेस. ॥२९॥

त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥३०॥

मी-माझे ह्या अभिमानजनित सर्व लौकिक वैभवाचा त्याग करून, जर माझ्या शब्दांवर अंतःकरणपूर्वक विश्वास ठेवशील तर तुला मी जेथेल्या तेथे पोहोचते करीन; अर्थात स्वस्वरूपी मिळवीन. (येथे 'विश्वासणें' याचा भाव तेह सत्य मानून आचरणात आणणे असा आहे.) ॥३०॥

तुझे अढळपद गेलें । तुज मायेनें वेढां लाविलें ॥
तें जरी तुझें तुज दिधलें । तरी मज काय देसी ? ॥३१॥

तुला स्वस्वरूपाचे विस्मरण झाले असून, 'मी-माझे' या मायेत तू गुरफटला गेला आहेस. त्यामुळे आता तुला अप्राप्य वाटणारे तुझे ते मूळस्वरूप जर पुन्हा तुला मिळवून दिले तर तू मला काय देशील बरे? ॥३१॥

जितुकें काही नासोन जाईल । जें अशाश्वत असेल ॥
तुजसमागमें न येईल । तितुकेंच द्यावें मज ॥३२॥

ज्याचे रूपान्तर होत असेल, जे अस्थिर असेल, जे शाश्वत राहाणारे नसेल, मृत्युसमयी जे तुजबरोबर येणारे नसेल, तितकेच फक्त तू मला देऊन टाक. ॥३२॥

मजहि तें कायें करावें । परी तुजपासून टाकवावें ॥
तुंवां टाकिलें तरी न्यावें । तुज समागमें ॥३३॥

मला तरी तसले ते घेऊन काय करायचे आहे? केवळ तुझ्यापासून ते सुटावे हीच माझी इच्छा! म्हणून जर तू त्याचा त्याग केलास तर तुला मजबरोबर स्वरूपी न्यावे, स्थित करावे असे म्हणतो. ॥३३॥

अरे भूषण भिक्षेचें सांडिले । आणि राजपद प्राप्त जालें ॥
तरी तुझें काये गेलें । सांग बापा ॥३४॥

हे बघ ! भिकेवर जगणारे जीवन सुटून जर तुला अकस्मात राज्यपदच प्राप्त होत असेल तर त्यात तुझे काय नुकसान आहे बरें ? ॥३४॥

नाशिवंत तितुकेंचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेसीं ॥
त्यामध्यें लालुच करीसी । तरी स्वहित न घडे ॥३५॥

म्हणून हे बघ ! जेवढे काही नाशिवंत असेल तेवढे सगळे मला देऊन टाक म्हणजे निसंदेह तुझे स्वरूप तुला प्राप्त होईल. मात्र त्यात यत्किंचितही लबाडी केलीस अर्थात या नाशिवंताबाबत जराही आसक्ती ठेवलीस तर तुझाच तोटा होईल; स्वरूप प्राप्ति होणार नाही हे पक्के लक्षात असू दे. ॥३५॥

तों शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ॥
आतां तूं आपुलें । कांहीं मानूं नको ॥३६॥

तेव्हा शिष्य म्हणाला की, 'महाराज ! आपण मागता ते नाशिवंत सर्वही दिले' त्यावर सद्‌गुरु म्हणतात की, 'तर मग तुला आत्मपद लाभले. यापुढे मी-माझे असे तू काहीही मानू नकोस. ॥३६॥

इतुकें स्वामी बोलिले । आज्ञा घेऊन निघाले ॥
तंव शिष्यें विनविलें । विनीत हो‌उनी ॥३७॥

वरीलप्रमाणे आश्वासून, सद्‌गुरु, "बरे तर आता आम्ही येतो" असे म्हणून जाण्यास निघाले तेव्हा शिष्याने नम्रतापूर्वक शरण जाऊन विनंती केली. ॥३७॥

आतां पुढिलीये समासीं । संवाद होईल उभयतांसी ॥
तेणें स्वानंदसिंधुसि । भरितें दाटें बळें ॥३८॥

आता गुरुशिष्यांचा जो सुखसंवाद होईल तो पुढच्या समासात सांगू. त्याच्या श्रवणाने स्वानंदाचा महासागर उचंबळून गर्जू लागेल. ॥३८॥

इतिश्री आत्माराम । रामदासी पूर्णकाम ॥
ऎका सावध, वर्म । सांगिजेल ॥३९॥

याप्रमाणे रामदासांना-मुमुक्षूंना पूर्णकाम करणारा अर्थात स्वरूप साक्षात्कार घडविणारा जो हा आत्माराम ग्रंथ त्यातील पहिला समास सांगून झाला. या साक्षात्काराचे वर्म आता पुढल्या समासात सांगण्यात येईल ते दक्षतेने ऎका. ॥३९॥

आत्माराम

समर्थ रामदास स्वामी
Chapters
समास १ ला समास २ रा समास ३ रा समास ४ था समास ५ वा