Get it on Google Play
Download on the App Store

ग्रंथाची कथा

१९९८ साली ज्योतिषी आनंद कुलकर्णी ह्यांनी ह्या पुस्तकावर एका खाजगी समारंभांत व्याख्यान दिले होते. हि कथा आठवणीतून इथे देत आहे. एक तरुण धनिक एका गांवातून दुसऱ्या गावांत प्रवास करत असतो. त्याची बैलगाडी मोडते आणि रात्री त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात. जीव वाचवण्यासाठी तो जंगलातून पळत राहतो आणि एके ठिकाणी पडून बेशुद्ध पडतो. सकाळी जाग येते तेंव्हा एक सुंदर तरुणी त्याची काळजी घेत असते.  तिच्या सौन्दर्यावर तो त्वरित भुलतो. तिच्या शुश्रुतेने तो बरा होतो आणि  त्या मुलीने आपल्याबरोबर लग्न करून घरी यावे अशी इच्छा व्यक्त करतो. 

इथे ती मुलगी त्याला आपले नाव निळावंती असे सांगते. तिच्या अनेक अटी सुद्धा असतात. उदाहरणार्थ रात्री ती त्याच्या सोबत झोपणार नाही आणि रात्री ती कुठे जाईल ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने करू नये. तो अटी मान्य करतो. 

अश्या पद्धतीने निळावंती गांवात येते. तिचे सौंदर्य सर्वानाच दैवी वाटते. निळावंती दर रात्री शयन कक्षातून उठून बाहेर जाते. निळावंती एक अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षिणी असते आणि पृथीवर अडकलेली असते. पुन्हा आपल्या लोकांत पोचण्यासाठी तिला काही तरी गूढ ज्ञान आवश्यक असते म्हणून रात्रभर भटकून ती आत्मे, भुते, इतर यक्ष, इत्यादींकडून माहिती गोळा करते आणि लिहून काढते. हजारो वर्षे हेच केल्याने तिच्याजवळ अनेक गूढ विद्या असतात. अर्थांत इतर भुते, सिद्ध, आत्मे इत्यादी हे ज्ञान फुकट देत नाहीत. है ज्ञानासाठी तिला काही ना काही त्याग करावा लागतोच. कधी कुणा प्राण्याचा बळी तरी कधी मोठे हवन तर कधी स्वतःचे रक्त. 

खरे तर निळावंतीला एका सिद्धाने सांगितले होते कि ह्याच गावांत तिला शेवटी आपल्याला पाहिजे असलेले ज्ञान मिळेल म्हणून तिनेच धनिक तरुणाला मोहित करून गावांत प्रवेश मिळवला होता. गांवातील काही लोकांना मात्र हिच्या विषयी असूया वाटते आणि ते लोक तिच्या पतीचे कां तिच्या विरुद्ध भरत असतात. गांवातील काही प्राण्यांचा मृत्यूचा आळ ते खोटेपणाने निळावंतीवर टाकतात. 

शेवटी निळावंतीला समजते कि आपल्या लोकांत जाण्यासाठी तिला एक दिव्य नदी पार करावी लागणार आहे. हि नदी पार करण्यासाठी जी नाव लागते ती फक्त दिव्य आत्म्यानाच दिसू शकते आणि पैलतीरी जाण्यासाठी नाविकाला काही विशेष भेट द्यावी लागते. हि वस्तू कशी मिळवावी हे ज्ञान सुद्धा निळावंतीला मिळते. एका अमावास्येच्या रात्री गांवातील नदीतून एक प्रेत वाहत एणार आहे अशी माहिती एक घुबड तिला दिते. हे घुबड प्रत्यक्षांत एक दिव्य आत्मा असतो. नदीच्या उगमाकडे एक युद्ध होत असते. तिथे एक सैनिक गंभीर जखमी होतो आणि आपले प्राण जात असताना आपल्या लहान मुलीची आठवण म्हणून एक ताईत त्याने हातात बांधला असतो त्याला पकडून तो मृत्यू पावतो. त्या ताईताला सुद्धा इतिहास असतो पण थोडक्यांत तो ताईत दिल्यास तिला दिव्य नावेतून पैलतीरी जायला मिळू शकते. 

निळावंती रात्री नेहमी प्रमाणे बाहेर जाते पण ह्यावेळी तिचा पती सुद्धा उठून तिच्या मागोमाग जातो. तिला हे ठाऊक असते पण ती त्याला थांबवत नाही. गांवातील नदीचा किनाऱ्यावर ते प्रेत वाहत येते आणि ती नदीतून उडी टाकून ते प्रेत ओढून आणते. ते दृश्य पाहून तिच्या पतीला किळस येते आणि तो येऊन तिला जाब विचारतो. निळावंती त्या प्रतच्या हातातून ताईत घेऊन पळून जायला बघते पण इथे तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिचा पती तिच्यावर जादूचा प्रयोग करतो. 

तिला जबरदास्त धक्का बसतो. तिचा पती ज्याला ती सामान्य माणूस समजत होती प्रत्यक्षांत एक राक्षस होता. त्याला सुद्धा जादू विद्या येत होती आणि तो तो ताईत घेऊन पळून जातो. रागाच्या भरांत निळावंती सुद्धा पक्षाचे रूप घेऊन सर्व काही मागे सोडून जंगलांत जाते. गांवातील एक अर्धवट ज्ञान असलेला माणूस तिच्या सामानातून तिची ताडपत्रे गोळा करतो अनिल त्यातील ज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो. 

त्या पत्रांत हजारो लोकांकडून गोळा केले ज्ञान असल्याने त्याला काही स्ट्रक्चर असे नसते, काही पाने तर वाचण्यासारखी सुद्धा नसतात तर काहींची भाषा सुद्धा विसरली गेलेली असते. पण काही वर्षांत त्यातील काही गोष्टी निळावंती ग्रंथ नावाने प्रसिद्ध पावतात. 

ह्या कथेत किती सत्य आहे ह्याची कल्पना कुणालाच नाही पण निळावंती ग्रंथ दासबोध किंवा सहदेव-भाडळी ह्याप्रमाणे एक व्यक्तीने मुद्देसूद पद्धतीने लिहिलेले पुस्तक नसून विविध वेगळे मंत्र जोडून केलेली एक विचित्र पोथी आहे असे सर्वच लोक मान्य करतात.