Android app on Google Play

 

व्यथा

 

फासे नशिबाचे 

कधी सरळ ना फिरले

मनी जे इच्छिले

कधी ना मज भेटले...

केले कष्ट बहू

परी चीज तयाचे ना झाले

उपेक्षा अन अपमान

आता नित्याचे झाले...

अपेक्षांचे ओझे

ना कधी मज पेलले

निराशेचे प्याले

आसवांसह रिचवले...

ध्येय जीवनाचे

धुक्यात हरवले आहे

आयुष्याच्या वाटेवर

तरी चालतो आहे...

अंधार भूतकाळाचा

आज दाटला आहे

भविष्याच्या वाटेवर

वर्तमान जगतो आहे...

इभ्रतीचे वाभाडे

मीच काढतो आहे

न संपणारे दुःख

दुर्दैवाने साहतो आहे..

रक्ताळल्या पंजांनी

आज लढतो आहे

घायाळ मी रणांगणी

घटिका मोजतो आहे...

जन्म मृत्यूच्या फेऱ्यात

खोल अडकलो आहे

माझे जीवन गाणे

मुक्यानेच गातो आहे...

आयुष्याच्या वणव्यात

आज जळतो आहे

सुखद त्या काळाची

वाट पाहतो आहे...