वासुदेव यायचा आता बंद झालाय
मित्रा, वासुदेव यायचा आता बंद झालाय
नात्या कोत्यांचा दुष्काळ पडलाय
भावनांच्या थडग्यात तो गाडला गेलाय
खरय मित्रा , वासुदेव यायचा आता बंद झालाय
तो प्रहर कधीच निघून गेलाय
दारे खिडक्या बंद ती सारी
काय करेल तो येऊनि प्रहरी ?
नाम हरीचे सारेच विसरले
नभी सूर्य अन चंद्र ते कसले ?
छनछन आवाज जो प्यारा
कुठे वेळ ऐकण्यास हे सारा ?
पैश्याचा जणू पाऊसच पडलाय
पण त्या पावसानेच वासुदेव जिवंत मेलाय
वासुदेव यायचा बंद झालाय मित्रा
वासुदेव यायचा बंद झालाय
कलियुगाचा खेळ चाललाय
वासुदेवाला मानवी कंसानेच वधलाय
सिद्धेश्वर विलास पाटणकर