बलुचिस्तान- स्वतंत्र राष्ट्र होणार का?
मराठे बलुचिस्तानचे असले तरी ते शेवटी पाकिस्तानीच. त्यांना त्यांच्या देशाबद्दल प्रेम असणार हे एवढं वाचल्यानंतरही आपल्या मनात आल्याशिवाय राहात नाही. मात्र तसं नाहीये.बलुचिस्तानच्या मराठ्यांना स्वतःच्या मराठा असण्यावर आजही प्रचंड अभिमान आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्याने त्यांना आपल्या पूर्वजांबद्दल फारशी माहिती ठाऊक नाही. मात्र चालत आलेल्या रुढी पंरपरा, स्वतःचं मराठा असणं ते अभिमानानं मिरवत आहेत. आपलं मूळ महाराष्ट्रात असल्याचं नजिकच्या काळात या मराठ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांना या मातीची, इथल्या माणसांची ओढ असणं सहाजिक आहे. मराठा क्रांती मोर्चाला बलुचिस्तानमधील मराठ्यांनी देऊ केलेला पाठिंबा त्याच भावनेतून आलेला आहे. बलुचिस्तानमधील मराठ्यांना किंवा मूळच्या बलुची जातींना पाकिस्तानबद्दल अजिबात जिव्हाळा नाही. पाकिस्तानमधून वेगळं होऊन स्वतंत्र राष्ट्र व्हावं, अशी या भागातील नागरिकांची इच्छा आहे. वेळोवेळी असे प्रयत्न झाले मात्र ते असफल ठरले. पाकिस्तानमधील प्रांतांपैकी बलुचिस्तान हा सर्वात मोठा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने सधन प्रांत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा बलुचिस्तानवर फक्त आणि फक्त अन्याय-अत्याचारच करत आलाय. या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी बलुचिस्ताननं मध्यंतरी भारताकडेही मदतीचा हात मागितला होता.