मराठी प्रथा
मराठ्यांचा महाराष्ट्र सुटला ते बलुचिस्तानमध्ये युद्धकैदी झाले, मात्र त्यांच्या चालीरिती आणि रुढी परंपरा काही सुटल्या नाहीत. आजही शाहू मराठ्यांमध्ये अनेक मराठी रुढी जशाच्या तशा पाळल्या जातात. लग्नातील विधी पाहिल्यावर हे अधिक स्पष्ट होतं. उदा. घाना भरणे, हळद, नवरदेवाची लग्नाआधीची अंघोळ, लग्नात उपरण्याने बांधलेली गाठ, ती सोडण्यासाठी बहिणीने पैसे उकळणे अशा प्रथा आजही बलुची मराठ्यांमध्ये आहेत. मराठीतील काही शब्दही बलुची मराठ्यांमध्ये कायम आहेत. आई हा त्यापैकीच एक शब्द. शाहू मराठे आईला याच नावाने हाक मारतात. मूळच्या बुगटी समाजाने हा शब्द स्वीकारला आहे. मराठी माणसांना टोपननाव ठेवण्याची भारीच हौस असते, शाहू मराठ्यांमध्ये बहुतेक जणांना टोपननावं आहेत. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात.