Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १३

देशमुख सर आणि ९ कॉन्स्टेबल नियंत्रण कक्षातून निघत दहशतवाद्यांवर गोळ्या झाडू लागले. हल्ला करणारा तरी कुठे गप्प बसेल? दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव झाला तो इतका कि स्टेशन परिसर हल्ल्याने हादरून गेला. जो तो मिळेल त्या जागी लपून बसला होता. बाहेर काय होतं आहे याचा अंदाज कुणालाही येत नव्हता.

दहशतवाद्यांना त्यांचा अतिउत्साह अंगाशी आला होता. आपल्यावर फायरिंग होणार नाही, असं समजून ते गाफील राहिले होते. त्यांना लपण्यासाठी कुठेही जागा नव्हती. नाही म्हणता वीस एक दहशतवादी पहिल्या राउंडमध्येच मारले गेले होते.

हल्ल्यामध्ये देशमुख सरांसोबतचे तीन कॉन्स्टेबल मारले जातात. त्यांच्याकडील गोळ्या देखील संपल्या होत्या. काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. युद्धात कधीही काहीही होऊ शकतं. ४ दहशतवादी छुप्या मार्गाने येऊन देशमुख यांच्यावर नेम धरणार तोच त्यांच्याही पाठीमागून एके-४७ चा आवाज ऐकू आला आणि चौघेही क्षणार्धात जमिनीवर कोसळले.

पाठीमागून येणाऱ्या दहशतवाद्यांना कोणी मारलं हे बघण्यासाठी देशमुख सर मागे वळले तर, हातात एके-४७ घेऊन अभिजीत उभा होता.

"म्हणालो होतो ना! मिलिटरी स्कूलमध्ये शिकलोय. आता रिझल्ट आणून दाखवू का?" हसतच अभिजीत म्हणतो. देशमुख सरांना त्याच्या धाडसाचा अभिमान वाटतो. ते काही बोलणार तोच दहशतवाद्यांचा समोरच्या बाजूने पुन्हा हल्ला सुरु होतो.

"सर, तुम्ही नियंत्रण कक्षात जा. तिथे अजून ५ एके -४७ आहेत. यांना मी बघतो." अभिजीत म्हणतो आणि दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला करू लागतो. देशमुख सर क्षणाचाही विलंब न करता नियंत्रण कक्षात जातात आणि बंदूक उचलतात. न राहवून ते रेल्वे स्थानकावर पुन्हा घोषणा करतात,

"माझ्या सर्व पोलीस मित्रांनो, तुम्ही आधीच अनेक कारणांनी त्रस्त आहात. रक्षक असून देखील अनेकांच्या मनात तुमच्याविषयी वाईट ग्रह आहेत. इतर देशांच्या तुलनेत तुम्ही निष्क्रिय आहात, असा लोकांचा समज आहे. तुमच्यावर असलेला निष्क्रियतेचा कलंक पुसण्याची हिच वेळ आहे. उठा, आणि सामना करा या नराधमांचा आणि दाखवून द्या, महाराष्ट्र पोलीस काय आहे ते. आज १५ ऑगस्ट आहे. हा दिवस आतापर्यंत स्वातंत्र्य दिन म्हणून सर्वांच्या लक्षात होता. पण यापुढे हा दिवस महाराष्ट्र पोलीसांच्या नावावर राहील, ज्यादिवशी त्यांनी १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला."

घोषणा शौचालयातील चौघांसह प्लॅटफॉर्मबाहेरून फायरिंग करणाऱ्या प्रत्येक पोलीसाला, आणि कल्याणहून आलेल्या इतर पोलिसांना ऐकू जाते. कुठूनतरी मोठ्याने आवाज येतो, "छत्रपती शिवाजी महाराज कि…." आणि संपूर्ण डोंबिवली स्थानकावर "जय" हा आवाज घुमतो.

आधी सर्व सूत्रे केंद्राकडे होती, पण आता ती महाराष्ट्राच्या लढवय्यांकडे जातात. स्वतःची तहान, भूक विसरून नागरिकांचं रक्षण करणारे आज स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांशी दोन हात करत होते.

पोलीसांमध्ये हुरूप कुठून चढत होता माहित नव्हतं. फायरिंग करताना ज्यांच्या बंदुकांमधील गोळ्या संपल्या होत्या ते सर्रास प्लॅटफॉर्मवर जाऊन एके-४७ घेत होते. काही पोलीस शहीद होते होते, काहींना गोळ्या लागत होत्या, पण पोलीसांचा प्रतिकार काही कमी होत नव्हता.

नियंत्रण कक्षातून बाहेर निघून देशमुख सर आणि अभिजीत निधड्या छातीने दहशतवाद्यांवर गोळ्या चालवत पुढे पावले टाकत होते. पोलिसांचा जोश आणि अनपेक्षित प्रतिकार पाहून शोएबच्या डोळ्यासमोर अंधारी येते. त्याला पोलीसांकडून असा प्रतिहल्ला अजिबात अपेक्षित नव्हता. त्याला आधीचं सगळं आठवू लागतं. पाकिस्तानमधील प्रशिक्षण, इराकमधली प्राध्यापकाने केलेली सूचना, श्रीलंकेमध्ये झालेलं स्वागत, भारतामध्ये सक्सेना सरांनी केलेला पाहुणचार यांपासून ते सकाळपासून होत असलेली दहशतवादी कारवाई, सगळं अगदी त्याच्या योजनेप्रमाणे होत होतं. इतक्या दिवसांत तो पहिल्यांदाच घाबरला होता. आपल्या सहकाऱ्यांना काय सूचना द्यायच्या हे त्याला सुचत नव्हतं आणि याच गोष्टीचा फायदा देशमुख सरांना होत होता.

डोंबिवली स्थानकावर होत असलेल्या कारवाईचं अपडेट रेल्वे आणि पोलीस मुख्यालयाला मिळत होतं. कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोवर कोणीही मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देत नव्हतं.

एकीकडे पोलीस शहीद होते होते तर दुसरीकडे दहशतवादी देखील मारले जात होते. देशमुख सर आणि अभिजीतचा उत्साह इतका असतो की ते दोघेही निर्धास्तपणे दहशतवाद्यांच्या दिशेने चाल करत गोळीबार करत होते. त्यांना इतर पोलीस कव्हर करत होते. पण नेमक्या दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचल्यावर त्यांच्याजवळील गोळ्या संपतात.

देशमुख सरांना बघताच ते एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत हे शोएबच्या लक्षात येतं. रॉचे मुख्य अधिकारी सक्सेनानंतर आता या वरिष्ठ अधिकाऱ्याचा खात्मा करू असं त्याच्या मनात येतं आणि तो विद्रूपपणे हसू लागतो.

"आ गये मौत के मूह में, अब जन्नत कि सफर कर लो।" असं म्हणत तो आपल्या उरलेल्या साथीदारांना देशमुख सर आणि अभिजीतवर हल्ला करायला सांगतो.

दोघेही मृत्यूसाठी तयार असतात. कोणीही मागे हटत नाही, बंदुका दोघांच्या दिशेने धरल्या जातात. शोएब मोठ्याने "हमला करो" म्हणतो आणि गोळ्या झाडल्या जातात. बस्स तो गोळ्या चालवण्याचा शेवटचा आवाज असतो, आणि नंतर एकच भयाण शांतता पसरते. अभिजीत आणि देशमुख सरांना काही समजत नाही. शोएब आणि त्याचे साथीदार जमिनीवर कोसळतात. त्यांचं संपूर्ण शरीर रक्ताने माखून जातं.

पोलीसांजवळच्या गोळ्या तर संपल्या होत्या, मग शोएबला नक्की मारलं कोणी? तो आणि त्याचे साथीदार जमिनीवर कोसळताच पाठीमागून मल्हार सर, अशोक, प्राजक्ता आणि वृषाली हातात एके-४७ घेऊन उभे दिसतात. आता ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्या या चौघांनीच. नाही म्हटलं तरी एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला एका वयस्कर माणसाच्या, एका मध्यमवर्गीय माणसाच्या आणि दोन मुलींच्या हातून शेवट झाला होता. शोएबच्या मृत्यूबाबत सक्सेना सरांचे शब्द खरे ठरले होते.

आता त्या भयाण शांततेमधून गमबुटांचा आवाज ऐकू येतो. बीएसएफ आणि लष्कर प्लॅटफॉर्मवर पोहोचतात. देशमुख सर एकाच ठिकाणी उभे राहून शोएबकडे बघत असतात. सर्व दहशतवादी मारले गेल्याची बातमी मुख्यालयात आधीच पोहोचली असते. प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही संपूर्ण घटनेचे साक्षीदार असतात, त्याचबरोबर रेल्वे आणि पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी देखील. आज त्या सर्वांनी पोलीस आणि सामान्य माणसाचा दहशतवाद्यांसोबतचा असामान्य लढा पाहिला होता.

"सर, आपण जिंकलो. आपण सर्व दहशतवाद्यांना मारलं सर. आपण करून दाखवलं." अभिजीत देशमुख सरांना म्हणतो आणि ते शुद्धीवर येतात. आजूबाजूला बघतात तर प्लॅटफॉर्मवर दहशतवाद्यांचे मृत शरीर एका ट्रकमध्ये भरले जात होते. मीडिया आणि मदतकार्य करणारे प्लॅटफॉर्मवर आले होते. मीडिया आज प्रश्नांचा अतिरेक करत नव्हती, ती घडलेला प्रकार आपल्या प्रेक्षकांना दाखवत पोलिसांच्या पराक्रमाचे गुणगान करत होती. प्लॅटफॉर्मवर असलेल्या मृतांना आणि जखमी प्रत्यक्षदर्शींना रुग्णालयात नेलं जात होतं. काही रेल्वे अधिकारी प्लॅटफॉर्मचं झालेलं नुकसान बघत होते. आणि हो, प्रत्येकजण पोलिसांना सलाम करत होते. हा सलाम दहशतीचा नव्हता, अभिमानाचा होता.

मल्हार सरांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी शोएबच्या शरीरातून आरपार झालेली संपूर्ण जगाने पहिली होती. एका शिक्षकाने हातात लेखणीऐवजी बंदूक हातात घेतली होती, वेळ आल्यावर शिक्षक काय करू शकतो हे मल्हार सरांनी दाखवले होते.

प्राजक्ताचा भाऊ गर्दीतून धावत त्या दोघींजवळ जातो. तो मारला गेला नव्हता. हॉटेलच्या बेसमेंटमध्ये तो सुरक्षित होता. तरीही त्या दोघींनी जे धाडस दाखवलं, ते व्यक्त करण्यासाठी कुणाकडेही शब्द नव्हते.

आपण जबाबदार झालो असल्याचं अशोकला पहिल्यांदाच जाणवलं. रक्तपात ही त्याच्यासाठी भयावह गोष्ट होती. पण वेळ आल्यावर त्याने आपल्या माणसांसाठी ते सुद्धा केलं. यू-ट्यूबवर त्याने स्वतः व्हिडियो बघितला. आधी स्वतः एके-४७ हाताळण्याचे बारकावे समजून घेतले आणि मग त्याने मल्हार सर आणि वृषाली-प्राजक्ताला ते समजावून सांगितले, म्हणून तर शोएब मारला गेला.

आपल्या पोलीसांनीच नाही, तर नागरिकांनी देखील दहशतवाद्यांविरोधात लढा दिल्याने भारताच्या पंतप्रधानांची ५६ इंचांची छाती अभिमानाने आणखी फुगली होती. कोणतंही राजकीय वक्तव्य न करता त्यांनी पोलीसांचे आणि लढ्यात सामील झालेल्या प्रत्येक वीरांचे आभार मानत कौतुक केले.

"आज डोंबिवलीमें हुए आतंकवादी हमले के बारे में आप क्या कहोंगे?" एक पत्रकार पंतप्रधानांना विचारतो.

"मेरे प्यारे देशवासीयो… सबसे पहले मै आतंकवादी हमले में शहीद हुये हर एक पुलिस पुलिस को तहे दिल से श्रद्धांजली अर्पित करता हुं। आज महाराष्ट्र में हुए आतंकवादी हमले से ना कि आतंकवादीयोंको, बल्के सारे हिंदोस्तान को एक अहम सबक मिला है। आतंकवाद से लढने के लिये ना कि हमारी पुलिस व्यवस्था, आर्मी सक्षम है। आम नागरिक ने यह दिखा दिया है के अगर वे चाहे तो वे भी आतंकवादीयों को मुंह तोड जवाब दे सकते है। आज स्वतंत्र दिन के अवसर पर उन्होने अपने पूर्वजों के बलिदान को दोहराते हुये फिर से हिम्मत दिखाई है। मैं सारे हिंदोस्तानीयों के तरफ से उन सभी बहादूरों को प्रणाम करता हूं।"

– समाप्त –

दहशतवादाला जात, धर्म नसतो.
दहशतवादी हा दहशतवादीच असतो.