Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - डिसेंबर २८

( गायत्रीपुरश्चरण झाल्यावर ब्रह्मवृंदासमोर झालेले प्रवचन. )

तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान, आणि पूज्य आहांत. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करुन ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे ! त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे.
वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबरच आहे, कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे. गायत्रीची उपासना करणार्‍या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहात असत. कंदमुळे हा त्यांचा आहार असे, इंद्रियसंयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती. परंतु आता काळ पालटला आहे. ज्या प्रकारचे जीवन ऋषिलोक जगत असत, त्यापैकी आपणाजवळ आता काहीच शिल्लक उरलेले नाही. ऋषींचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रियसंयम, सत्यनिष्ठा, यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे? त्या काळी ऋषींनी पर्जन्यसूक्त म्हटले की पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटले तर साधा वारादेखील सुटत नाही ! ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापालादेखील होती. जीवनाबद्दल पुर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पुर्ववत राहिलेली नाही, आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत, आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे. परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहाता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून ‘ नाम घ्या ’ असे सांगितले. नाम हे आगंतुक नाही. आदि-नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ‘ ॐ ’ चा ध्वनी केला, ते नाम होय. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की, आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे.

ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - डिसेंबर १ भगवंत - डिसेंबर २ भगवंत - डिसेंबर ३ भगवंत - डिसेंबर ४ भगवंत - डिसेंबर ५ भगवंत - डिसेंबर ६ भगवंत - डिसेंबर ७ भगवंत - डिसेंबर ८ भगवंत - डिसेंबर ९ भगवंत - डिसेंबर १० भगवंत - डिसेंबर ११ भगवंत - डिसेंबर १२ भगवंत - डिसेंबर १३ भगवंत - डिसेंबर १४ भगवंत - डिसेंबर १५ भगवंत - डिसेंबर १६ भगवंत - डिसेंबर १७ भगवंत - डिसेंबर १८ भगवंत - डिसेंबर १९ भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २२ भगवंत - डिसेंबर २३ भगवंत - डिसेंबर २४ भगवंत - डिसेंबर २५ भगवंत - डिसेंबर २६ भगवंत - डिसेंबर २७ भगवंत - डिसेंबर २८ भगवंत - डिसेंबर २९ भगवंत - डिसेंबर ३० भगवंत - डिसेंबर ३१