Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - डिसेंबर १३

देह म्हटला की ह्रदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा, देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत, आणि ह्रदय तेवढे बंद पडले, तर सर्व इंद्रिये शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. याउलट ह्रदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले, तरी उपचार करुन पुनः पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो; फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी, ह्रदय शाबूत असेल तर काम भागते. पण जर का ह्रदयच बंद पडले, तर मात्र सर्व काही संपलेच. नाम हे ह्रदयासारखे आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत. ‘ आता या जन्मात एवढे पुरे ’ हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळविण्याला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही ! याचे कारण, भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते. प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते; प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात.
एक प्रवासी होता. गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनवर न उतरता, गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला; आणि त्याच गाडीने तो पुनः परत आपल्या गावी आला ! त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चालला आहे. तुम्ही त्या प्रवाश्याप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी, संत्री, वगैरे फळे घ्या, म्हणजे इथे घरेबिरे बांधा, पण आपले स्टेशन विसरु नका. भगवंत हे आपले स्टेशन आहे. अलीकडे शास्त्रीपंडितसुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत. म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा, आणि नंतर पोथी-पुराणे ऐकावीत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही म्हणून, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात; असे करणे योग्य नाही. पोथ्या-पुराणांच्यामध्ये दोष नाही; पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान, हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.
आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी, आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे. बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरुर आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. ह्या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या ह्रदयात असते. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते, मंदिर आणि समाधी तारीत नाही. देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरुपता झाली, त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरुपता का होणार नाही?

ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - डिसेंबर १ भगवंत - डिसेंबर २ भगवंत - डिसेंबर ३ भगवंत - डिसेंबर ४ भगवंत - डिसेंबर ५ भगवंत - डिसेंबर ६ भगवंत - डिसेंबर ७ भगवंत - डिसेंबर ८ भगवंत - डिसेंबर ९ भगवंत - डिसेंबर १० भगवंत - डिसेंबर ११ भगवंत - डिसेंबर १२ भगवंत - डिसेंबर १३ भगवंत - डिसेंबर १४ भगवंत - डिसेंबर १५ भगवंत - डिसेंबर १६ भगवंत - डिसेंबर १७ भगवंत - डिसेंबर १८ भगवंत - डिसेंबर १९ भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २२ भगवंत - डिसेंबर २३ भगवंत - डिसेंबर २४ भगवंत - डिसेंबर २५ भगवंत - डिसेंबर २६ भगवंत - डिसेंबर २७ भगवंत - डिसेंबर २८ भगवंत - डिसेंबर २९ भगवंत - डिसेंबर ३० भगवंत - डिसेंबर ३१