Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - डिसेंबर १९

भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की, त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरुप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने, ‘ मी करतो, मी बोलतो, मी काव्य रचतो, ’ ही भावनाच त्यांना नसून, ‘ परमात्मा करतो, परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो ’ असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत. वेद हे खरे अपौरुषेयच आहेत. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहानलहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर शास्त्रे येतात. वेदान्ताच्या गोष्टी किंवा ज्ञान, हे पक्वान्नांच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदान्ताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदान्त हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदान्त अत्यंत कठीण करुन जगाला उगीच फसवितात. मग सामान्य माणसाला वाटते की, ‘ अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही ! ’ वास्तविक, वेदान्त हा सर्वांसाठी आहे. मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निःस्वार्थी बनणे, हेच खर्‍या वेदान्ताचे मर्म आहे.
भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करुन घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असतां ती तृप्त करुन घेण्यासाठीं देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे, हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या साहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरुप आहे. याच्या उलट, भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करुन घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे आहे. तेव्हा भगवंताचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुष्कळ वेळा, चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही; म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही. वासना ही दुसर्‍या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ ‘ वास ’ ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत्स्वरुपच होईल. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली.

ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - डिसेंबर १ भगवंत - डिसेंबर २ भगवंत - डिसेंबर ३ भगवंत - डिसेंबर ४ भगवंत - डिसेंबर ५ भगवंत - डिसेंबर ६ भगवंत - डिसेंबर ७ भगवंत - डिसेंबर ८ भगवंत - डिसेंबर ९ भगवंत - डिसेंबर १० भगवंत - डिसेंबर ११ भगवंत - डिसेंबर १२ भगवंत - डिसेंबर १३ भगवंत - डिसेंबर १४ भगवंत - डिसेंबर १५ भगवंत - डिसेंबर १६ भगवंत - डिसेंबर १७ भगवंत - डिसेंबर १८ भगवंत - डिसेंबर १९ भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २२ भगवंत - डिसेंबर २३ भगवंत - डिसेंबर २४ भगवंत - डिसेंबर २५ भगवंत - डिसेंबर २६ भगवंत - डिसेंबर २७ भगवंत - डिसेंबर २८ भगवंत - डिसेंबर २९ भगवंत - डिसेंबर ३० भगवंत - डिसेंबर ३१