Android app on Google Play

 

संग्रह ७

 

५१

पंढरीला जातां वाट लागे चिखलाची

संग सोबत इठलाची

५२

पंढरीला जाता वाट लागली मैलाची

जोडी पांढर्‍या बैलाची

५३

पंढरीच्या वाटं सोन्याचं सराट

इठुदेव माझं गेल्याती मराठं

५४

पंढरीला जातां वाट लागे कुसळाची

बोटं नाजूक मासुळीची

५५

पंढरीची वाट चालतां हलकी गेली

संगं, साधुनं कथा केली.

५६

पंढरीला जातां आडवं लागतं कुमठं

देव इठ्ठलाचा पुढं दिसतो घुमट

५७

पंढरीला जातां आडवं लागे सांगोलं

रूप देवाचं चांगलं

५८

पंढरीला जातां मधी लागते खरडी

संगं फुलाची दुरडी

५९

पंढरीला जातां आडवी लागे मानगंगा

माझ्या इठूला वर्दी सांगा

६०

पंढरीला जातां आडवी लागे उपळाई

त्याच्या भजनाची चपळाई

६१

पंढरीला जातां एक पायरी चुकले

आई रुकमीणीला चंद्रावळीला दीपले

६२

पंढरीला जात गरुडपारींत थोपले

इठुराया चंद्राला दीपले

६३

पंढरीला जाते, गरूडपारींत इसावा

दयाळु इठुराया, कधी भेटशी केशवा

६४

येथुन नमस्कार नामदेवाची पायरी

इठुदेवा माझ्या येवं राऊळाबाहेरी

६५

सावळी सुरत इठु माझ्या देखण्याची

देवळामंदी बारी बसली कोकन्याची

६६

रांगतरांगत गरुडखांब गाठीयेला

हरी बघुंसा वाटयेला

६७

पंढरीला जाते हांक मारीते महाद्वारी

पीर्तीचा पांडुरंग मला भेटून गेला हरी

६८

दरसनाला जाते वाट चुकले राउळाची

सावळ्या इठुच्या हाती परात फराळाची

६९

इठुच्या राउळी उभी र्‍हाईले बारीयेला

चिन्ता पडली हरीयेला

७०

पंढरीला गेले उभी राहिले रंगशीळे

इठू बोलतो, केव्हा आलीस ? ये ग बाळे

७१

दिस मावळला राउळाच्या मागं

मला राहावं म्हनत्यात इठुरुक्माई दोघं

७२

दिस मावळला राऊळाच्या आंत

मी राहावं, म्हून इठुरुक्माई धरी हात

७३

रात मला झाली पंढरीच्या बाजारात

इठुरुक्माई वाट बगती कमानी दरवाज्यांत

७४

पंढरीचा देव आडूशाच्या दाटणीला

माझ्या इठ्ठलाचं चरण येनाती वाटणीला

७५

पंढरीचा देव न्हाई कुनाच्या देव्हारी

दरसनाला सारी लोटली जव्हारी