Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

पंढरीच्या वाटे न्हाई लागत थंडीवारा

इठुदेव माझा हळूं नेतुंया माहेरा

जीवाला वाटतं पंढरीला जावं जावं

आईबापां भेटूं यावं बंधु पुंडलिका लूटावं

पांडुरंग पिता रुकमीण माझी बया

आषाढ वारियेला बंधु पुंडलीक आला न्याया

सया पुशित्यात , पंढरीत काय ?

पिता पांडुरंग, दाट जिव्हाळा रुक्माबाय

सांगुन पाठवते रुक्माबाई मावशीला

मला मूळ धाड बाई आखाडी बारशीला

सांगुन पाठवते, रुक्माबाई ननंदेला

कुंकवाचा पुडा धाड, हिरेजडीत फणी मला

विठ्ठल माझा पिता, रखुमाई माझी माता

हरला शीणभाग दोघांना ओव्या गातां

साळीच्या तांदुळाला आधण मोघामोघा

विठुसख्याच्या पंगतीला आली सखी चंद्र्भागा

पंढरीला जाया, आईबापाचं माझ्या पुण्य

अंगुळीला चंद्र्भागेचं पाणी ऊन

१०

देवा तुया देउळीं केव्हाची उभी मी हाई

इठुराया माझ्या , डोळे उघडुनी पाही

११

जल्ममरनाची किती करूं मी येरझार

इठुराया ठेव माझं वैकुंठी घरदार

१२

सपन पडियेलं काय सपनाची मात

माझं इठुरुक्माई उभं उशाशी सारी रात

१३

जीवाला जडभारी म्यां पांडुरंगाला केली तार

झालं हाईती गरुडावर स्वार

१४

पंढरपुरामंदी तिथं हाई माझी वग

तुळसीबागेमंदी राहे जिवलग

१५

अंतरीचं गुज माझ्या हृदयी दाटलं

सांवळा पांडुरंग कवा एकान्ती भेटंल ?

१६

इठु म्हनु इठु दिसतो केवढा

माझ्या भावंडाएवढा

१७

इठु म्हनु इठु झाडाच्या दाटणींत

देवाच्या भेटीपायी म्यां सोडिलं गणगोत

१८

जीवाला वाटतं पंढरीला जावं जावं

माझ्या इठुला पोटाशी धरुं यावं

१९

माझ्या इठ्ठलाला न्हाई काईबी लागत

त्येला माळबुक्याची आगत

२०

पंढरीला जाया न्हाई लागत मला रुक्का

देवा इठ्ठलाला पैशाचा माळबुक्का

२१

पंढरीला जाऊं इठ्ठला काय नेऊं ?

तुळशीची प्रीत वाहूं

२२

पंढरीला जाते , इठुला काय न्यावं ?

माळबुक्याची त्याला सवं

२३

पांडुरंग देव आडूच्या पलीकडे

दरसनासाठीं न्हाई पाहात जीवाकडे

२४

संगत करावी इठुसारख्या सजणाची

ओटींत माळबुका, शिडी चढावी चंदनाची

२५

घराला पाव्हना , पंढरीचा पांडुरंग

बसाया टाकते , आरशाचा चवरंग