Android app on Google Play

 

संग्रह ४

 

७२

पहिली माझी ओवी, पंढरीला पाठवा

देव निजलं, उठवा

७३

पहिली माझी ओवी, पंढरी ऐंकू गेली

इठुरुक्माई जागी झाली

७४

पहिली माझी ओवी, येशीच्या ऋषीला

अंजनीच्या कुशीला

७५

पहिली माझी ओवी गणेश मोरयाला

येवं चिंतन्या कार्याला

७६

पहिल्या ओवीला आलं शंकर धावूनी

संगं गिरजा घेऊनी

७७

पहिली माझी ओवी रामचंदर चांगल्याला

हुतं शितेच्या बंगल्याला

७८

पहिली माझी ओवी पहिल्या पानाची

सीता गाईली रामाची

७९

पहिली माझी ओवी ओवी सारंगधराला

रुक्माबाईच्या वराला

८०

दुसरी माझी ओवी दुधाची भावना

इनंती माझी इठुनारायेना

८१

तिसरी माझी ओवी, गाते यसुदेच्या कान्हा

जलमले कृस्नदेव तोडीला बंदिखाना

८२

तिसरी माझी ओवी अंजनाबाई गरतीला

पारावरल्या मारुतीला

८३

चौथी माझी ओवी, वैरीलं दळन,

माझ्या पांडुरंगा, गाईन धीरानं

८४

पांचवी माझी ओवी, गाते माझीया माहेरा

पांडुरंगाच्या पंढरीला गाईन निरंतरा

८५

पांचवी माझी ओवी गाते पावलापासून

इठुरुकमाई आलं रथांत बसून

८६

सहावी ओवी गाते, सहावा अवतार

देवा, पुरे पुरे संवसार

८७

सातवी माझी ओवी गाते मी सात ठायी

इठ्ठलाच्या चरनी चित्त लई

८८

सातवी माझी ओवी सात येळ येळा

देव पांडुरंग बसलासे डोळा

८९

आठवी माझी ओवी, आठवा आईतवार

देवसुर्व्याला नमस्कार

९०

नववी ओवी गाते, अंगनी तुळस कवळी

इठुबाची राही रुकमीनी जवळी

९१

नववी माझी ओवी, सरीलं दळन

देवा चुकव, संसारीचं मरन

९२

दहावी ओवी गाते, पाणी तुळसीला

नको पुन्हा येणं , संवसाराला

९३

अकरावी माझी ओवी, गाते आळंदींत

पंढरीला जातं चित्त

९४

बारावी माझी ओवी, बारा एकादशी

मला जाणं पंढरीशी

९५

बारावी माझी ओवी, साधुसंताच्या बायका

चालला हरीपाठ तुम्ही सयानु आयका