श्रीविठ्ठलवर्णन - भैरवी
भैरवी
( माधवे सखि माधवे )
(विठ्ठल पद)
( केशवकृत )
विठ्ठला, प्रभु, विठ्ठला, पाळिसि भक्तजनां सकलां ॥धृ०॥
उभा विटेवरी, कटींकर ठेवुनी, दावी सुंदर तवरुपाला ॥१॥
शिरीं वाहसी शंकर प्रभूला, दाविसी अनंत चमत्कृती लीला ॥२॥
भीमरथीच्या तटीं राहुनी, भक्तां मोहिसी त्रिभुवनपाला ॥३॥
पुंडलिकाची आज्ञामानुनी, तिष्टसी, नंद सुबाला ॥४॥
गोपाळपुरीं गोपांसम जाऊनि, खेळसी तूं दहिकाला ॥५॥
भजनी दिंडया जमुनी अर्पिती, ’रामकृष्णहरी’ सुपुष्प माला ॥६॥
गरुड हनूमान् सन्मुख असती, कवटाळिति जन, गरुड खांबाला ॥७॥
सुमनें तुळसी दलसमृद्धी । पाहुनि तोष मनाला ॥८॥
राधा रुक्मिणी सत्यभामा, दूर उभ्या, रुसुनी गोपाला ॥९॥
कान धरुनी गिरकी घेऊनी प्रेमें मारिती उंच उडीला ॥१०॥
नामदेवाची पायरी स्पर्शुनी, प्रवेश करीं मंदिरद्वाराला ॥११॥
पंढरिला वैकुंठ बनवीसी, विष्णु, कृष्ण, तो विठ्ठल सजला ॥१२॥
पांडुरंगदेवाला प्रार्थी, अखंड दे दर्शन दासाला ॥१३॥
नगर प्रदक्षिणा पुण्य बहुतची, शक्यतरी साधि योगाला ॥१४॥
नामदेव तुकाराम, भक्त शिरोमणी, प्रसन्न होसी या जोडीला ॥१५॥
चंद्रभागेच्या एका स्नानें, भक्त जन उद्धरला ॥१६॥
(श्र्लोक)
एके दिनीं अद्भुत होई मोठें, राऊळिंचा देवचि जाय कोठें ।
आळंदिसी जाऊनी तो प्रतिष्ठे, मानी तसें वांढचि स्वप्रतिष्ठें ॥१७॥
(भैरवी)
कार्तिक मासीं कृष्ण हरि दिनी, इंद्रायणिचे तीरीं गेला ॥१८॥
श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या, समाधि दर्शनीं गढला ॥१९॥
स्वग्रामाहुनी आळंदि येऊनी, संतागौरव केला ॥२०॥
देव स्वयें हा असुनी विठ्ठल, संतदर्शनीं रमला ॥२१॥
आषाढमासीं असाच येई धरुनी त्या हेतूला ॥२२॥
’विठ्ठल, विठ्ठल’ ऐसें जपुनी मुक्तिलाभ हा झाला ॥२३॥
विठ्ठला प्रभु विठ्ठला ।
श्री.
धन्य धन्य पुंडलीका, तरणोपाय केला लोकां
एका दर्शनें उद्धार, केले पावन चराचर ॥१॥
चंद्रभागा पंढरपूर, भक्त आणि हरिहर ॥२॥
निळा म्हणे सुलभ केलें । भूमि वैकुंठा आणिलें ॥३॥
अचळ धरा जैसे पीठ । पायांखालीं मिरवे वीट ॥१॥
दोन्ही पाऊलें समान । योगियांचे जैसे नयन ॥२॥
जानुजंघ ते स्वयंभ । जैसे कर्दळीचे स्तंभ ॥३॥
कशियेलें पीतवसन । झळके विद्युल्लतेसमान ॥४॥
शेष बैसला वेटाळा । तैसा कटी-बंध, मेखळा ॥५॥
समुद्र खोलीये विशाळ । तैसें नाभीचें मंडळ ॥६॥
तुळशी मंजरिया गळां । जैशा सुटल्या मेघमाळा ॥७॥
दिग्गजाचे शुंडादंड । तैसें कटीं, कर-प्रचंड ॥८॥
पूर्णिमेचा उदो केला । तैसा मुखचंद्र शोभला ॥९॥
जैशीं नक्षत्रें झमकती । तैशीं कुंडलें चमकती ॥१०॥
सूर्य मिरवे नभमंडळा । तैसा केशराचा टिळा ॥११॥
क्षीराब्धींचे चंचळ मीन । तैसे नेत्रीं अवलोकन ॥१२॥
जैसें मेरुचें शिखर । तैसा माथां मुकुट स्थिर ॥१३॥
इंदुप्रकाशें वेढीला । तैसा क्षीरोदकें वेष्टिला ॥१४॥
तृप्तिलागीं चातक पक्षी । निळा तैसा ध्यानलक्षीं ॥१५॥
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ।
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ।
संता महंता होतील भेटी । आनंदें नाचूं वाळुवंटीं ।
तेथें तीर्थांचें माहेर । सर्व सुखांचें भांडार ।
जन्म नाहीरे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥
सुंदर तें ध्यान उभा विटेवरी । कर कटीवरी ठेवोनियां ॥
मकर कुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणी विराजित ॥
गळां तुळशीहार । कांसे पितांबर । आवडे निरंतर ध्यान तेंचि ॥
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥
पांडुरंग श्रीरंग, भजोरे मना ।
भजोरे मना बा भजोरे मना,
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥ध्रु०॥
अमोलिक जाते वय, आतां तरी धरी सोय ।
ऐसा कैसा मानव देह, येईल पुन्हां बा येईल पुन्हा ॥
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥१॥
रात्रंदिन करिसी मजा । केव्हां येईल यमराजा ।
घेऊन जाईल प्राण तुझा यमसदना, बा यमसदना ॥
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥२॥
विषयाचें सुख द्वाड । येथें वाटे बहु गोड ।
पुढें आहे अवघड । यमयातना, बा यमयातना ।
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥३॥
नामा म्हणे एक करा । हरिचरण दृढ धरा ।
चुकेल चौर्याशींचा फेरा । तुझीया प्राणा ।
बा तुझीया प्राणा । पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥४॥
उभा चला पाहूं । तुलसी माळ गळां वाहूं । विठोबा उभा ॥
उभा विटेवरी दोन्ही कर कटेवरी । विठोबा उभा ॥
उभा राऊळांत । विठोबा पंढरपुरांत । विठोबा उभा ॥
उभा वाळुवंटीं त्याचे चरणीं घालुं मिठी । विठोबा उभा ॥१॥