श्रीविठ्ठलवर्णन
नमो चंद्रभागातटीं-संनिवेशा । नमो पुंडलीकार्पित प्रेमपाशा ॥
नमो रुक्मिणीप्राणदा, पंढरीशा । नमो विठ्ठला, पांडुरंगा परेशा ॥१॥
नमो विठ्ठला रुक्मिणीच्या सुरंगा । नमो राधिका सत्यभामा वरांगा ॥
परब्रह्म तूं पंढरीनाथ गंगा । करी शुद्ध दासा उठीं पांडुरंगा ॥२॥
नमो विठ्ठला, पंढरीनाथ, देवा । शिरीं वाहसी शंकरा आदिदेवा ॥
सदा चंद्रभागातटीं वास व्हावा । महा पुंडलीकासमेत स्मरावा ॥३॥
"विठोबा रखूमाई" घोषमात्रें । भरे दिव्य मंदीरही, भक्त-वक्त्रें ।
कुपात्रा सुपात्रा मिळे मुक्ति स्तोत्रें । अशा त्या कटी-हस्तिं, सामर्थ्यमंत्रें ॥४॥