श्रीज्ञानेश्वर महती
अजान वृक्षासि महत्त्व ऐसें । तत्पर्ण भक्षील, अज्ञान नासे ॥
त्वग्रोम होतील बरे क्षणांत । देहात्मबुद्धीहि लयासी जात ॥१॥
भूमीवरी गलितपर्ण असे जरी । घेईं तरीच न तोडिं तरुवरी ।
तोडीनवें तरि ज्वरादि बहू विकार । दुष्टाहि व्याधि जडती शरिरींच फार ॥२॥
सुवर्ण-अश्वत्थ तरुसि घाली । प्रदक्षिणा, लक्ष तरीच वाली ॥
ज्ञानेश, त्यासीच सुपुत्र देतो । तो भक्त-संकल्प संपूर्ण होतो ॥३॥
सिद्धेश्वर प्रभु असेचि स्वयंभु स्थान । प्रत्यक्ष शंकर तिथें वसतोच जाण ॥
तत्रैक घेतलि समाधि गुरुनीं म्हणून । नान्या स्थला वचति हे चि, तयाचि खूण ॥४॥
ज्ञानेश-भगवंत-समाधि वास । तत्स्थान पावित्र्य कळे जनांस ।
श्रीविष्णु लक्ष्मीसि जिथें निवास । वैकुंठ तें येथ उभेंचि खास ॥५॥
आर्या
डोळे भरुनी पाही, समाधिही भक्तवर्य तूं आतां ।
म्हणजे वाटे येथुनि हालवेंना मुळींच बा ताता ॥६॥
श्र्लोक
प्रदक्षिणापंथिं बसेचि मुक्ता । ही आदि माया, परि, व्यक्त भक्तां ॥
इजशीं करीं तुं विनय प्रणाम । "ज्ञानेश ज्ञानेश" वद संत नाम ॥७॥
आर्या
बुक्का वाहि समाधीवरि, कर्पुर लाविं, सन्निधिं समोर ।
देवा सुगंध घ्याया, ज्ञान-प्रकाशा, तमासि ना, थार ॥८॥
श्र्लोक
श्रीफळा सुमनें तुलसीदल । दक्षिणा मग अर्पुनि, निर्मळ ॥
अंतरंग, मग प्रार्थिंच "दर्शना । नित्य देईं मला शुचि भावना " ॥९॥