बाजीरावकालीन दौडीचा वेग
घोडदळ हा त्याकाळातल्या लढाईचा आत्मा. मंगोलियन योद्धे घोडय़ावर मोठे होतात असं म्हटलं जायचं. तसाच बाजीराव घोडय़ावर मोठा झाला. तो त्याच्या काळातला सर्वोत्तम घोडेस्वार होता. त्याच्या शिपायांसोबत तो घोडय़ावर सर्वात पुढे असायचा. घोडय़ावरच पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत फाके मारत बाजीराव सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही.
बाजीरावाचे प्रमुख बलस्थान होते.
त्याचे घोडदळ. त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत
असत. मात्र बाजीरावाने आपल्या घोडदळाचा वेग विक्रमी ठेवला होता.
चिमाजी आप्पा १७३३ मध्ये ग्वाल्हेरच्या स्वारीहून परत आला तेव्हा बुंदेलखंडातील राजगडापासून पुण्यापर्यंतचे मुक्काम, रोज किती कोस चालत याच्या आकडय़ासह पेशवे दप्तरात पृ. १२२५-६ वर दिलेले आहेत. त्यावरून (कोस म्हणजे २ मैल धरून) राजगड (सिप्री नजीक) पासून बऱ्हाणपुरापर्यंत ३३४ मैलांचा प्रवास चिमाजीच्या सैन्याने २४ दिवसांत केला. याचा अर्थ एक दिवसांत सरासरी १४ मैलांची मजर हे सैन्य मारत असे. पुढे बऱ्हाणपुरापासून पुण्यापर्यंतचा ३०६ मैलांचा प्रवास त्याच सैन्याने २१ दिवसात केला. म्हणजे सरासरी दिवसास १५ मैल हे मान पडते. या ४५ दिवसात कमीतकमी प्रवास एखाद्या दिवशी ४ मैल तर एखाद्या दिवशी जास्तीत जास्त २० मैल असा केलेला आढळतो.
बाजीरावाचे वडील बाळाजी विश्वनाथ
यांच्या सैन्याने ११ मैलाने प्रवास केल्याची नोंद आहे. मात्र १७३८मध्ये बाजीरावाने
आगऱ्यापासून दिल्लीपर्यंतचा १२५ मैलांचा प्रवास शत्रूस चाहूल लागू न देता आडवाटेने
अवघ्या १० दिवसात केला होता. म्हणजे दिवसाला १२ मैलाहूनही अधिक वेगाने. मात्र
दिल्लीहून जयपुरापर्यंत शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी तो झपाटय़ाने प्रवास करत
होता. तेव्हा १८० मैल ८ दिवसात म्हणजे दिवसाला २५ मैल हा बाजीरावाचा वेग होता. तो
त्या काळातला जास्तीत जास्त होता.