Get it on Google Play
Download on the App Store

समाधीची दुरवस्था

बाजीरावाच्या राज्यविस्ताराच्या मोहिमेचा पुढच्या इतिहासावर असा सुयोग्य परिणाम झाला, याचं आकलन आज आपल्याला होऊ शकतं. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कधी पोहोचलंच नाही. मराठय़ांच्या इतिहासातला हा रांगडा पंडितप्रधान उपेक्षित राहिला.


वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदाची वस्त्रं ल्यायलेल्या बाजीरावाला आयुष्य मिळालं केवळ ४० वर्षांचं. अवघ्या वीस वर्षांच्या त्याच्या कारकीर्दीत तो मुलुखगिरीसाठी अधिककाळ बाहेर राहिला. त्याचा अंतही माळव्यातल्या नर्मदातटावरच्या रावेरखेडीला झाला.२८ एप्रिल १७४० रोजी (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) उष्माघाताने बाजीरावाचं निधन झालं. त्यामुळे मराठी मनाने या योद्धय़ाचं अपेक्षित ऋण मान्य करताना बराचसा कद्रुपणा दाखवला. बाजीरावाचा संदर्भ आता अचानक येण्याचं कारण या उपेक्षेचंच. 

         

बाजीरावाच्या विरहाने त्याच्यासोबत एका हत्तीने आणि घोडय़ानेही अन्नपाणी वज्र्य करत प्राण सोडला. बाजीरावासह प्राण सोडलेल्या हत्तीची आणि घोडय़ाची थडगीही नर्मदेच्या पात्रात आहेत. जिथे बाजीरावाला अखेरचा निरोप दिला गेला तिथे नर्मदातटावर नानासाहेबाने ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावाची वृंदावन स्वरूपातील एक समाधी बांधली. बाजीरावाच्या अस्थि या समाधीस्थळी असल्याचं बोललं जातं.


ज्या बुंदेलखंडाची लाज वाचवायला बाजी धावून गेला, त्या बाजीचीच लाज राखण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटानं दिल्ली काबीज केली आणि इराणपर्यंतच्या पातशाह्या हलवल्या, त्या जगातल्या एकमेव अजेय, अपराजित योद्धय़ाची समाधी बुडिताखाली जातेय आणि आपण सारे या इतिहासाचा आणि परंपरेचा वारसा सांगणारे इथे मनगटं चावत बसलोय.