Get it on Google Play
Download on the App Store

श्रीनामदेवचरित्र - अभंग ३६११ ते ३६३२

३६११.

उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥

मानसी तुम्ही नका करुं दु:ख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥

एका जनार्दनीं राजाईची वाणी । ऐकतांच मनीं संतोषले ॥३॥

३६१२.

ऐसे कांही दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें ॥१॥

नाम्यासी चौघे पुत्र पैं जाहले । नाम तें ठेविलें विठ्ठलरायें ॥२॥

एका जनार्दनीं भक्ताचा सोहळा । दावितसे डोळां उघड ऐका ॥३॥

३६१३.

नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं ॥१॥

नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥

एका जनार्दनीं कायावाचामन । वेधलेंसे जाण विठ्ठलचरणीं ॥३॥

३६१४.

नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥

म्हणोनियां प्रिय देवासी पैं जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥

एका जनार्दनीं एकविधा भक्ति । तेथें राबे मुक्ति निशिदिनीं ॥३॥

३६१५.

एकविध वाचे नामयासी छंद । पैं नोहे भेद आन कांहीं ॥१॥

संसारयातना दु:खाचें डोंगर । परि देवाचा विसर नाहीं मनीं ॥२॥

म्हणोनियां देव धांवे मागें मागें । सुख त्याचे संगें देवा होय ॥३॥

एका जनार्दनीं भक्त सुखासाठीं । हिंडे पाठोपाठीं देवराव ॥४॥

३६१६.

नामयाची जनी दासी पैं म्हणती । भावें तो श्रीपती वश केला ॥१॥

दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा पाहे निवाडा तो ॥२॥

एका जनार्दनीं नामयाची दासी । प्रिय ते देवासी जाहली असे ॥३॥

३६१७.

नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना ॥१॥

नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र । जन्मले पवित्र हरिभक्त ॥२॥

आउबाई लेकी नाउबाई बहिणी । तिहीं चक्रपाणी वेधियेला ॥३॥

लाडी आणि येसी बहिना साकराई । एका जनार्दनीं पाही वंशावळी ॥४॥

३६१८.

नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथें ॥१॥

उभयतां बैसोनि केलासे एकान्त । आपदा आमुची होत संसारात ॥२॥

तुम्हांसी तों देवें द्रव्य दिलें फ़ार । वस्त्र अलंकार शोभताती ॥३॥

एका जनार्दनीं बोलोनियां गोठी । होत असे कष्टी राजाई ते ॥४॥

३६१९.

येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं ॥१॥

आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करुं त्याची ॥२॥

एका जनार्दनीं करुनि विचार । परीस तो साचार घेऊनि आली ॥३॥

३६२०.

येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां ॥१॥

आजाचिये दिन ठेवीं आपुले घरीं । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥

सरलिया काम देईं मजलागीं । म्हणोनियां वेगें गृहां आली ॥३॥

एका जनार्दनीं झाली ऐसी मात । नामयासी श्रुत केली नाहीं ॥४॥

३६२१.

येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥

राजाई तो पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें आपुले घरी ॥२॥

जातां चंद्रभागें परीस सांपडला । आपुला तो गेला दैन्यकाळ ॥३॥

एका जनार्दनीं ऐकोनियां मात । क्रोधें पैं संतप्त मनीं नामा ॥४॥

३६२२.

राजाईस तेव्हां म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं ॥१॥

आम्ही हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी घरीं वसे ॥२॥

कृपावंतें मज नाहीं उपेक्षिलें । आम्ही का वहिले दैन्यवाणें ॥३॥

एका जनार्दनीं बोलोनियां मात । गेला राउळांत तेव्हां नामा ॥४॥

३६२३.

जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे ॥१॥

राजाईनें त्वरें आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करीं ॥२॥

जाऊनि चंद्रभागे टाकूनियां दिला । नामदेव आला राउळासी ॥३॥

एका जनार्दनीं मस्तक चरणीं । ठेवूनि विनवणी करी नामा ॥४॥

३६२४.

आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी ॥१॥

आवडीनें नामा सांगे । पांडुरंग हांसूं लागे ॥२॥

आमुचा दैन्यकाळ । गेला म्हणती सकळ ॥३॥

एका जनार्दनीं मात । नामा देवासी सांगत ॥४॥

३६२५.

देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज ॥१॥

हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥

ऐसें प्रेमभरीत बोलताती दोघे । तों राजाई ती मागें त्वरें आली ॥३॥

घालूनि दंडवत देवासी आदरें । नामयासी उत्तरें बोलतसे ॥४॥

एका जनार्दनीं मागावया परीस । परिसा घरास त्वरित आला ॥५॥

३६२६.

येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई ॥१॥

राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावें राउळासी ॥२॥

तुम्ही बसा घरीं मी जातें राउळीं । म्हणोनियां वेगीं आली राउळासी ॥३॥

घालूनियां नामा दंडवत देवा । सांगितला भाव सर्व मनींचा ॥४॥

एका जनार्दनीं नामदेव बोले । परिसा टाकियेलें चंद्रभागें ॥५॥

३६२७.

राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा ॥१॥

परीस देणें झडकरी । परिसा उभा असे द्वारीं ॥२॥

ऐकतांचि ऐसी मात । आलें भीमेसी धांवत ॥३॥

पुंडलीकासी नमस्कार । केला जयजयकार नामघोष ॥४॥

एका जनार्दनीं स्नान । नामा करितसे जाण ॥५॥

३६२८.

करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हातीं ॥१॥

घेउनी परीस सांगे परिसासी । तुझा निश्चयेंसी वोळखून घेईं ॥२॥

ऐकतांचि ऐसें नामयाचें बोलणें । परी कर जोडून विनवितसे ॥३॥

ऐसा आनंदसोहळा होतसे संपूर्ण । आनंद निमग्न सर्व जाहले ॥४॥

एका जनार्दनीं आनंद पैं जाहला । आनंदानें गेला परिसा घरीं ॥५॥

३६२९.

धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥

प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥

कवित्व केलें शतकोटी । तारिले जीव कल्पकोटी ॥३॥

देव जेवीं सवें । ऐशी ज्याची देवासवें ॥४॥

धन्य धन्य नामदेवा । एका जनार्दनीं चरणीं ठेवा ॥५॥

३६३०.

जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥

चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥

लाडका तो नामा समाधी महाद्वारीं । समदृष्टी हरी वरी त्याची ॥३॥

पाळोनियां लळा समाधी ठेविला । एका जनार्दनीं झाला आनंदमय ॥४॥

३६३१.

लडिवाळ नामा विठोबाचा दास । तयाचे चरणां दंडवत ॥१॥

भक्त शिरोमणी लाडका डिंगर । आवडता फ़ार विठोबाचा ॥२॥

कवित्व करुनी तारिलें सकळ । निरभिमानी निर्मळ सदोदित ॥३॥

नामावांचुनी कांहीं नेणें तो नामा । तयाचा तो प्रेमा पांडुरंगीं ॥४॥

ऐसिया संतांसीं नमन माझें भावें । एका जनार्दनीं जावें वोवाळुनी ॥५॥

३६३२.

पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उध्दव प्रसिध्द कृष्णावतारीं ॥१॥

कलीमाजीं जाणा नामदेव म्हणती । लडिवाळ श्रीपति लळा पाळी ॥२॥

तीर्थयात्रा सर्व केलासे उध्दार । सर्व त्याचा भार चालविला ॥३॥

लडिवाळ नामा विठ्ठलचरणीं । एका जनार्दनीं नमन त्यातें ॥४॥