गुढी पूजनाची योग्य वेळ
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.