श्रीमहानुभव
महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.