टेंबेस्वामी
श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.