दत्त संप्रदायाची भूमिका
‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच मांडण्यात आली आहे. श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.