अश्वत्थामा
काही लोक मानतात की अश्वत्थामा हा महाभारताच्या युद्धातील सर्वांत मोठा खलनायक होता कारण त्याच्याच अप्रत्यक्ष संचालानाखाली युद्ध चालले होते. युद्धात सर्वांत शक्तिशाली असा तोच एक योद्धा होता. गुरु द्रोण यांचा पुत्र अश्वत्थामा युद्धाच्या संपूर्ण कलांचा ज्ञाता होता. त्याला संपूर्ण वेद आणि धर्मशास्त्र यांचे ज्ञान होते. द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांना प्रत्येक प्रकारची विद्या शिकवली होती, परंतु काही विद्या अशा होत्या ज्या केवळ अश्वत्थामाला माहित होत्या.
महाभारताच्या युद्धात अश्वत्थामा कौरव सेनेचा सेनापती होता. त्याने भीमाचा पुत्र घटोत्कच याचा पराभव केला आणि घटोत्कचाचा पुत्र अंजनपर्वा याचा वध केला. याव्यतिरिक्त द्रुपदकुमार, शत्रुंजय, बलानीक, जयानीक, जयाश्व आणि राजा श्रुताहु यांचा देखील वध केला होता. त्याने कुंतिभोजच्या १० पुत्रांचा देखील वध केला.
जेव्हा अश्वत्थामा आणि द्रोणाचार्य या पिता-पुत्राच्या जोडीमुळे महाभारताच्या युद्धात पांडव सेना भयभीत झाली आणि त्यांचे नियंत्रण हरवू लागले तेव्हा कृष्णाने युधिष्ठिराला कपटनीतीचा सहारा घ्यायला सांगितले परंतु युधिष्ठीर या गोष्टीला तयार झाला नाही. सर्वांनी सांगितले तेव्हा कुठे युधिष्ठिराने ऐकले.
या योजनेच्या अंतर्गत युद्धभूमीवर अशी बातमी पसरवण्यात आली की 'अश्वत्थामा मारला गेला.' गुरु द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला या गोष्टीची सत्यता विचारली कारण त्यांना माहित होते की धर्मराजा कधीही खोटे बोलणार नाही. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले, की "होय, अश्वत्थामा मारला गेला, परंतु हत्ती."
जेव्हा युधिष्ठिराच्या तोंडून "हत्ती" शब्द निघाला, त्याच वेळी श्रीकृष्णाने जोराने शंखनाद केला, ज्याच्या आवाजात द्रोणाचार्यांना युधिष्ठिराचा शेवटचा शब्द ऐकू आला नाही आणि आपला प्रिय पुत्र अश्वत्थामा याच्या मृत्यूची बातमी ऐकून ते हताश झाले आणि त्यांनी आपले शस्त्र त्यागले आणि युद्धभूमीवर डोळे बंद करून अत्यंत दुःखी अवस्थेत जमिनीवर बसले.
गुरु द्रोणाचार्यांना या अवस्थेत पाहून द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न याने तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला. हो युद्धातील सर्वांत भयंकर घटना होती. या कपटाच्या खेळीने अश्वत्थामा भयंकर चिडला.
द्रोणाचार्यांचा वध झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामाने पांडवांवर नारायण अस्त्राचा प्रयोग केला ज्यामुळे पांडवांची संपूर्ण सेना मारली गेली. कृष्णाने पांडवांना सांगितले की तुम्ही ताबडतोब रथातून खाली उतरून या नारायण अस्त्राला शरण जा, तोच यातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. यावर सर्व पांडव जमिनीवर गुढगे टेकून हात जोडून बसले, आणि नारायण अस्त्राचा विरोध न करूनही सर्वजण बचावले.
हा युद्धाचा अंतिम चरण सुरु होता. दुर्योधनाचा जीव धोक्यात आला होता. तो भिमाशी गदा युद्धात हरला होता. दुर्योधनाच्या या पराभवासोबतच पांडवांचा विजय निश्चित झाला होता. पांडव गोटातील सर्व लोक विजयाचा आनंद साजरा करत होते. अश्वत्थामा दुर्योधनाची ही परिस्थिती पाहून आणखीनच दुःखी झाला.
एक घुबड रात्री कावळ्यांवर हल्ला करून सर्व कावळ्यांना मारून टाकतो. ही घटना पाहून अश्वत्थामाच्या मनात देखील असाच विचार आला आणि त्याने घोर काळरात्री कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या सहाय्याने पांडवांच्या शिबिरात जाऊन तिथे झोपलेल्या पांडवांच्या ५ पुत्रांना पांडव समजून त्यांचा शिरच्छेद केला. या घटनेने दृष्टद्युम्न जागा झाला तेव्हा अश्वत्थामाने त्याचा देखील वध केला.
अश्वत्थामाच्या या कुकर्माची सर्वांनीच निंदा केली. आपल्या पुत्रांचा मृत्यू झालेला पाहून द्रौपदी आक्रोश करू लागली. तिचे दुःख पाहून अर्जुनाने त्या नीच कर्म खुनी ब्राम्हण पुत्र अश्वत्थामाचा शिरच्छेद करण्याची प्रतिज्ञा केली. अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून अश्वत्थामा पळून गेला, तेव्हा श्रीकृष्णाला आपला सारथी बनवून आणि आपले गांडीव धनुष्य घेऊन अर्जुनाने त्याचा पाठलाग केला. अश्वत्थामाला कोणतेही सुरक्षित स्थान सापडले नाही तेव्हा घाबरून जाऊन त्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला.
नाईलाजाने अर्जुनालाही ब्रम्हास्त्र चालवावे लागले. ऋषींच्या प्रार्थनेला मान देऊन अर्जुनाने आपले ब्रम्हास्त्र मागे घेतले, परंतु अश्वत्थामाने आपले ब्रम्हास्त्र अभिमन्यूची विधवा उत्तरा हिच्या गर्भाकडे वळवले. तेव्हा कृष्णाने आपल्या शक्तीने उत्तराच्या गर्भाचे रक्षण केले.
शेवटी कृष्ण अर्जुनाला म्हणाला, "धर्मात्मा, निद्राधीन, बेसावध, मस्तवाल, वेडा, अaज्ञानी, रथहीन, स्त्री आणि बालक यांना मारणे धर्मानुसार वर्जित आहे. याने धर्माच्या विरुद्ध आचरण केले आहे, झोपलेल्या निरपराध बालकांची हत्या केली आहे. जिवंत राहिला तर पुन्हा पाप करेल. तेव्हा ताबडतोब त्याचा वध करून त्याचे कापलेले मस्तक द्रौपदीच्या समोर ठेवून आपली प्रतिज्ञा पूर्ण कर."
श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून देखील अर्जुनाला आपल्या गुरुपुत्राची दया आली आणि त्याने अश्वत्थामाला जिवंतच पकडून शिबिरात नेऊन द्रौपदीच्या समोर उभे केले. एखाद्या पशुप्रमाणे बांधून ठेवलेल्या गुरुपुत्राला पाहून द्रौपदी म्हणाली, "हे आर्यपुत्र, हा गुरुपुत्र आणि ब्राम्हण आहे. ब्राम्हण नेहमीच पूजनीय असतो आणि त्याची हत्या करणे पाप आहे. तुम्ही याच्या वडिलांकडून अपूर्व असे शस्त्रास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले आहे. पुत्राच्या रूपाने आचार्य द्रोणच आपल्या समोर बंदी बनून उभे आहेत. याचा वध केल्यास याची माता कृपी देखील माझ्या प्रमाणेच कातर होऊन पुत्रशोकाने आक्रोश करेल. पुत्रावर विशेष लोभ होता म्हणूनच तर ती द्रोणाचार्यांच्या बरोबर सती गेली नाही. कृपीचा आत्मा निरंतर मला दोष देत राहील. आणि याचा वध केल्याने माझे पुत्र तर परत येणार नाहीत. तेव्हा तुम्ही याला मुक्त करा."
द्रौपदीचे हे धर्मयुक्त बोलणे ऐकून सर्वांनीच तिची प्रशंसा केली. यावर कृष्ण म्हणाला, "अर्जुना, शास्त्रानुसार पतित ब्राम्हणाचा वध देखील पाप आहे आणि दोषी व्यक्तीला दंड न करणे देखील पाप आहे. तेव्हा तू तेच कर जे योग्य आहे."
त्याला काय सांगायचे आहे ते समजून अर्जुनाने आपल्या तलवारीने अश्वत्थामाच्या डोक्यावरचे केस कापून टाकले आणि त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला. मणी काढल्यामुळे तो श्रीहीन झाला. नंतर कृष्णाने अश्वत्थामाला ६ हजार वर्षे भटकत राहण्याचा शाप दिला. शेवटी अर्जुनाने त्याला तशाच अपमानित अवस्थेत शिबिरातून घालवून दिले.