Android app on Google Play

 

कॅनॉल बांधण्यामागचा हेतू

 

आतां सुएझ कालव्याकडून पुन्हा एरी कॅनालकडे वळूं.इंग्लंड व युरोपांत इतरत्रहि माल वा प्रवासी वाहतुकीसाठी कालवे बनवण्याची पीठिका होती. कालव्यांतून सपाटतळाच्या बोटी किंवा तराफ्यांतून मालवाहतूक फार स्वस्त पडते कारण कालव्याच्या काठावर बनवलेल्या निरुंद रस्त्यावरून घोड्याच्या सहायाने वा माणसांकडून अशी होडी वा तराफा ओढून नेणे सोपे जाते. त्या काळात रस्ते फारसे चांगले नसल्यामुळे घोड्यांनी वा बैलांनी ओढण्याच्या गाड्यांतून वा त्यांच्या पाठीवर लादून होणारी मालवाहतूक महाग व वेळखाऊ होत असे. इंग्लंडात एका कोळशाच्या खाणीपासून शहरापर्यंत कोळसा वाहून नेण्यासाठी खाण मालकाने 1761 साली बांधलेला खासगी मालकीचा कालवा (bridgewater canal) उपयुक्त व फार फायदेशीर ठरला होता व त्यानंतर असे अनेक कालवे इंग्लंडात व युरोपांत बनले होते. त्याच धर्तीवर एरी कॅनाल बनवण्याची कल्पना पुढे आली. मात्र एवढा लांब कालवा कोठेच बनलेला नव्हता. अमेरिकेतील सुरवातीच्या सर्व वसाहती अटलांटिकच्या किनार्यापासच्या भागांत झाल्या व हळूहळू वस्ती आणि शेती पश्चिमेकडे वाढत गेली. पण उत्तर-दक्षिण पसरलेल्या अपेलेशियन डोंगरांची रांग ही नैसर्गिक मर्यादा ठरली होती. ही पर्वताची ओळ ओलांडून जाण्यासाठी सुलभ मार्ग नव्हते त्यामुळे कालांतराने हळूहळू पलीकडे नवीन वसणार्या, अतिशय सुपीक भागांतील शेतीमालाला बाजारपेठ नव्हती. उत्तरेकडील सरोवरांतून हा माल कॅनडाकडे बोटींतून जाई त्या व्यापाराचा फायदा कॅनडाला मिळत होता! अपेलेशिअन पर्वतांतून पूर्वेला वाहणार्या पोटोमॅक नदीच्या खोर्यांतून कालवा बनवावा अशी कल्पना पहिल्याने पुढे आली व जॉर्ज वॉशिंग्टनने ती उचलून धरली. मात्र पुष्कळ खर्च झाल्यावर असे दिसून आले कीं या खोर्यात फार उतार आहे त्यामुळे कालवा सोयिस्कर होणार नाही. त्यामुळे वॉशिंग्टन पश्चात हा कालवा बारगळला. नंतर थोडया उत्तरेला असलेल्या मोहॉक नदीचा विचार पुढे आला. एरी सरवराच्या काठच्या बफेलो शहरापासून कालवा काढून तो पूर्वेला मोहॉक नदीच्या खोर्यांतून नेऊन हडसन नदी, जी उत्तर-दक्षिण वाहून न्यूयॉर्कपाशी अटलांटिकला मिळते, तिच्या काठावरील अल्बनी शहरापाशी हडसन नदीला मिळवावा असा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडला गेला. या कालव्यांतून एरी वगैरे सरोवरांच्या दक्षिणेच्या सर्व नवीन वस्तीच्या भागांतील शेतीमाल, सरळ न्यूयॉर्कपर्यंत जाऊन पुढे युरोपपर्यंतहि निर्यात करतां येईल अशी आशा निर्माण झाली. मात्र हा कालवा बनवणे सोपे मुळीच नव्हते.