Get it on Google Play
Download on the App Store

इतर कालवे आणि त्यांचा इतिहास

आपण शाळेत वाचले कीं फर्डिनंड लेसेप्स या फ्रेन्च इंजिनिअरने सुएझ कालवा बांधला. त्याला अचानक कसे सुचले कीं येथे एक कालवा खणून भूमध्य व तांबडा समुद्र जोडावे? त्याची पीठिका थोड्या शोधण्यानंतर दिसली ती अशी कीं फार जुन्या काळी एका इजिप्शियन राजाने नाइल नदी तांबड्या समुद्राला जोडणारा एक पूर्व-पश्चिम कालवा खोदला होता व तो बराच काळ वापरात होता. कालांतराने तो गाळाने भरून गेला, तांबड्या समुद्राची लांबीहि कमी झाली व त्याचे उत्तरेकडील टोक भरून जाऊ लागले. परिणामी कालव्यातून जहाज तांबड्या समुद्रात उतरू शकत नाहीसे झाले व कालवा बंद पडला. मात्र कालव्याचे तुकडे खंदक स्वरूपात शिल्लक होतेच. पुढे नेपोलिअनने इजिप्तवर स्वारी केली तेव्हां त्याला या कालव्याची गोष्ट कानावर आली. त्याच्या बरोबर इंजिनिअर व सर्व्हेअर होते. नाइल ऐवजीं अलेक्झांड्रिआ बंदरापासून तांबड्या समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण कालवा बनवावा अशी कल्पना पुढे आली. सर्व्हे करताना काहीतरी चुका झाल्या व असे म्हटले गेले कीं दोन्ही समुद्रांच्या पाणीपातळीत ४०-५० फुटांचा फरक आहे! त्यामुळे कालव्याची कल्पना सोडून दिली गेली. पण काही वर्षांनंतर दिसून आले कीं पातळीतील फरक अगदीं थोडा -४-५फूटच - आहे. मग एक कंपनी स्थापन करून व इजिप्तच्या राजाकडून कालव्याची जागा १०० वर्षांच्या कराराने मिळवून कालवा बनवला गेला. त्यांत इजिप्तच्या राजाची ४०टक्के मालकी होती मात्र लवकरच चैनीसाठी पैसे मिळवण्यासाठी आपला हिस्सा त्याने ब्रिटिशांना विकला. कालवा आजतागायत वापरात आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नासरच्या काळात तो इजिप्तने ताब्यात घेतला हा आपल्याला परिचित इतिहास आहे.