ध्रुव
आपण समजतो कीं खगोलीय उत्तर ध्रुव हा कायम आपल्या परिचयाच्या ध्रुवतार्यापाशीच होता व आहे. ध्रुवतार्यावरच आमचा ध्रुवबाळ बसलेला आहे! ‘अढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला’ असे गाणेहि आहे! पण प्रत्यक्षात खगोलीय ध्रुवाचे स्थान अढळ नाही. हल्लीच्या काळी देखील खगोलीय उत्तरध्रुव व ध्रुवतारा (व त्यावरचा आपला ध्रुवबाळ) यात पाउण डिग्री एवढे अंतर आहे. गेली कित्येक दशके ते जवळपास तेवढेच आहे. पण पृथ्वीचा आस कायम एकाच दिशेकडे राहिलेला नाही. आकाशात तो एक भलीमोठी गिरकी अतिशय सावकाश घेतो!
याचा परिणाम असा होतो कीं खगोलीय उत्तर ध्रुव एका २३ १/२ अंशांच्या त्रिज्येच्या विशाल वर्तुळात फिरत राहतो. मात्र या एका फेरीला २६००० वर्षे लागतात!