Get it on Google Play
Download on the App Store

बापाने आत्महत्या केली तो दिवस!



आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते केवळ त्याचं शरीर घेऊन नव्हे तर.. तो कोसळला माझ्यासाठी, माझ्या भावासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी शेतात लढता लढता कोसळला.. तो कोसळला माझ्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी माझ्या पंखांना बळ दिल्यावर...

23 जूनला पप्पा आम्हाला सर्वांना सोडून गेले. कायमचे. वयाच्या सत्तेचाळीसाव्य वर्षी त्यांचं जाणं मलाच काय कुणालाच अपेक्षित नव्हतं. किंबहुना त्यांनीच स्वत:त्यांच्या आयुष्याचं अस्तित्व संपवलं. आत्महत्या करुन.

दिनांक२३ जून २०१४

मी नुकताच पेपरलाईन टाकून घरी आलेलो. घड्याळाकडे पाहिलं तेव्हा साडेआठ वाजलेले. हात-पाय धुवून सवयीप्रमाणे पलंगावर पडलो होतो. आदल्यादिवशी सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारी 3 ते रात्री 12 अशी शिफ्ट केलेली. त्यात रात्री एक वाजता घरी येऊन पुन्हा सकाळी चार वाजता पेपरलाईन टाकून आलो होतो. त्यामुळे अंगात थकवा आणि डोळ्यांवर झोप होती. त्यात भरीस भर म्हणजे पुन्हा थोड्याच वेळात जनरल शिफ्टला निघायचं होतं. म्हणजे दहा वाजता. घड्याळाने नऊचा ठोका दिला. म्हटलं अर्धा तास पडतो... डोळ्याला डोळा लागणार तेवढ्यात मोबईल वाजला. कम्प्युटर डेस्कवर मोबाईल होता. मोबाईल उचलण्यासाठी जाणार तोच येणारा कॉल कट झाला. मोबाईल पाहतो तर काय मोबाईलमध्ये सात ते आठ मिस्ड कॉल... आणि तेही गावच्या घरातील मोबाईलवरुन. मी घाबरलोच. कारण गावाहून सहसा मला फोन येत नाहीत. किंबहुना आईला फोनच करता येत नाही. ती फक्त मी केलेले फोन रिसिव्ह करते. मग एवढे मिस्ड कॉल कसेआईला कसं जमलं फोन करायलाबरं तिला फोन करायला जमलंही असेल. पण मग तिने सात-आठवेळा का फोन केला असावाया व अशा अनेक प्रश्नांचा काहूर मनात माजू लागला. लागलीच गावचा नंबर डायल केला... ‘मोबईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असं सोमरुन उत्तर... माझ्या काळजाची धाकधूक आणखी वेगवान झाली. थो़डा थांबलो. अक्षय होताच बाजूला. अक्षय. माझा धाकटा भाऊ. त्याला मी मोबाईलवर आलेल्या मिस्ड कॉलबद्दल सांगितलं नाही. मनात प्रश्नांचं मोठं वादळ घोंघावत होतं. त्याचवेळी गावच्या मोबाईलवर फोन लावण्याचे माझे प्रयत्न चालूच होते.

फोन लागला. ह्रदय बंद आणि कान बहिरे झाल्यासारखे वाटले. डोळ्यावरुन पटकन काळी तिरिप गेली. काय असेल समोरुन उत्तरकाही क्षणात समोरुन प्रश्न, “ज्ञान्या बाबू?” (मला गावी अनेकजणं नेन्या या नावानंच ओळखतात. मूळ ज्ञानेश्वर नावाचं ज्ञान्या)

मी- हो... कोण बोलतंय?... आई कुठेय?... काय झालंय? (मी प्रश्नांचा भडीमार केला.)
समोरुन- मी दिवाळे मामी बोलतेय... तुझ्या पप्पासला अॅडमिट केलंय. रोह्यास नेलंय. आयस पण तिकडंच गेलीय. तू भाव्या दादासला फोन कर लवकर. नायतर सरपंच सायबांना. ते गेलेत त्यांच्यासोबत रोह्यास.
फोन कट... की ठेवून दिला. माहित नाही.
फोन कट झाल्याचा किंचितसा आवाज मला एखाद्या बॉम्बस्फोटातील धमाक्यासारखा वाटला. त्या आवाजाने काही वेळ सुन्न झालो. मी पूर्णपणे थंड पडलो. शब्दांत अस्पष्टपणा... तोतलेपणा.. भावाने म्हणजे अक्षयने “काय झालंय दादा..काय झालंय?” असे दोन-चार वेळा विचारलं बहुतेक. पण माझं त्याच्या प्रश्नांकडे लक्ष नव्हतं. मग काही क्षणांनी मी त्याला सर्व सांगितलं. काय झालं असेल.. काय नक्की घडलं असेल... पप्पांना नक्की काय झालंय  मला असं अचानक, लवकर फोन करायला का सांगितलं असेल, असे अनेक प्रश्न मनात घिरट्या घालू लागले. पण मी त्या प्रश्नांना मनातल्या मनात दाबून ठेवलं आणि लगेच भाव्या दादाला फोन केला. त्याचा टेम्पो होता. बहुतेक त्याच्या टेम्पोने पप्पांना उपचारासाठी रोहाला आणलं असावं, असा अंदाज बांधला आणि तो खराच ठरला. भाव्यादादाने माझा फोन उचलला.
भाव्यादा- ज्ञान्या..
मी- भाव्यादा, काय झालंय रे पप्पांनारोहाला का आणलंय?
भाव्यादा- अरे तू टेन्शन नको घेऊ.. काही नाही... तू ये गावी.

गणेशन अण्णांनी भाव्या दादाच्या हातातून फोन घेतला. गणेश अण्णा आमच्या घरापासून सात-आठ घरं लांब राहायचे. ते भाव्यादापेक्षा वयाने मोठे होते. म्हणून त्यांनी मला समजावण्यासाठी बहुधा फोन घेतला असावा.

गणेश अण्णा- ज्ञान्या... तू एक काम कर. तू आणि अक्षय, दोघांनीही ताबडतोब निघूनच या गावी.
मी घाबरलोच. काळजाचा ठोकाच चुकला. काय झालंय असं विचारलं.
गणेश अण्णा- अरे काहीनाही. तू ये.
मी- आई कुठेयआणि पप्पा कसे आहेत?
गणेश अण्णा- आयस आहे इथे.. तू ये.

त्यांनी पप्पांबद्दल बोलणं टाळल्याचं माझ्या लक्षात आलं. मला वास्तवाची जाणीव झाली. माझं शरीर तिथे धाडकन जमिनीवर आपटण्याचंच बाकी होतं. पण अगदी पनवेलच्या वडकळ नाक्यापर्यंत जाईपर्यंत मी अशाच आशेत होतो की पप्पांची स्थिती गंभीर असेल आणि ते बरे होतील. ते नाहीत, हे मान्य करायला माझं मन धजावतच नव्हतं.

आता माझ्यासमोर मोठं आव्हान होतं ते अक्षयला सांभाळण्याचं. गणेश अण्णांनी फोन कट केला. पुन्हा एकदा फोन कट झाल्याच्या त्या किंचितशा आवाजाचा स्फोट. कान बहिरे करणारा. शरीरात कुठेतरी मोठा सुरुंग लावला असावा आणि त्याचा स्फोट झाला असावा असं वाटलं. मी अक्षयला समजावण्याचा प्रयत्न केला.

मी- चल. लवकर तयार हो. आपल्याला गावी जायचंय. पप्पांना बरं नाहीय. ते रोहाला अॅडमिट आहेत. (मी एका श्वासात तीन-चार वाक्य बोलून गप्प बसलो.)
तो मला प्रश्न विचारेल.. नक्की काय झालंय याची चौकशी करेल, असे वाटले. पण तो अगदी दोन-तीन सेकंद गप्प उभा राहिला आणि मोठ-मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना बघून मलाही रडायला आलं. पण मी मोठ्या प्रयत्नाने अश्रू थांबवले कारण मला माहित होतं की मी रडलो की हा गप्प बसणार नाही आणि आणखी घाबरेल. मी त्याला समाजवण्याच पुन्हा प्रयत्न केला.

मी- अरे. रडतो कशालापप्पा फक्त आजारी आहेत.
तरीही तो रडतच होता. थोड्या वेळाने त्याला समजावलं. तो तयार झाला. मीही कपडे बदलले. ज्याच्या येथे पेपरलाईन टाकायचो त्या सुभाषदादाच्या घराच्या बाजूलाच भाड्याने रुम घेतलेली. त्याचे आणि आमचे संबंध घरच्यासारखेच होते. आम्ही दोघेही तयार झाल्यावर त्याने त्याच्या स्कूटरने जवळच राहणाऱ्या काकांच्या घरी आणून सोडले. तिथे आत्या, मामा वगैरे जमणार होते. तिथे गेल्यावर अक्षय आणि मला अश्रू आवरणं कठीण झालं. एव्हाना आम्हाला आता वास्तव कळलं होतं की आपला बाप आपल्याला सोडून गेला. पप्पा आपल्याला सोडून गेले.

काही वेळाने मी रडायचं थांबलो. मला अक्षयला सांभाळणं त्या क्षणी महत्त्वाचं वाटलं. मात्र त्याला जवळ केलं तर तो आणखी जोराने रडायला लागला. गाडीत जातनाही तो हुंदके देत रडत होता. त्याच्याकडे पाहून मलाही अश्रू थांबवता येत नव्हते. आई कोणत्या परिस्थितीत असेलपप्पा कालपर्यंत तर चांगले बोलत-फिरत होते मग असे अचानक कसं असे झालेअसे अनेक प्रश्न गाडीतून जाताना मनात घोंगावत होते. एक खासगी गाडी केलेली गावी जाण्यासाठी. गाडीतून जाताना पप्पांचा चेहरा डोळ्यासमोरुन जाता जात नव्हता. ते हसताना दिसत होते... ते मला रागवताना दिसत होते.. ते काम करताना दिसत होते... ते माझ्यासोबत खेळताना दिसत होते...

मी असं काय चुकीचं केलंय की माझं छत्र हरपलंमनात गोंधळ-गदारोळ सुरु होता. मधेच अक्षय हुंदके देत आत्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता. माझी नजर गाडीबाहेर..मात्र मन पप्पांच्या आठवणीत. आई..निलिमा..अक्षय..या साऱ्यांना मला आधार देण्याची गरज होती.

आदल्या रात्री म्हणजे 22 जूनच्या रात्री मी पप्पांशी फोनवरुन बोललो होतो. ते माझं आणि त्यांचं शेवटचं बोलणं होतं. शेवटचं. माहित नव्हतं की ते यापुढे माझ्याशी कधीच बोलणार नव्हते. ते नेहमीसारखं बोलत होत. मला पोस्टातल्या पैशाचं सांगत होते. पुढच्या महिन्यात पैसे मिळणार आहेत असे सांगत होते. तू रुम घे...गावची चिंता करु नको, गावी पैसे नको देऊस, मी सर्व सांभाळेन इकडे असे सांगत होते.

त्यांनी आमच्यासाठी मुंबईत रुम घेऊन ठेवली नाही याची रुखरुख त्यांच्या मनात कायम होती. गावातल्या बहुतेक जणांनी त्यांच्या मुलांसाठी मुंबईत रुम घेतलीय, मात्र मी नाही, यामुळे ते नेहमी अस्वस्थ असत. आपण आपल्या मुलांना मुंबईत स्वत:ची रुम नाही घेतली.. ते कुणाकडे राहती, उद्या कुणी त्यांना घराबाहेर काढले तर ते कुठे राहती, नातेवाईक कितीही चांगले असले तरी ते किती दिवस पोरांना ठेवतील अशा अनेक प्रश्नांनी ते घेरले असायचे, हे त्यांच्या बोलण्यातून मला नेहमी जाणवायचं. त्यादिवशी म्हणजे 22 जूनला रात्री फोन केलेला त्यांना तेव्हाही ते हेच सारे बोलत होते. ते उद्या आपल्यात नसतील याची किंचितसंही मला वाटलं नाही.

मागच्यावेळी गावी गेलेलो त्यावेळी दिवा-सावंतवाडी अपघातानंतर मी एबीपी माझावर एक दहा मिनिटांचा लाईव्ह दिला होता. दिवा-सावंतवाडी अपघातग्रस्त ट्रेनमध्ये मी होतो त्यामुळे त्याचा अनुभव मी एबीपी माझावर सांगितला होता. त्याची व्हिडिओ क्लिप मी मोबाईलमध्ये घेतली होती. ती क्लिप गावी गेलो असताना पप्पांना दाखवली. मग काय बघता... अख्ख्या गावात दवंडी पिटवली की माझा पोरगा टिव्हीवर दिसला वगैरे वगैरे. काय म्हणून आनंद झाला होता त्यादिवशी. मी पत्रकारिता म्हणजे नक्की मला पुढे जाऊन काय काम मिळणार आहे याची त्यांना नेहमी चिंता असायची. मात्र त्या व्हिडिओनंतर त्यांच्या मनातील बरेच प्रश्न निकाली निघाले होते.

मुंबईहून गावी जाताना गाडीतून माझी नजर बाहेर नक्की होती मात्र हे सारे मला प्रवासात आठवत होते. पप्पांच्या प्रत्येक आठवणीनंतर डोळे पाणावत होते. मधेच हुंदके देत रडू येत होतं. पप्पा नाहीत, ही गोष्ट मन मानायलाच तयार होत नव्हतं.

एव्हाना नागोठण्याचा डोंगर उतरुन आम्ही रोहाच्या दिशेने निघालो होतो. थोड्याच वेळात रोहा एसटी स्टँडच्या समोर गाडी पोहोचली. काहींनी खाल्लं. दुपारचे साडेतीन वाजले होते. वडापाव की काहीतरी आत्याने आणलेलं. मात्र मला घशाखाली एक घासही जाईना. मी ते तिथेच त्यांच्यासमोर सारुन सरळ गाडीत जाऊन बसलो. तेवढ्यात मागून एक गाडी आली. त्या गाडीत निलिमा आणि तिच्या सासरची माणसं होती. निलिमाच्या लग्नाला आता कुठे तीन महिने झालेले. तिने तर पूर्णपणे अंग सोडूनच दिलं होतं. मला आणि अक्षयला बघितल्यावर ती आणखी रडायला लागली. वयाने आम्हा दोघांपेक्षा मोठी पण मनाने खूपच हलवी. तिच्या लग्नात पप्पांनी काही कमी होऊ दिलं नव्हतं. आठवतं मला, ते त्या दिवशी जेवढे आनंदी होते तेवढे आनंदी मी आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. आपल्या मुलीला तिचा संसार थाटून दिला आहे, याचा त्यांना प्रचंड अभिमान असावा बहुतेक. याच आवेशात ते खूप दिवस होते. मागच्यावेळी तर निलिमा मुंबईहून गावी गेली असताना तिला तिचं सासरच्या गावचं घर साफ करायला ते किती आनंदाने गेलेले. मुलीचं घर साफ करायला जाण्यात त्यांना काहीच गैर वाटलं नाही किंबहुना आपल्या मुलीला काही त्रास होऊ नये म्हणून त्याच आनंदाने निलिमाच्या सासरी जाऊन आले होते.

आता आमच्या गाड्या रोहातून बारशेतच्या दिशेने म्हणजे माझ्या गावाच्या दिशेने निघाल्या. माझ्या गावात जाणारा नेहमीचा रस्ता म्हणजे रोह्याच्या हनुमान टेकडीवरुन जाणाऱ्या रस्त्याने आम्ही न जाता दुसऱ्या आडमार्गाच्या रस्त्यानं जाणं पसंत केलं कारण नेहमीचा रस्ता खराब झालाय असं रोहात जाऊन कळलं. मग दुसऱ्या रस्त्याने गावी जाण्यास आमची गाडी निघाली. एकेका डोंगरांना मागे टाकत आमची गाडी गावाच्या जवळ जाऊ लागली. मनातली धाकधूक वाढू लागली. रडणं आवरता आवरेना. अखेर गाडी वाली या गावात पोहोचली. वाली. आमचं ग्रामपंचायतीचं गाव. या गावातून पुढे निघालो. चढण चढलो की वर टेकडावर आमचं गाव. वालीहून पुढे निघालो झाडांच्या डोक्यावरुन गावातील कौलारु घरं दिसू लागली. एरवी आलो की जी प्रसन्नता वाटायची ती आज नव्हती. पूर्ण गावावर शोककळा पसरलेली. गाव निपचित पडलेलं. जसजसा गावाच्या जवळ जात होतो तसतसा गावाजवळली भयाण शांतता जाणवू लागली. गाव अगदी दोनशे-अडीचशे मीटरवर आले आणि रडण्याचा एकच मोठा आवाज कानावर आदळला. अनेक नातेवाईक गावात दाखल झालेले. सर्वजण आम्हा भावंडांचीच वाट पाहत होते. गावाच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. गाव पूर्ण शांत निपचित पडलेलं. गावातील प्रत्येक माणूस आणि माणूस आमच्या घराभोवती जमलेलाआमची गाडी घराच्या समोर जाऊन उभी राहिली. घराभोवती जमलेला प्रत्येकजण रडत होता. मी गाडीतून उतरलो आणि थेट धावत्या पावलांसोबत घराच्या दिशेने गेलो. अक्षय, आत्या किंवा इतर कोणी गाडीतून उतरले याकडे माझं लक्ष गेलं नाही.
घराच्या वऱ्हांड्यात खूप गर्दी होती... आणि घरातही. आत मोठ-मोठ्याने रडण्याचे आवाज. कान सुन्न झालेले. आईचा आवाज आला. माझं शरीर थंडच पडलं. कुठल्याश्या आजीने मला वऱ्हांड्यातच कुशीत घेतलं आणि मला गोंजारुन रडू लागली. माझ्या मागे बहुतेक अक्षय होता. त्यालाही कुणीशी अशीच गोंजारत रडत होते. दुसऱ्या कुणीतरी त्या गर्दीतून वाट काढत मला आत नेलं... मी दारातून आत पाऊल टाकला... समोर पांढऱ्या फडक्यांनी गुंडाळेला एका धिप्पाड सात फूट उंचीची व्यक्ती जमिनीवर निपचित पडलेली... फक्त चेहरा दिसत होता. त्या चेहऱ्यावर काहीही हावभाव नव्हते. तो माझा बाप होता. मला, आम्हाला कायमचा सोडून गेलेला माझा बाप..

मी त्या लादीवर पडलेल्या पप्पांकडे एकदा पाहिलं. आणि जागीच कोसळलो. मागे अक्षय होता..तो आईच्या दिशेने जाताना दिसला. शेवटचा. नंतर तो मला त्या गर्दीत कुठे दिसलाच नाही. मला गावातल्या दोघांनी उचलून बाजूच्या खोलीत नेले आणि शर्ट काढून बाजूला पडलेल्या सुपाने हवा घालत होते.. तर कुठलीशी आजी पदराने हवा घालत त्याच पदराने मला आलेला घाम फुसत होती. माझी मोठी आत्या होती बहुतेक की मावशी. आठवत नाही नीट. डोळ्यासमोर अंधार. थोड्या वेळाने मला बरं वाटलं तेव्हा पाणी प्यायलो. रडणं थांबत नव्हतं. मग मला आईजवळ जायचंय असं बाजूला असलेल्यांना सांगितलं. तेथे उभे असलेल्या दोघांनी माझ्या दोन्ही हातांच्या दंडाना पकडून उठवलं आणि आईच्या पुढ्यात नेऊन ठेवलं. आईने मला पाहिल्यावर आणखी मोठ-मोठ्याने रडू लागली. आईने मला, अक्षयला आणि निलिमाला कवेत घेतलं. तिच्या कवेत आम्ही तिघे मावत नव्हतो मात्र तरीही ती प्रयत्न करत होती. ती ढसाढसा रडत होती. बाजूच्या बायका तिला समजावत होत्यापोरांकडे बघ. तू रडणं थांबव..तर ते थांबतील’ मात्र आई रडायचं थांबली नाही. तीच्या मागोमाग आम्हीही पुरतं ढासळत चाललो होतं. मला तर पूर्णपणे थकवा जाणवू लागला होता. मला चालताही येत नव्हतं. अशात पप्पांचं प्रेत घरातून अंगणात काढण्यासाठी चार-पाच जण पुढे आले. आईने पप्पांचं प्रेत धरुन ठेवलं आणि आणखी मोठ्याने रडू लागली. तीचं रडणं माझ्याने बघवत नव्हतं.

थोड्यावेळाने आई रडता रडता म्हणाली, “मरायचा व्हता तर मला घेऊन मरायचा...पोरांना घेऊन मरायाचा..एकाटाच का मेलास?...विष का प्यायलास?”

मी हादरलोच. पायाखालची जमीनच सरकली. “पप्पा विष प्यायले?”

पप्पा विष प्यायले हे कळल्यावर मला बसलेला हादरा इतका जबर होता की मला ते सहनच झालं नाही. माझ्या डोळ्यावर पुन्हा अंधार पसरला. मला चक्करसारखं करु लागलं. मला पुन्हा पाणी पाजलं गेलं. एकीकडे अश्रू आवरत नव्हते...दुसरीकडे डोक्यात प्रश्नांच्या चक्राचा वेग वाढला. पप्पांनी असे का केलं असेलत्यांना कसलं टेन्शन होतं?त्यांनी मला का नाही सांगितलं त्यांचं टेन्शनते कालच तर माझ्याशी बोलले मग काही होतं तर मला सांगायचं..पण या साऱ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आता ते या जगात नव्हते. मनातील प्रश्नांचं वादळ आणखी मोठ्याने घोंगावू लागलं. तेवढ्यात चार-पाच जणांनी प्रेत अंगणात नेण्यासाठी उचललं. आम्हा सर्वांचं रडणं थांबेना. आई वेड्यासारखी करु लागली होती. ती प्रेत उचलणाऱ्यांच्या पाया पडू लागली “माझ्या धन्याला नेऊ नका.. माझ्याजवळच त्यांना ठेवा
तिचा तो काळजाचा थरकाप उडवणारा स्वर मला आणखी कासाविस करत होता. तिच्या त्या विणवण्या आम्हा तिघा भावंडांना आणखी हादरे देत होता. अखेर पप्पांचं प्रेत अंगणात नेलं गेलं. आम्ही त्या प्रेतामागून गेलो. अंगणात नातेवाईक पाणी पाजत होते. मला पुन्हा चक्कर आली. घरी आल्यापासून तिसऱ्यांदा असं झालं. कुणीतरी डॉक्टरना बोलवा असं मोठ्याने म्हणाला. मग मीच धीर करुन नकार दिला.पप्पांच्या निपचित पडलेल्या..नेहमी हसत-खेळत असणाऱ्या त्या चेहऱ्याकडे मला पहावेना. मी दुसरीकडे पाहूनच पप्पांना पाणी पाजलं. थोड्या वेळाने प्रेत स्माशानाकडे नेण्यासाठी उचललं. मला स्मशानभूमीकडे घेऊन जाऊ नये, असे अनेकांनी सूचवले कारण मला सारखी-सारखी चक्कर येत होती व हात-पाय पूर्णपणे थंड पडलेले. शेवटी माझ्या विनंतीनंतर ते घेऊन गेले. पप्पांच्या आत्याच्या नातवांनी मला दोन्ही बाजूंनी पकडलं आणि ते स्मशानभूमीकडे घेऊन गेले. गावापासून अडिचशे-तीनशे मीटरवर असलेल्या स्मशानभूमीत आम्ही गेलो. पप्पांचं प्रेत तिथे खाली ठेवलं होतं. आणि काही वेळातच निपचित पडलेलं...सकाळीच आम्हाला कायमचे सोडून गेलेले माझे पप्पा आता तर त्यांचं शरीरही आमच्यातून निघून गेलं. बाप गेला. तिथून घरी येईपर्यंत रडणं चालूच होतं. ठरवूनही डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते.पप्पा विष का प्यायले?’ हा प्रश्न मात्र उत्तराची वाट पाहतमनात घर करुन बसला होता.

संध्याकाळी घरी स्मशान शांतता पसरली होती. काल याच घरात फिरणारे माझे पप्पा आज नव्हते आमच्यात. ते आमच्यात नव्हते हे मान्य करायला कुणीच तयार नव्हते. घरात बसलो असताना वाटायचं की आता वऱ्हांड्यातून घरात येतील किंवा आता मागच्या दारातून घरात येतील. पण ते तिथे यायला आमच्यात होते कुठे?

प्रथेप्रमाणे घरातील चूल बंद होती. रात्री गावातील महिला जेवण घेऊन आल्या. आणलेल्या प्रत्येकाच्या जेवणातील एक घास तरी खायचा अशी प्रथाच. त्यामुळे आम्ही तीन भावंडं आणि आई असे एख रांगेत बसलो. आणि जेवू लागलो. जेवता जेवता आई हुंदके देत रडू लागली. मागोमाग अक्षय आणि मी..मग निलिमाही. आई रडता-रडता सकाळी पप्पांच्या बाबतीत नक्की काय झालं ते सांगू लागली. तेवढ्यात एका आजीने तिला थांबवलं आणि म्हणाली न रडता सांग सर्व. आईला रडणं थांबवता आलं नाही. मात्र आईने सर्व सांगायला सुरुवात केली. ते सर्व ऐकून मला धक्काच बसला. पप्पा मृत्यूला घाबरत असतं. त्यामुळे ते असे करुच शकत नाहीत याची मला खात्री होते. आईही तेच म्हणत होती. आईने सर्व हकीकत सांगितली आणि पुन्हा मोठ-मोठ्याने रडू लागली.

सकाळी आई-पप्पा एकत्र उठले. आई जेवणाच्या मागे लागली. आई चुलीजवळ होती. पप्पा गाई-बैलांना रानात सोडून आले. आणि पेरणी चालू होती म्हणून दोन बैल वाड्यात बांधून ठेवलेली. त्यांना पेंडा घातला. आणि नांगर ठेवायला शेतावर गेले. तिथून आल्यावर ते थेट आईजवळ चुलीशा आले.
मला पाणी दे” त्यांनी आईला सांगितलं. त्यांनी बोलल्यावर त्यांच्या तोंडातून आईला कसलासा वास आला. तिला पहिल्यांदा कळलंच नाही की हा वास नक्की कसला आहे. तिने विचारलं तुमच्या तोंडातून वास कसला येतोय त्यावर ते कोणतंही उत्तर न देता निघून गेले. जाऊन पंख्याखाली पडले आणि मोठमोठ्याने रडू लागले. आई त्यांच्या मोगमागच गेली. ते का रडायला लागले याने ती घाबरली. एवढा धड-धाकट माणू असा रडायला का लागला. आई विचारायाला पुढे गेली तर पाहते तर पप्पांचे डोंळे लालभडक झालेले,. डोळे फिरवू लागलेले ते. आईला हिसका मारुन ते घराच्या मागच्या बाजूला गेले. आणि तिथे एका दगडाच्या बाजूला धाडकन खाली पडले. आईने त्यांचं डोकं मांडीवर घेतलं तेव्हा ते मोठ्याने रडू लागले. म्हणाले ‘माझ्या पोरांना बघ. मला मरायचं नाहीय. मला डॉक्टरकडे घेऊन चल.’ आई घाबरली. आईने त्यांच्य़ा तोंडात हात घातला. तर त्यांच्या तोंडाता माती होती. त्यांनी फॉरेटची पाऊडर खाल्ली होती व त्यांवर बहुधा माती खाल्ली असावी. आई त्यांना तिथेच टाकून घराच्या पुढच्या अंगणात गेली आणि मोठ्याने ओरडू लागली. कारण आईच्याने पप्पांना उचलताच आलं नसतं. गावातील सर्वजण कामावर गेलेले मग ज्या कोणी बायका गावात होत्या त्या आल्या. त्यांनी पप्पांना खेचत खेचत पुढच्या अंगणात आणून ठेवलं. पप्पांचं शरीर काळं-निळ पडत आलं. गावातील भाव्या दादाचा टेम्पो घेऊन रोहाच्या दिशेने निघाले. टेम्पोत पप्पांचं डोकं आईतच्या मांडवर आणि बाजूला पप्पांच्या आत्याची सून. आणि मागेमाग सरपंच आण्णांची गाडी. रोहाला हॉस्पिटमध्ये घेऊन जाईपर्यंत पप्पांचा जीव गेलेला. आई तर सांगते की गावापासून वालीला म्हणजे बाजूच्या गावात जाईपर्यंतच पप्पांचा जीव गेलेला. तरीपण आईला वाटत होतं की ते बेशुद्ध पडले असावेत म्हणून आईने आशा सोडली नव्हती. सरपंच अण्णा म्हणत होते की आपण हॉस्पिटलला नको नेऊया कारण परत पोलिस केस होईल.पण आईला आशा होती. तीच्या विनंतीनंतर सरपंच अण्णा शेवटी मानले आणि म्हणाले चला मग. पण हॉस्पिटलच्या पहिल्याच चेकअपमध्ये पप्पा गेल्याचं सांगितंल डॉक्टरनी.
आईने हे सर्व तिथे जमलेल्या बायकांना सांगितलं. हे सांगत असताना आई अनेकवेळा ढसा-ढसा रडली. हुंदके देत तिने हे सर्व सांगितलं...

माझे पप्पा. गेल्या सात-आठ वर्षांपासून पप्पा आजारी होते. मानसिकरित्या ते सात-आठ वर्षांपासून स्टेबल नव्हते. त्याचं झालं असं होतं की ते मुंबईत दहिसरला हिऱ्यांच्या कारखान्यात काम करायचे. त्यावेळी त्यांच्या डोक्याला ट्युबलाईट लागलेली. आणि डोक्यातून खूप रक्त वाहून गेलेलं. त्यावेळी योग्य उपचार झाले नाहीत आणि मग गेल्या सात-आठव वर्षांपासून ते मानसिकरित्या खूप खालावले होते. कधी-कधी घरातून तीन-तीन महिने कुठेतरी निघून जायचे. नंतर नंतर तर आम्हाला ते धमी द्यायचे की मी आता जाईन तो परत येणार नाही किंवा मी माझ्या जीवाचे बरं-वाईट करुन घेईन वगैरे वगैरे. पण आम्हा सर्वांना माहित होतं की ते मरणाला घाबरतात. ते तसं काहीच करणार नाहीत. ते गेल्यावर आई त्यांना शोधण्यासाठी आजूबाजूची गावं, जंगलात सर्व ठिकाणी पायपीट करायची. आम्ही शाळेत जायचो... शाळेला सुट्टी घेऊन येऊ का म्हटल्यावर आई आम्हाला नाही म्हणायची. पप्पा मुंबईला गेलेत असं सांगून ती आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करायची. शाळेतली पोरंही मला जेव्हा ‘अरे, तुझा पप्पास वेडा आहे ना?’ असे बोलायचे तेव्हा खूप राग यायचा.  यादरम्यान, आईने पप्पांना बरं करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पप्पा जेव्हा-जेव्हा घरातून जायचे तेव्हा-तेव्हा आई ऊन-पाऊस न बघता त्यांना शोधत फिरायची. त्यांना घरी आणल्यावर ते पुन्हा परत जातील हे माहित असतानाही तीने कधीच त्यांना शोधण्याचं टाकून दिलं नाही. एवढंच काय... अलिबागच्या मेन्टल हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केलं गेलं. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. ते गोळ्या घ्यायला नकार देत मग आई भाकरीतून त्यांना गोळ्या देत असे... याचदरम्यान, शाळेतही आम्हा भावंडांना खास करुन मला आणि निलिमाला मित्रांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागायचं... तुझे पप्पा अलिबागहून आलेत ना?...तुझे पप्पा वेडे आहेत ना?..इत्यादी इत्यादी. गेल्या काही महिन्यांपासून...खासकरुन निलिमाच्या लग्नापासून म्हणजे एप्रिल 2014 पासून त्यांची स्थिती सुधारली होती. ते सर्वसाधारण माणसांसारखे वागत होते. 

मात्र गेल्य़ा काही महिन्यांपासून खासकरुन मुंबईत काकांच्या घरातून बाहेर पडून मी आणि अक्षय वेगळे राहू लागलो तेव्हापासून ते फार चिंतेत दिसायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता असायची. बहुतेक आमच्या रुमबाबत असावी ती चिंता. एवढी मेहनत करुन पोरांना रुम घेऊन देऊ शकलो नाही याची त्यांना बहुतेक नेहमी रुखरुख वाटत राहिली. आणि हल्ली याचंच ते जास्त टेन्शन घेऊ लागले होते कारण हल्ली मी जेव्हा कधी त्यांनी फोन करत असे तेव्हा तेव्हा ते मला तू रुमचं कसं काय करणार आहेस... तुझ्या पगारातू कसं रुम घेणार.. माझे पोस्टात एवढे पैसे आहेत वगैरे अशाच गोष्टी तासंतास करत बसायचे. परवा गावी आईला भेटायला गेलो असताना आईने विषय काढला की त्यांनी नक्की का आत्महत्या केली असेल तर मी तिला हे रुमचं कारण सांगितलं. ते याचंच टेन्शन घेऊन त्यांनी त्यांच्या जिवाचं बरं वाईट केलं असणार. तेव्हा आईने मला आणखी एक सांगितलं की ‘नेनू, त्यांना जेव्हा टेम्पोत भरलं तेव्हा गावापासून एक-दोन किलोमीटर गेल्यावर त्यांनी एख वाक्य मला बोलले... त्यानंतर ते पुटपुटत राहिले पण त्यांच्या तोंडून स्पष्ट आलेला शेवटचा वाक्य बहुतेक तोच होता....तो म्हणजे- नेन्याला सांग रुमचं टेन्शन नको घेऊ. अक्षयला ओरडायला नको सांगू. निलिमाला वेळच्या वेळी भेटायला जायला सांग नेन्याला. आणि आणखी काहीसे पुटपुटले. पण हे वाक्य शेवटचे

आईने सांगितलेलं हे वाक्य माझ्या मनात कायम घर करुन राहिलेत. त्यांनी आमच्यासाठीच आयुष्याचं असं करुन घेतलं असं मला आजही कायम वाटत राहतं... आपल्या पोरांना मुंबईसारख्या शहरात राहायला खोली-थारा घेऊ शकलो नाही, याची रुखरुख त्यांना कायम होती.

-नामदेव अंजना