महिपत बाबाने निरमा साबण खाल्ला तो दिवस!

एकुलत्या
एका लेकाला मोठं करावं, त्याला हवं-नको ते सर्व द्यावं, हर एक लाड पुरवावं आणि लेकाने मोठा झाल्यावर बायका-पोरांचा बि-हाड घेऊन
मुंबई गाठावी. अल्का कुबलच्या एखाद्या शोकात्म सिनोमात शोभावी अशी महिपतबाबाची ही
वेदनादायक कहाणी.
ज्या
काळात लेकाने घरी बसून पोसायला हवं, त्या काळात
पायाने नीट चालताही येत नाही तरीही महिपतबाबा पहाटे सहाच्या ठोक्याला शेताच्या
बांधावर पोहोचत असे. आयुष्यभर मेहनत करुन अंगाचा काडा झालेला. त्याला मेहनतीचा
कंटाळा नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करण्याची तयारी होती. 'शेताच्या बांधावरच जीव घे रे बाबा' असं आकाशाकडे
पाहत बोलताना महिपतबाबाला मी स्वत: कित्येकदा पाहिलं होतं. महिपतबाबाला दु:ख याचं
होतं की, ज्या लेकाला तळहातावरच्या फोडीप्रमाणे जपलं त्या
लेकाने असा धोका द्यावा? हाडाचा काडा करुन दिनरात मेहनत करुन
शिकवलेल्या पोराने पटदिशी आपल्याला लाथ मारुन मुंबईला निघून जावं? काय कमी केलं त्याच्यासाठी? अशा नाना प्रश्नांनी महिपतबाबा
गहिवरुन येत असे. पण या प्रश्नांची उत्तरं द्यायला त्याचा मुलगा त्याच्याजवळ
नव्हता.
पाण्याची
एक कळसही उचलणं शक्य नाही, एवढी म्हातारी झालेली बायको आणि पाय लटपटण्याच्या
काळात शेतात राबणारा महिपतबाबा मरेपर्यंत राबत राहिला. अगदी आठवडाभर पलंगावर पडला
असेल आणि तिथेच त्याने जीव सोडला.
माझ्या
घरासमोरच घर असल्याने महिपतबाबा कायम डोळ्यादेखत असायचा. न कळण्याचं ते वय होत
माझं. पण काही गोष्टी पाहिल्या, ज्या मनावर मोठा आघात करुन
गेल्या. आठवणींच्या गाठोड्यात त्या घटना बांधून ठेवल्या आहेत.
मी
नववीला होतो. २००७ चं वर्ष असेल. शाळेत जाण्याची तयारी सुरु होती. घरासमोर ओरड
सुरु झाल्याचा आवाज आला. घराच्या पडवीत गेलो तव्हा कळलं महिपतबाबाच्या पडवीत चार
पाच बायका गोंधळ घालतायेत. अशा गोंधळाच्या ठिकाणी कायम प्रत्यक्षदर्शी म्हणून
उपस्थित राहण्याची हौस असलेला मी धावत पळत महिपतबाबाच्या पडवीत पोहोचला. खूप गर्दी
जमली होती. महिपतबाबाला मधोमध ठेवून सर्वजण टाहो फोडत होते. गर्दीतून आत जायाला
जागा नव्हती. थोड्या वेळात डॉक्टर आले. त्यांना गर्दीने जागा करुन दिली. मी डॉक्टरांच्या
मागून मागून महिपतबाबापर्यंत पोहोचलो. तेव्हा जे पाहिलं ते अंगावर काटा आणणारं
होतं. थरकाप उडवणारं होतं.
महिपतबाबा
जमिनीवर कोसळला होता. बहुधा तो पलंगावरुन खाली पडला असावा. तो निपचित पडला होता.
चेहरा शांत, डोळे बंद, शरीराचीही काहीही
हालचाल नव्हती. मागून कुणीतरी बोललं, "सुटला वाटतं?".
हे वाक्य डॉक्टरांच्या कानावर पडलं आणि ते म्हणाले, "आहेत जिवंत. आता वारा येऊद्या. सर्वांनी बाजूला व्हा." डॉक्टरांनी
उपचार सुरु केले.
निपचित
पडलेल्या तो देह पाण्याने भिजला होता. तोंडात निळसर चिकट पदार्थ होता. कुणीतरी
डाॅक्टरांना त्याबाबत विचारलं, डॉक्टर म्हणाले,
"साबण खाल्लंंय त्यांनी" माझी वाचाच बसली. काळजाला चटका
बसावा तसं झालं. बाजूला निरमा साबणाचा कागद पडला होता.
महिपतबाबाची
बायको मोठमोठ्याने टाहो फोडत होती. गरिबीला कंटाळून, लेकाचं
असं निर्दयी वागणं हे सारं महिपतबाबाला सहन झालं नसावं, असा
मी अंदाज बांधला. तो खराही ठरला. जगण्याची आस सोडून दिली होती त्याने. गावातच
दिलेल्या पोरीने खूप सेवा केली त्याची. पण पोराने दिलेलं दु:ख त्याला मरेपर्यंत
खुपत राहिलं.
ज्या
बापाने खांद्यावर बसवून दीड-दोन किलोमीटर चालून शाळेत नेलं, जीवाचं रान करुन शिकवलं. ज्या काळात महिपतबाबाला पोराची गरज होती, आधार हवा होता त्या काळात पोराने वा-यावर सोडून दिल्यावर महिपतबाबाने काय
करावं? विष घेण्यासही पैसे नव्हते, म्हणून
साबण खाल्ला, असं दोन दिवसांनी महिपतबाबा जो कुणी तब्येतीची
चौकशी करायला येई त्याला सांगत असे. अशा भयाण परिस्थितीत आजही गावा-गावात अनेक
महिपतबाबा आहेत.