Android app on Google Play

 

ही माझी हतबलता की देशातील वस्तूस्थिती?

 रोहिथ वेमुला दोस्ता,

तू आत्म'हत्या' केलीस. तुझ्या मृत्यूला ही व्यवस्था म्हणजेच आम्ही सारे जबाबदार आहोत, हे सर्वप्रथम मान्य करतो. कारण ही वर्तमान व्यवस्था-सत्ता ही आमच्या मताची देण आहे. तुझ्या जाण्याने खूप दु:ख झालं, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही, तू भगतसिंह आहेस, तू लढवय्या आहेस वगैरे वगैरे खूप काही यापुढचे काही दिवस बोललं जाईल. दोस्ता, यातील ‘काही’ शब्द मुद्दामहून वापरला आहे. कारण काहीच दिवस हे असणार आहे. मग तूही आमच्या दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींच्या रांगेत चौथ्या नंबरवर जाऊन बसशील. म्हणजे ‘शाहू-फुल-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असं नाही का बोललं जातं, तसं हल्ली ‘दाभोळकर-पानसरे-कलबुर्गीं’ म्हटलं जातं. आता यात तुझं नाव. बस्स बाकी काही फार होणार नाही. याची दुर्दैवाने खात्री वाटते.

दोस्ता, अगदीच काही निराशा नाही. काल आणि आज तुझ्या समर्थनासाठी खूप आंदोलनं झाली. तशी यापुढेही होत राहतील काही दिवस. हेच काय ते सकारात्मक चित्र. बाकी काळाकुट्ट अंधारच. कारण आगामी आठवडाभर मोर्चे निघतील, पोलिसांचे मार खाऊन मोर्चातील कार्यकर्ते परत घरी जातील. घरी त्याचा आई-बाप त्याला दणके देईल. मेल्या उद्या पोलिसांचे मार खायला गेलास तर घरात घेणार नाही, असे आई-बाप धमकी देईल. मग तो तरणाबांड पोरगाही दुसऱ्या दिवासापासून मोर्चा-बिर्चा सोडून देईल.

नाही असे नाही. दिल्ली-मुंबई आणि तू जिथे प्राण सोडलेस त्या हैद्राबादेत काही मेणबत्त्या जळतील. विझतील. मेणबत्त्या पेटवणारे घरी जातील. शांत झोपतील. बस्स. संपलं. एवढंच.

आपलं कसंबसं अस्तित्व टिकवून असलेल्या एखाद्या चळवळीतील कुणीतरी तुझी न्यायालयीन लढाईही लढेल. त्यातही फार काही होणार नाही. त्यातही हमीद, मुक्ताताई, मेघाताई यांच्यासारखंच पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवायला लागतील आणि कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. बाकी काही हाती येणार नाही.

रोहिथ, हेच पाहा ना...
दाभोळकरांना मागून गोळ्या घातल्या गेल्या. कुणीही भेटले नाही.
त्यांची हिंमत वाढली.
पानसरेंना बाजूला उभं राहून गोळ्या घातल्या गेल्या. कुणीही भेटले नाही.
त्यांची आणखी हिंमत वाढली.
मग काय?
कलबुर्गींना थेट समोरुनच गोळ्या घातल्या गेल्या. कुणीच भेटले नाही.

रोहिथ दोस्ता, तुला तुझ्याच हाताने संपवलं त्यांनी. कुणी भेटेल याची अजिबात म्हणजे अजिबात विश्वास नाही. कोण ते दत्तात्रेय की कोण... काहीही होणार नाही त्याला, याची 200 टक्के खात्री आहे. दुर्दैवाने.
फार फार तर, दत्तात्रेय की कोण आहे, त्याला कोर्टात खेचलं जाईल. मात्र, तुला-मला-सर्वांना माहित आहे, कोर्टात येण्याचा रस्ता एक आहे, मात्र कोर्टाच्या भिंती-भिंतीतून हजार पळवाटा आहेत. त्या तुला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना चांगल्या माहित आहे.

आणि हो, मीही काही करत नाहीय. मी कुठल्याही मोर्चात सहभागी झालो नाही किंवा पाच रुपयांची मेणबत्ती घेऊन कुठल्याही मेणबत्त्या घेतलेल्या झुंडीत शिरलो नाही. कारण ज्याने तुला ‘दबाव’ आणून मारलं, ते मोर्चे-मेणबत्त्या-आंदोलनांच्या ‘दबावा’ला घाबरतील का? हा प्रश्न मला पडला आहे.

छबीलदास, भुपेश गुप्ता भवन, चैत्यभूमी, आंबेडकर भवन किंवा फार फार तर दिल्लीत स्मृतीबयेच्या ऑफिसबाहेर, हैदराबादेत तू शिकत असलेल्या विद्यापीठाबाहेर किती मेणबत्त्या पेटतात आणि किती दिवस त्या पेटत राहतात, यावर तु्झ्या न्यायाचं भवितव्य आहे. कारण पानसरे-दाभोळकर-कलबुर्गींसाठी पेटलेलेल्या मेणबत्त्या कधीच विझवल्या गेल्या आहेत. तुझ्याबाबतीत तसं होऊ नये असं वाटतं. पण तिथेही माझ्या मनी निराशाच आहे.

मला माहित नाही, मी हे हतबलतेतून लिहिलंय की हीच वस्तूस्थिती आहे. पण जे वाटलं ते लिहिलं.
पानसरेंची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी तपास यंत्रणांचा सुस्साट वेग पाहून एक कविता लिहिली होती. आज पुन्हा पोस्ट करतोय. इच्छा आहे की, या कवितेसारखं होऊ नये.

घटना झाल्यावर
निषेध,
आंदोलन,
मोर्चे,
सभा,
परिसंवाद,
धरणं,
निदर्शनं,
काळे झेंडे,
रास्ताराको,
जाळपोळ,
निवेदनं,
आवाहनं,
आव्हानं,
बदल्याच्या धमक्या,
प्रत्युत्तरं,
टीका,
हल्ला
इत्यादी
इत्यादी...
ते तरीही घाबरत नाहीत..
ते शांत राहतात...
कारण त्यांना खात्री असते...
आपल्या आरंभशूरतेची अन् निमित्तखोरपणाची...


-नामदेव अंजना