Get it on Google Play
Download on the App Store

प्रिय गुरुजी

प्रिय गुरुजी,

आज तुमचा स्मृतीदिन. 24 डिसेंबर 1899 साली कोकणातील पालगडमध्ये तुमचा जन्म झाला. ज्या ‘श्यामची आई’मधून तुम्ही जिला अजरामर केलंत, त्या यशोदामायेच्या पोटी. खरंतर हे सागंण्याची वेळ आलीय, हेच मोठं दुर्दैव. कोण होते साने गुरुजी, असा कुणी प्रश्न विचारला, तर फार फार तर आगामी चार-पाच वर्षांत उत्तर मिळू शकेल. मात्र, ‘पांडुरंग सदाशिव साने’ कोण, असा प्रश्न आज विचारल्यास, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, हा प्रश्न विचारल्यावर जशा चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्स असतात, तशा दिसतील. आणि हे मला आश्चर्यकारक वाटत नाही. कारण हल्ली केजी-बिजी किंवा ट्युशन वगैरे या शाळेआधीच्या शाळेमुळे तुमचे विचार मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. फार-फार तर सातवी-आठवीपर्यंत मराठी पुस्तकातील एखाद्या धड्यात तुम्ही बंदिस्त झाला आहात.

आता विशी-तिशीत असलेल्यांना बऱ्यापैकी आणि त्याहून वयाने मोठे असलेल्यांना जरा नीटसं तुमचं कार्य माहित आहे. बाकी सर्व बट्याबोळ आहे. त्याबद्दल या पिढीचा प्रतिनिधी म्हणून सॉरी.. खरंतर मी माफी मागितलेलं तुम्हाला आवडणार नाही. कारण आपल्या विद्यार्थ्याने कायम स्वाभिमानाने राहावं, अशी तुमची कायम इच्छा असायची. असो. तर गुरुजी, आज मी तुम्हाला पत्र लिहिण्याचं कारण फार वेगळं आहे. समाजातील विदारक परिस्थिती, तुम्ही ज्या राज्यात जन्म घेतलात, त्याच राज्यात गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. तुम्ही असतात, तर तुम्हालाही हे बघवलं नसतं. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा आठवावसं वाटतं आहे. तुमच्या असण्याची गरज भासते आहे.




बरं हे पत्र लिहिण्याचं आणखी एक कारण, ते म्हणजे आज मी तुम्हाला तुमचंच कार्य सांगणार आहे. हो..हो…मला माहित आहे, तुमचं कार्य तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे? पण गुरुजी, आता तुमच्या कार्याची, विचारांची, संस्कारांचा पुन्हा इथे उल्लेख करुन या निमित्ताने तुमच्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी होईल. कारण माझ्यासह अनेकजण तुमचे संस्कार विसरले आहेत. तुम्ही तुमच्या आसवांनी लिहिलेलं ‘श्यामची आई’ पुस्तक केवळ आम्ही पुस्तक म्हणूनच वाचलं. ते संस्काराचं विद्यापीठ आहे, हे आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. बहुधा म्हणूनच आज मानवतेला कलंक फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडताना दिसत आहेत.

आज अमाप पैसा आहे, अशी मुलं शिक्षणाच्या नावाखाली मजामस्ती करतायेत आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत, असे निमूटपणे शिक्षण सोडून गप्प आहेत. शिक्षणापासून वंचित असलेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत जाते आहे. श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी भयानकरित्या वाढत जाते आहे. घरावर पराकोटीचं आर्थिक संकट असतानाही तुम्ही शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांची मला आठवण होते. त्या परिश्रमांचा मला आवर्जून येथे उल्लेख करावासा वाटतो. खरंतर तसं पाहायला गेलो तर तुमचं घर श्रीमंत. म्हणजे तुमचे वडील म्हणजे सदाशिवराव खोत. खोताचं घराणं म्हटलं की श्रीमंत असं घराणं. मात्र, तुमच्या घराची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि त्यात घरही जप्त झालं. अशा घरात तुमचा जन्म झाला.

प्राथमिक शिक्षण पालगडला घेतल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचं की नाही, यावर तुमच्या घरात विचार सुरु झाला. कारण आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नव्हती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तुम्हाला मामांच्या घरी पाठवण्यात आले. पुण्याला. मात्र पुण्यात न जमल्याने तुम्ही पालगडाला परतलात आणि दापोली मिशनच्या शाळेत शिकू लागलात. खरंतर ‘हुशार विद्यार्थी’ म्हणून तुमची पहिली ओळख इथेच झाली. घरातील गरिबी वाढल्याने तुम्ही औंध संस्थानात राहायला जाण्याचा निर्णय घेतलात आणि तोही एका मित्राच्या सांगण्यावरुन. गरीब विद्यार्थ्यांना औंध संस्थानात मोफत जेवण मिळत म्हणून तिथे तुम्ही दाखल झालात खरे.. मात्र, शिक्षणासाठी हालअपेष्टा सुरुच राहिल्या. दरम्यान, प्लेगची साथ पसरली आणि औंध संस्थानातील शिक्षण अर्धवट सोडून तुम्ही पुन्हा पालघरल परतलात. मग त्यानंतर पुण्याच्या नूतन विद्यालयात दाखल झालात. अखेर 1918 साली तुम्ही मॅट्रिक झालात. पुढे न्यू पूना कॉलेज म्हणजे आताच्या एस. पी. कॉलेजमधून एमएपर्यंतच शिक्षण पूर्ण करुन अंमळनेरमध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालात आणि तिथेच प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाचे प्रमुख. आणि इथेच आम्हाला आमचे ‘गुरुजी’ सापडले. तुमच्या रुपाने…

मनाने अतिश हळवे असणारे तुम्ही वसतिगृहातील मुलांना स्वावलंबनाचे धडे दिलेत. तुमच्यातला प्रेमळ शिक्षक खऱ्या अर्थाने इथे दिसला. विद्यार्थ्यांना सेवावृत्ती शिकवलीत. तुमचं शिक्षण हालाखीच्या परिस्थितीत झाली. मात्र, गरिबीपुढे कधीच हार मानायची नाही आणि त्यात शिक्षणासाठी तर नाहीच नाही, ही शिकवण तुम्ही विद्यार्थ्यांना स्वानुभवातून पटवून दिलीत.
“करी मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे”
असे म्हणत तुम्ही विद्यार्थ्यांचं मनोरंजन करत गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण दिलेत. छान छान गोष्टी, धडपडणारी मुले, आस्तिक, मिती, रामाचा शेला ही पुस्तकं तुम्ही यासाठीच खास लहान मुलांसाठी लिहिलीत. 1928 मध्ये याच प्रेरणेतून ‘विद्यार्थी’ मासिकही सुरु केलंत. तुमच्या शिक्षकी पेशाचं वर्णन तुमच्याच भाषेत सांगायचं तर, गुळाच्या ढेपेला जशा मुंग्या चिकटतात. तशी तुमच्या भोवती मुलं गोळा होत असत. खरंतर तुमची स्तुती तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही आता असतात, तर पटकन म्हणाला असातात, ‘मी काहीच केलं नाही. माझे विद्यार्थीच हुशार आहेत.’ पण खरंच, गुरुजी, तुमच्यातला मोठेपणा शब्दात व्यक्त न करणारा आहे.

पुढे महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन तुम्ही 1930 चया सुमारास देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतलीत. समाजिक क्षेत्र ते देशाचा स्वातंत्र्य लढा आणि पुन्हा समाजकार्य असा प्रवास असणारे बहुधा तुम्ही देशातील एकमेव असाल. स्वार्थाचा ज्याला कधी स्पर्शही झाला नाही, अशातले तुम्ही होतात.

गुरुजी, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्यानंतर 1930 ते 1950 या कालावधीत तुम्ही जवळपास 6 वर्षे 6 महिने तुरुंगवास भोगलात. मग तुम्ही कधी धुळ्याच्या तुरुंगात तर कधी नाशिकच्या, जळगाव आणि येरवाड्याच्या तुरुंगातही तुम्ही होतात. 1933 साली नाशिकच्या तुरुंगात असताना तुम्ही रोज रात्री आपल्या सहकाऱ्यांना आईच्या आठवणी सांगितल्यात आणि याच आठवणी पुढे सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव लिहून काढल्यात.. त्या आठवणींचं लेखन रुपांतर म्हणजे ‘श्यामची आई’


गुरुजी, श्यामच्या आईबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आजही आपण पाहिलं तर लक्षात येईल की, दर शंभरा मुलांपैकी 80-85 मुला-मुलींना पहिलं पुस्तक ‘श्यामची आई’चं वाचलं असेल, अशी मला खात्री आहे. संस्कारचं विद्यापीठ म्हणून उगाच मराठी साहित्यकारांनी या पुस्तकाचा गौरव केला नाही. अनेकजण अनेकदा आपपाल्या पुस्तकाबद्दल म्हणतात, ‘मी प्रचंड मेहनतीने हे पुस्तक लिहिलं आहे’.. मात्र, तुमच्या पुस्तकाबद्दल नेहमी म्हटलं जातं की, “श्यामची आई हे पुस्तक आसवांनी लिहिलं गेलं आहे. दाटून आलेल्या गळ्यातून आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून हे महाकाव्य लिहिलं गेलं आहे.” खरंच आहे हे. श्यामची आई वाचत असताना कुठलंही पान उघडलं आणि डोळ्यातून टचकन पाणी नाही आलं, तरच नवल. “कोंड्याचा मांडा करुन कसा खावा आणि गरिबीतही आपले स्वत्व व सत्त्व न गमविता कसे रहावे, हे माझ्या आईनेच मला शिकवले.” असे म्हणत तुम्ही मातृप्रेमाचं महाकाव्य चितारलंत…‘श्यामची आई’च्या रुपाने. अमृताशी पैजा जिंकण्याचं सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे, हे ज्ञानोबा माऊलींचं म्हणणं ‘श्यामची आई’ वाचल्यानंतर मनोमन पटतं.

गुरुजी, श्यामची आई वाचताना एक प्रश्न राहून राहून पडतो, तो म्हणजे तुम्ही 45 रात्रींपैकी 42 रात्रींच्या गोष्टी सांगितल्यात. मात्र त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हे सांगितलंत नाही. हा प्रश्न कायम माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना पडतो. पण तो प्रश्न फार मोठा ठरत नाही. कारण तुम्ही 42 रात्रीत सांगितलेल्या गोष्टी आमचं आयुष्य घडवण्यासाठी आणि येणाऱ्या कोट्यवधी पिढ्यांना संस्कार शिकवण्यासाठी पुरेशा आहेत. तुमच्याच शब्दात या पुस्तकाचं वर्णन करायचं तर, ह्रदयातील सारा जिव्हाळा तुम्ही यात ओतलेला आहे. आणि हा जिव्हाला आम्हाला आयुष्य जगण्याची दिशा देतो.

गुरुजी तुम्हाला माहित आहे का, हल्ली पुस्तकाच्या मालकीहक्कावरुन किती वाद होतात. कुणाचं पुस्तक कुणी चोरतं तर कुणी थेट कथाच. मग कोर्ट कचेऱ्या वगैरे. पण मला येथे तुमच्या एका प्रसंगाचा आलर्जून उल्लेख करावा लागेल. तुम्हाला आठवतंय, श्यामची आई प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी ‘पत्री’ कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. कारण तो संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे तुम्हाला 2 हजार रुपयांचा जामीनही भरावा लागला होता. पण गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला फटका सोसावा लागला. याचं तुम्हाला वाईट वाटलं आणि तुम्ही चक्क ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क अवघ्या 500 रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकले. गुरुजी, तुम्हाला सांगतो, हा मनाचा मोठेपणा आणि असं संवेदनशील मन आता नाही उरले या जगात. आणि असतील तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच.

पंढरीच्या पांडुरंगाला बडव्यांच्या तावडीतून मुक्त करणाऱ्या तमच्यासारख्या पांडुरंगाची आजही या समाजाला गरज आहे. शोषित, वंचितांचे प्रश्न आजही तसेच आहे, जसे तुमच्या काळात होते.

तुमच्याबद्दल जेवढं लिहावं, बोलावं तेवढं कमीच… तुम्ही आईचं महात्म्य 42 रात्रीत सहकाऱ्यांना सांगितलंत…पण गुरुजी, तुमच्याबद्दल सांगण्यासाठी 42 जन्म लागतील. ही अतिशोयोक्ती नाही. कारण संस्काराचे जे धडे तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने येणाऱ्या शेकडो पिढ्यांना दिलेत, ते शब्दांत मांडता किंवा व्यक्त करता न येण्यासारखं आहेत.

तुमचाच,
एक लाडका विद्यार्थी
- नामदेव अंजना काटकर