श्री रामेश्वर महादेव
श्री रामेश्वर महादेवाची कथा महाकाल वनाची महती दर्शवते. परशुरामांनी कित्येक तीर्थ स्थळांचे दर्शन घेतले आणि कित्येक तपश्चर्या केल्या, परंतु त्यांच्या ब्रम्ह हत्येचे पातक हे महाकाल वनातील श्री रामेश्वर महादेवाच्या पूजनाने निवारण झाले. पौराणिक कथांनुसार त्रेता युगात एकदा शस्त्र धारण करणारे आणि सर्वगुणसंपन्न असे भगवान परशुराम यांनी अवतार घेतला. ते भगवान विष्णूंचा अवतार होते, आणि त्यांचा जन्म भृगु ऋषींच्या वरदानाच्या प्रभावामुळे झाला होता. त्यांचे वडील म्हणजे महर्षी जमदग्नी हे होते आणि मातेचे नाव रेणुका होते. परशुरामाला ३ मोठे भाऊ होते, परंतु त्या सर्वांमध्ये परशुराम हेच सर्वांत तेजस्वी आणि सर्वांत योग्य असे होते. एकदा यज्ञासाठी पाणी हवे होते, म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकाला गंगेच्या तटावर पाणी आणायला पाठवले. गंगेच्या तटावर गंधर्व राज चित्ररथ अप्सरांसोबत विहार करत होता, ज्याला पाहून रेणुका आसक्त झाली आणि काही वेळ तिथेच थांबून राहिली. यामुळे तिला परत यायला उशीर झाला आणि हवन काळ व्यतीत होऊन गेला. या गोष्टीमुळे जमदग्नी ऋषी अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांनी याला रेणुकाचे आर्य विरोधी आचरण मानले. क्रुद्ध होऊन त्यांनी आपल्या सर्व पुत्रांना रेणुकाचा वध करण्याचा आदेश दिला. परंतु मातृप्रेम आड आले आणि एकही पुत्राने त्यांच्या या आज्ञेचे पालन केले नाही. त्यामुळे आणखीनच क्रोधीत झालेल्या जमदग्नी मुनींनी आपल्या पुत्रांना विचारशक्ती नष्ट होण्याचा शाप दिला.
तेव्हा वडिलांच्या तपोबलाने प्रभावित झालेल्या भगवान परशुरामांनी त्यांच्या आज्ञेचे पालन करत आपल्या मातेचा शिरच्छेद केला. परशुरामाने पित्याची आज्ञा तत्परतेने पालन केली हे पाहून जमदग्नी मुनी अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागण्यास संगीतले. परशुरामांनी आपली माता पुन्हा जिवंत व्हावी आणि आपल्या भावांची विचारशक्ती परत यावी असे वरदान मागितले. वरदानात देखील परशुरामाने स्वतःसाठी काहीही मागितले नाही तर आपले भाऊ आणि मातेसाठी प्रार्थना केली, हे पाहून जमदग्नी मुनी आणखीनच प्रसन्न झाले आणि वरदान देण्यासोबतच त्यांनी परशुरामाला सांगितले की या पृथ्वीवर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. तू अजेय राहशील. तू अग्नीतून उत्पन्न होणाऱ्या या दृढ परशुला धारण कर. या तीक्ष्ण धार असलेल्या परशुमुळे तू प्रसिद्ध होशील. वरदानाचे फळ म्हणून भाऊ आणि माता जिवंत झाली, परंतु परशुरामांच्या माथी मातृहत्या आणि ब्रम्ह हत्येचे पातक चढले.
काही काळानंतर हैहय वंशात कार्तवीर्य अर्जुन नावाचा राजा आला. तो सहस्त्र बाहू होता. त्याला सहस्त्रार्जुन असेही ओळखले जाते. त्याने कामधेनु गायीसाठी जमदग्नी ऋषींना मारले. वडिलांच्या हत्येमुळे क्रोधीत झालेल्या भगवान परशुरामांनी त्याचे हजार हात तोडून टाकले आणि त्याचा वध केला. मग परशूने त्याची संपूर्ण सेना मारून टाकली. याच अपराधाला धरून त्यांनी २१ वेळा संपूर्ण क्षत्रिय वंशाचा नाश केला. मग त्यांनी कश्यप मुनींना पृथ्वी दान केली आणि ब्रम्ह हत्येच्या पापाचे निवारण करण्यासाठी अश्वमेध यज्ञ केला. अश्व, रथ, सुवर्ण असे अनेक प्रकारचे दान केले. परंतु ब्रम्ह हत्येचे पाप तरी देखील दूर झाले नाही. मग ते रेवत पर्वतावर गेले आणि तिथे जाऊन त्यांनी कठोर तपश्चर्या केली. तरीही दोश गेला नाही तेव्हा ते हिमालय पर्वतावर बद्रिकाश्रम इथे गेले. त्यानंतर नर्मदा, चन्द्रभागा, गया, कुरुक्षेत्र, नैमीवर, पुष्कर, प्रयाग, केदारेश्वर इत्यादी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन तिथे स्नान केले. तरी देखील त्यंच्या दोषाचे निवारण झाले नाही. तेव्हा ते अतिशय दुःखी झाले आणि उदास राहू लागले. त्यांना वाटू लागले की शास्त्रांत वर्णन केलेले तीर्थ, दान यांचे महात्म्य हे थोतांड आहे. तेव्हा तिथे नारद मुनी आले. परशुरामाने सांगितले की मी वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी मातेचा वाढ केला, त्यामुळे मला ब्रम्ह हत्येचे पाप लागले. हा दोष नाहीसा करण्यासाठी मी अश्वमेश यज्ञ केला, पर्वतावर जाऊन तप केले, अनेक तीर्थांचे दर्शन घेतले आणि स्नान केले, परंतु हे ब्रह्महत्येचे पातक काही माझ्यावरून दूर होत नाही. तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुम्ही कृपया महाकाल वनात जा. तिथे जटेश्वर महादेवाच्या जवळ असलेल्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन करा. त्याने तुमचे पातक दूर होईल. नारद मुनींचे बोल ऐकून भगवान परशुराम महाकाल वनात आले आणि इथे येऊन नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे दिव्य शिवलिंगाचे पूजन केले. त्यांनी पूर्ण श्रद्धेने केलेल्या पूजनाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांचे ब्रम्ह हत्येचे पातक दूर केले.
मान्यता आहे की रामेश्वर महादेवाच्या दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात. असे मानले जाते की इथे दर्शन घेतल्याने विजयश्री प्राप्त होते. श्री रामेश्वर महादेवाचे मंदिर सती दरवाजाजवळ रामेश्वर गल्ली इथे वसलेले आहे.