Android app on Google Play

 

कृष्णशिष्टाई - भाग ८

 

कौरव दरबारातील सर्व प्रयत्न असफल झाल्यावर पांडवांकडे परत जाण्यापूर्वी कृष्णाने दुसरे दिवशी सकाळी कर्णाची एकांतात भेट घेतली. त्यावेळी त्याने कर्णाला तूं कुंतीपुत्र या नात्याने पांडवांचाच वडील भाऊ आहेस असे सांगितले. त्यांचेविरुद्ध तू दुर्योधनाची बाजू घेणे उचित नाही. पांडव सत्य कळल्यावर तुला वडील भावाचा सर्व सन्मान देतील, तू दुर्योधनाची बाजू सोडलीस तर अजूनहि शम होईल व पांडवाना मिळणार्‍या राज्यभागाचा तूच मालक होशील, द्रौपदी ही सर्व पांडवांची पत्नी या नात्याने तुझीहि पत्नी होईल असे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व जन्म सूतपुत्र म्हणून काढल्यावर आता मला यातून काय मिळणार? दुर्योधनाने मला सर्व सन्मान, वैभव दिले आहे. त्याची बाजू अशी आयत्या वेळी मी सोडली तर ती अर्जुनाला भिऊन, असेच सर्व जग म्हणेल व माझी छीथू होईल. आता वेळ गेली आहे व मला असे करणे मुळीच उचित नाही असे म्हणून कृष्णाच्या सूचनेला त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा कृष्णाने नाइलाज होऊन त्याचेजवळ दुर्योधनाला निरोप दिला की आजपासून सात दिवसानी कार्तिक अमावास्या आहे त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आपली रणांगणावर गाठ पडू द्या. त्यानंतर कृष्ण रथात बसून सरळ उपप्लव्याला पांडवांकडे गेला.दुसरी महत्वाची घटना म्हणजे कृष्ण परत गेला व अमावास्येला युद्ध सुरू करण्याचे ठरले असे कळल्यावर खुद्द कुंतीने भल्या सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना कर्णाला गाठून ’तू माझाच पुत्र आहेस व पांडवांचा वडील भाऊ आहेस तेव्हा त्यांच्या विरुद्ध जाऊ नको असे विनवले. कर्णाने तिलाही स्पष्ट नकारच दिला. फक्त एकच गोष्ट कबूल केली कीं ’मी अर्जुन सोडून इतर चारांशी लढताना त्यांचा वध करणार नाही. माझे व अर्जुनाचे युद्ध मात्र अटळ आहे व आमच्यापैकी कोणीहि एक जगला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील.’ कुंतीला एवढ्याच आश्वासनावर समाधान मानावे लागले.या दोन घटनांमध्ये कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले असे म्हणावे लागते. कृष्ण वा कुंती दोघानीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाही. सूर्यापासून जन्म याचेवर श्रद्धा असेल तर प्रश्न उरत नाही पण सर्व कथा माणसांची आहे व माणसापासूनच सर्वांचे जन्म आहेत हे मान्य केले तर हा प्रश्न उरतो. कर्णाचा खरा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असता तर ते यावेळी सांगावयास प्रत्यवाय नव्हता. त्यामुळे माझ्यामते कर्ण हा (बहुधा) खरोखर सूतपुत्रच असावा! याबद्दल मी कर्णावर लेखन करीन तेव्हा जास्त विस्ताराने लिहिणार आहे. दुसरी नवलाची गोष्ट म्हणजे कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कृष्णाला कसे माहीत होते? तो देवाचा अवतार तेव्हा त्याला सर्वच ज्ञात असे मानले तर प्रश्न उरत नाही! पण तो मानवच असे मानणारांसाठी शंका उरते! माझे मते शिष्टाई असफल होऊन कृष्ण विदुराकडे परत आला व कुंतीला भेटून तिला सर्व हकीगत सांगितली तेव्हा पुत्रस्नेहाने कुंतीनेच आपले एवढा दीर्घकाळ जपलेले गुपित स्वत:च कृष्णाला सांगून ’तू हे कर्णाला सांग व त्याला वळवण्याचा अखेरचा प्रयत्न कर’ असे म्हटले असले पाहिजे. तो प्रयत्नहि असफळ झाला व युद्ध होणार हे कळल्यावर मात्र सर्व भीडभाड बाजूला ठेवून तिने स्वत:च कर्णाला भेटून व त्याचे जन्मरहस्य स्वमुखाने सांगून अखेरची विनवणी केली. तीहि असफळ झाली ते एकप्रकारे अटळच होते.अशा प्रकारे सर्व प्रयत्न संपून अखेर कौरव-पांडवाची गाठ नियतीने ठरवल्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर पडली. कृष्णशिष्टाईची कथा येथे संपली. या प्रकरणामध्ये कॄष्णाचे मानवी पातळीवरील सर्व अलौकिक गुण प्रगट झालेले दिसून येतात. त्याला अवतार मानण्याची मला त्यामुळेच गरज वाटत नाही! तो एक थोर व आदर्श मानव म्हणूनच आपल्याला प्रिय व्हावा हेच योग्य.