Get it on Google Play
Download on the App Store

कृष्णशिष्टाई - भाग ५

इकडे पांडवांकडे कृष्ण कौरवदरबारात जाणार यावर बरीच चर्चा झाली. युधिष्ठिराने भीति व्यक्त केली कीं तुझा अपमान होईल वा तुला धोका होईल. कृष्ण म्हणाला की तूं माझी काळजी करू नको. माझा मी समर्थ आहे. भीमार्जुनानी प्रथम म्हटले कीं युद्ध टळेल असेच तू बोल. यावर कृष्णाने त्यांची हेटाळणी केली. तेव्हा रागावून दोघानीहि म्हटले की ’तू आमचे मन ओळखत नाहीस काय? कुलक्षय टळत असेल तर ठीकच पण नसेल तर आमचा प्रताप दिसेलच.’ कृष्णानेहि म्हटले की ’यशाची मुळीच आशा नाही पण लोकांनी आपल्याला बोल लावू नये यासाठी मी शेवटचा प्रयत्न करणार आहें’. सहदेव व सात्यकी या दोघानी मात्र म्हटले कीं ’आम्हाला अपमानांचा बदला घेण्यासाठी युद्धच हवे आहे!’ द्रौपदीने आपल्या सर्व घोर अपमानांची कृष्णाला आठवण देऊन म्हटले कीं ’भीमार्जुनाना शम हवा असेच वाटत असेल तर माझा वृद्ध पिता, माझे बंधुबांधव, माझे पुत्र व अभिमन्यु हेच लढतील व अपमानांचा बदला घेतील!’ कृष्णाने तिचे सांत्वन केले व तुला हवे तेच घडेल असे म्हटले. युधिष्ठिराचे मत विचारात घेऊन कॄष्णाने सर्व शस्त्रास्त्रे, सैन्य, सात्यकी व कृतवर्मा यांना बरोबर घेतले. अखेर निघतेवेळी अर्जुनाने पुन्हा स्पष्ट सांगितले कीं अर्धे राज्य किंवा युद्ध! अर्जुनाचा ठाम निर्धार ऐकून भीमाला फार हर्ष जाला.

इकडे कौरवांकडे, कृष्ण येतो आहे हे कळल्यावर, धृतराष्ट्राने त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली. त्याच्यावर देणग्यांचा वर्षाव करण्याचा बेत केला. विदुराने त्याला खडसावले की तुझी सख्य करण्याची खरी इच्छा नाही पण तू कृष्णाला वश करून घेण्याची आशा करतो आहेस पण ती फोल आहे. तुझ्या स्वागताकडे तो ढुंकूनही पाहणार नाही. दुर्योधनाने याला दुजोरा दिला पण आपल्या स्वभावाप्रमाणे म्हटले की फार मोठा सत्कार केला तर तो भीतीपोटी आहे असे कृष्ण समजेल! उलट माझा तर त्यालाच पकडण्य़ाचा बेत आहे! यावर, हा दुर्योधन पापमार्गाने जात आहे व धृतराष्ट्रा तूंहि त्याचे अनुकरण करू इच्छितोस! मला हे ऐकवत नाही असे म्हणून विदुर सभेतून उठून गेला.

दुसरे दिवशी कृष्ण हस्तिनापुराला आला. भीष्मद्रोणानी त्याचे वाटेतच स्वागत केले. धृतराष्ट्राच्या वाड्यांत सर्वांचे क्षेम कुशल विचारून तो विदुराकडे गेला. तेथे कुंतीची भेट झाली. कुंतीने पांडवाना भोगाव्या लागलेल्या विपत्तींबद्दल शोक केला. पांडवाना, तुमचा पुरुषार्थ दाखवा असा स्पष्ट निरोप दिला. कृष्णाने सांत्वन केल्यावर मात्र, धर्माचा लोप न करतां व कपट न करतां पांडवांच्या हिताचे असे सर्व तू कर असे त्याला सांगितले. त्यानंतर कृष्ण दुर्योधनाला भेटला. त्याने स्वागत करून भोजनाचे आमंत्रण दिले ते मात्र कृष्णाने नाकारले. ’असें कां? तुझे-माझे काही भांडण नाही’ असे दुर्योधनाने म्हटल्यावर, ’पांडवांचा द्वेष तूं करतॊ आहेस व मी त्यांचा दूत म्हणून आलो आहे त्यामुळे तुझ्याकडे अन्नग्रहन मला उचित नाही, मी फक्त विदुराकडेच जेवेन’ असे म्हणून कृष्ण परत आला.

विदुराकडे भोजन होऊन रात्री विश्रांति घेताना विदुराने मत दिले की ’तुझे येणे योग्य नाही. दुर्यॊधन स्वत:च्या, कर्णाच्या व भीष्म-द्रोणांच्या बळावर विसंबून शम करण्यास मुळीच तयार नाही. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. त्या दुष्टांच्या मेळाव्यात तू जाऊच नकॊ.’ कृष्णाने उत्तर दिले की ’मी कौरवांचाहि आप्त व मित्र आहे. शक्य असूनहि मी युद्ध टाळण्य़ाचा प्रयत्न केला नाही असे कोणी म्हणू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करून मला लोकनिंदा टाळावयाची आहे.’

या सर्व मतप्रदर्शनावरून असे दिसते की, सहदेव, सात्यकी, द्रौपदी व कुंती याना युद्धच हवे होते. भीम व मुख्यत्वे अर्जुन याना कुलक्षय नको होता. पण युद्धाची त्यांची तयारी होती. युधिष्ठिरालाहि कुलक्षय नको होता पण पांच गावे कां होईना, पण दुर्योधनाने दिलींच पाहिजेत म्हणजे द्यूताचा पण पुरा न केल्याचा ठपका येणार नाही असे वाटत होते. युद्ध झालेच तर त्याचा निर्णय काय लागेल याबद्दलहि तो साशंक असावा. अपमानांच्या बदल्य़ासाठी युद्ध त्याला आवश्यक वाटत नव्हते. खरे तर युद्ध अटळच आहे हेहि सर्वांना दिसत होते.

दुसर्‍या दिवशी कौरवदरबारात काय झाले ते पुढील भागात वाचा.