Android app on Google Play

 

कृष्णशिष्टाई - भाग ४

 

संजय पांडवाना बनवण्य़ात अपेशी होऊन परत गेला व त्याने प्रथम धृतराष्ट्राची भेट घेतली. होणार्‍या युद्धाला कौरवच जबाबदार राहतील असे आपले स्पष्ट मत सांगून, पांडवांचा संदेश उद्यां दरबारात सांगेन असे म्हणून तो घरी गेला. अस्वस्थ होऊन धृतराष्ट्राने विदुराला बोलावून त्याच्याशी मसलत केली. त्याने अनेक सद्विचार सांगितले पण धृतराष्ट्र अखेर म्हणाला की मला सर्व पटते पण दुर्योधन समोर आला की माझी बुद्धि फिरते!
दुसरे दिवशी दरबारात धृतराष्ट्राने प्रथम, अर्जुन काय म्हणाला, असे संजयाला विचारले. संजयाने सांगितले कीं अर्जुनाने अनेक प्रकारे आपला निर्धार व्यक्त करून कळविले आहे कीं युद्धांत मी तुम्हा सर्वांचा खास नाश करीन तेव्हा भीष्म, द्रोण, कृप, विदुर यांचा सल्ला ऎका. भीष्म, द्रोणानी कबुली दिली कीं आपण अर्जुनापुढे टिकणार नाही. कर्णाने नेहेमीप्रमाणे, मी एकटाच सर्व पांडवाना मारीन, अशी प्रौढी मिरवली. भीष्माने धृतराष्ट्राला समजावले कीं यात काही अर्थ नाही. हा अनेक वेळा पांडवांकडून हरला आहे हे विसरू नका. द्रोणानेहि भीष्माला दुजोरा दिला. धृतराष्ट्राने नेहेमीप्रमाणे त्यांचेकडे दुर्लक्ष केले! त्याने संजयाला विचारले कीं कोणाच्या भरवशावर पांडव युद्धाला तयार झाले आहेत? आमचे बळ त्याना माहीत नाही काय? त्यावर संजयाने पांडवांकडील सर्व वीरांचे सविस्तर वर्णन केले. पुन्हा पलटी घेऊन, भीमार्जुनांची आपणाला वाटणारी धास्ती सांगून, कौरवांनी युद्ध न करणेच चांगले असे मला वाटते असे धृतराष्ट्र म्हणाला. त्याची धरसोड वृत्ति यातून दिसते.
यावर दुर्योधनाने म्हटले कीं द्यूतांनंतर लगेच सर्व यादव, पांचाल व इतर मित्र पांडवांकडे जमून आमचे पारिपत्य करण्यास तयार झाले होते तेव्हा मदतीला कोणी नसल्यामुळे मला भय होते तेव्हा भीष्म-द्रोणानी मला धीर दिला. आता तर त्यांच्याशिवाय इतरही अनेक वीर व प्रचंड सैन्य माझेपाशी जमले आहे. माझे बळ जाणूनच युधिष्ठिर फक्त पाच गावे मागतो आहे. मला पराभवाची मुळीच भीति वाटत नाही.
अशीच चर्चा पुन्हापुन्हा होऊन अखेर धृतराष्ट्राने दुर्योधनाला दाखवून दिले की भीष्म-द्रोण युद्धाला मुळीच उत्सुक नाहीत. यावर दुर्योधनाने स्पष्ट केले कीं माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे. आम्ही जिंकूं वा मरूं पण सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि मी जिवंत असेपर्यंत पांडवाना मिळणार नाही! कर्णाने पुन्हा बढाया मारल्या व भीष्माने त्याची निंदा केली. यावर कर्णाने ’भीष्मा तू चिरशांत झाल्यावरच माझा प्रताप सर्वजण पाहतील’ असे म्हणून सभात्याग केला. कौरवपक्षात ही एक मोठी फूट पडली! यानंतर संजयाने सर्वांना सांगितले की अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्ण स्वत:च पांडवांतर्फे शिष्टाई करण्यासाठी येणार आहे.
यापुढील घटना पुढील भागात वाचा.