प्रकरण तिसरे
कृष्णाच्या सूचनेवर बराच बेळ चर्चा चालून नंतर भीमाने मत दिले कीं आपण स्वत:, अर्जुन व कृष्ण यांनी जरासंधाच्या वधाचा प्रयत्न केला पाहिजे. कॄष्णाने पुन:पुन्हा जरासंधाचे बळ, त्याच्या अंगातील सम्राटाला शोभणारे सर्व गुण, त्याचबरोबर सर्व राजेलोकांचा त्याने चालवलेला छळ व कैदेतील राजांचे बळी द्यावयाचा त्याचा बेत वर्णन करून जो जरासंधाचा हा बेत हाणून पाडू शकेल तोच सम्राट म्हणविण्यास पात्र ठरेल असे सांगितले. या सर्व चर्चेच्या वेळी हे राजे कोण होते याचा काहीहि खुलासा महाभारतात नाही! भीम, अर्जुन व कृष्ण यांनी तिघानीच मिळून जरासंधाशी लढण्याचा भीमाचा बेत युधिष्ठिराला मुळीच पसंत झाला नाही. त्यापेक्षा तो राजसूय यज्ञ करण्याचा बेतच सोडून देण्यास तयार झाला. पण मग अर्जुनालाही जोर चढला. तोही भीमाच्या बेताला अनुकूल झाला. आपल्यासारख्या बलवानानी अन्याय्य गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे असे त्याने मत दिले. भीम व अर्जुन कृष्णाच्या मनातलेच बोलल्यामुळे आता कृष्णालाही जोर आला. जरासंधाबरोबर सरळ युद्ध करून जिंकणे अशक्य असल्यामुळे, गुप्तपणे त्याच्या वाड्यात प्रवेश करून त्याच्या वधाचा प्रयत्न करावा असाच बेत त्याने सुचवला. युधिष्ठिराच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने पुन्हा एकदा त्याला जरासंधाच्या जन्माचा सर्व अद्भुत इतिहास सांगितला. तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले. असे असूनहि, कृष्णाने त्याचा जावई कंस याचा वध केल्यामुळे त्याचे यादवांशी व कृष्णाशी मोठे वैर होते व त्याच्या राजेलोकांना बळी देण्याच्या बेतामुळे कृष्णाला त्याचा वध हवा होता. कोण होते हे राजे? महाभारतात काही खुलासा नाही. कुरु, पांचाल, यादव सोडून इतर राजघराण्यानी जरासंधाचे वर्चस्व मान्य केले होते. कुरूंचा व जरासंधाचा झगडा झालेला नव्हता. यादव द्वारकेला गेल्यावर इतर कोणा राजाशी जरासंधाचे वितुष्ट आल्याचाही उल्लेख दिसत नाही. तेव्हा हे राजे म्हणजे, वृष्णी, अंधक, भोज या यादवांच्याच वेगवेगळ्या कुळांतील असले पाहिजेत. यादव व जरासंध यांच्यांतील अनेक युद्धांमध्ये हे कैदी झाले असावे व यादव द्वारकेला गेल्यामुळे आता याना कसे सोडवावे हा प्रष्नच होता. कृष्ण सोडून इतर कुणा राजकुळाला याची चिंता पडलेली दिसत नाही. जरासंधाला विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती हे त्याचे कारण असू शकेल. अन्याय करणाऱ्या इतर राजांना नारद वा इतर थोर ऋषि उपदेश करीत तसाहि जरासंधाला कोणी केलेला दिसत नाही. या राजांना युद्धात जिंकून घेतलेले असल्यामुळे त्याना जरासंधाने कैदेत ठेवणे कोणाला फारसे अनुचित वाटले नसावे. यज्ञात बळि देणे अनुचितच होते पण ती वेळ आलेली नव्हती व त्याची चिंता एकट्या कृष्णालाच पडली होती यावरून ते सर्व यादवच असावे या तर्काला पुष्टि मिळते.
कृष्णाचा बेत सरळ होता. कृष्ण अर्जुन व भीम जरासंधासमोर द्वंद्वासाठी उभे राहिले तर आपल्या बळाच्या अभिमानामुळे तो भीमाशी मल्लयुद्ध करणेच पसंत करील व भीमच त्याचा वध करूं शकेल हा त्याचा विचार होता! म्हणून त्याने अखेर युधिष्ठिराचे मन आपल्या बेताकडे वळवून घेतले. कृष्ण, अर्जुन व भीम यांनी लवकरच गुप्तपणे मगधाची राजधानी गिरिव्रज गाठली. स्नातक ब्राह्मणाच्या वेषात गिरिव्रजाला पोचलेल्या या तिघांनी शहरात काही दंगामस्ती करून नागरिकांमध्ये स्वत:बद्दल धाक, आश्चर्य अशा भावना निर्माण केल्या व अखेर ते जरासंधासमोर आले.त्यांच्या ब्राह्मणवेषाचा मान ठेवून पण त्यांना न ओळखून, जरासंधाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला नाही. तुम्ही कोण आहात असे जरासंधाने स्पष्टच विचारल्यावर कृष्णाने त्याला आपल्या तिघांची ओळख करून दिली व तुझ्या दुष्कृत्यांमुळे, विशेषत: राजेलोकांचे बळी देण्याच्या तुझ्या बेतामुळे तुला शासन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे आव्हान त्याला दिले. जरासंधाने कृष्णाच्या आरोपांना समर्पक उत्तरे दिली. ’मी धर्मानेच राज्य करतॊ आहे व माझी प्रजा सुखी आहे. राजांना मी योग्य प्रकारे युद्ध करून जिंकले आहे व त्यांचे काहीहि करण्याचा मला अधिकार आहे. कुरुकुळाशी माझे मुळीच वैर नाही’ असे म्हटले. अखेर कृष्णाच्या मनांतील बेताप्रमाणेच, त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान स्वीकारले व कृष्ण वा अर्जुन यांना झिडकारून, बलवान भीमालाच प्रतिस्पर्धी ठरवले. कृष्ण व बलराम दोघेही मल्लविद्येत प्रवीण असूनहि, अद्यापपर्यंत त्यांची जरासंधाशी एकास एक अशी गाठ पडलेली नव्हती. कृष्णाचा मामा कंस याचा जरासंध हा सासरा तेव्हा भीमाच्या वा कृष्णाच्या मानाने तो खूपच वयस्क होता. तरीहि, स्वत: किंवा बलराम यांचेपेक्षाहि बक, हिडिंब याच्यासारख्या अमानुष बळ असलेल्या राक्षसाना मारू शकलेला भीम हाच एकटा जरासंधाशी लढू शकेल हे कृष्ण जाणून होता. महाभारतात, कृष्ण व बलराम यादवकुळातील असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जरासंध अवध्य होता असा खुलासा केला आहे पण तो फुसका वाटतो. ब्रह्मदेवाने हा वर जरासंधाला कां व केव्हा दिला हे सांगितलेले नाही! खरे कारण, माझ्या मते, जरासंधाने त्यांना मल्लयुद्धाची संधिच दिली नसती. त्यांना तो गवळीच मानत होता, बरोबरीचे राजकुळातले नव्हे!
भीम-जरासंध युद्ध तेरा दिवस अखंड चालले. अतिशयोक्ति सोडून दिली तरी दीर्घकाळ चालले हे खरे. अखेर जरासंध दमला पण भीम तरीहि जोरात होता. अखेर त्याने जरासंधाच्या तंगड्या धरून उलटसुलट ओढून त्याला मारले. कृष्ण, बलराम,शल्य, कर्ण वगैरे इतर कोणाही मल्लविद्येत प्रवीण व्यक्तीने एवढा दीर्घकाळ मल्लयुद्ध केल्याचे महाभारतात वा इतरत्रहि वर्णन आढळत नाही. भीमाच्या अफाट ताकदीवर कृष्णाने टाकलेला विश्वास भीमाने सार्थ ठरवला. जरासंध मेल्यावर, बंदीतील राजांना सोडवून, व जरासंधपुत्र सहदेव याला राज्यावर बसवून कृष्ण, अर्जुन व भीम विजयी होऊन इंद्रप्रस्थास परत आले. कृष्णाने जे योजले होते ते पार पडले.
या साऱ्या कथेमध्ये कृष्णाच्या अंगचे सर्व मानवी पातळीवरील लोकोत्तर गुण दिसून येतात. स्वत:चे शरीरबळ कदाचित पुरणार नाही व सैन्यबळावर विजय अशक्य तेथे त्याने योग्य व्यक्तीचा उपयोग केला. त्यासाठी दीर्घकाळ संधीची वाट पाहिली. राजसूय यज्ञच्या बेतामुळे ती प्राप्त होतांच तिचा कौशल्याने उपयोग करून घेतला. शत्रूचे बलस्थान जे अफाट शरीरबळ त्याच्या अभिमानालाच त्याने डिंवचले. सर्व बेत काळ्जीपूर्वक आखला व तडीस नेला. त्यांत, मुख्य म्हणजे, युधीष्ठिर, अर्जुन, भीम यांना समाविष्ट करून घेताना, ते कृष्णाच्या वैऱ्याशी लढत नसून जणू स्वत:च्याच वैऱ्याशी लढत आहेत अशी त्यांची मनॊभूमिका करून घेतली व अखेर भीमाकरवी आपल्या कुळाच्या एका न आटपणाऱ्या वैऱ्याचा शेवट घडवून आणला. कृष्णाला अवतार मानणे हा श्रद्धेचा भाग आहे. मात्र लोकोत्तर पुरुष मानावेच लागते ते अशा प्रसंगांमुळे व कथांमुळे!