Android app on Google Play

 

प्रकरण पहिले

 

महाभारतातील दोन विषय संपवून मी आता तिसरा विषय सुरू करीत आहे. महाभारतातील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा दुहेरी आहे. श्रीकृष्णाचे मानवी पातळीवरील लोकोत्तर गुणावगुणांचे चित्रण व दैवी पातळीवरील चित्रण. मानवी पातळीवर तो वीर पुरुष, राजनीतिज्ञ, मुत्सद्दी, विचारी, तत्त्वज्ञ असा वर्णिला आहे तर दैवी पातळीवर प्रत्यक्ष अवतार व अनेक अद्भुत कृत्ये करणारा! ’जय’ चे ’महाभारत’ होत गेले तसे लोकोत्तर पुरुष म्हणून असलेले महत्त्व कमी होत जाऊन ईश्वराचा अवतार या कल्पनेला जास्त उजाळा मिळत गेला असावा. त्याचे मानवी पातळीवरील चित्रण हे माझ्या मते जास्त मनोहारी आहे! जरासंध हा कृष्णाचा शत्रू, पांडवांचा नव्हे! पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने कृष्णाने त्याचा भीमाकडून वध घडवून आणला. या घटनेमध्ये कृष्णाचे मानवी पातळीवरील लोकोत्तर गुणावगुण प्रगट झालेले दिसतात. कृष्ण व पांडव यांची प्रथम भेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी झाली हे आपण पाहिलेच आहे. बाळपणापासून भीम हा महाबलवान असल्याच्या कथा सर्वश्रुत झाल्या होत्या. अनेक कौरवांना तो एकटाच भारी पडे. यामुळे दुर्योधन त्याचा द्वेष करीत असे. ही पार्श्वभूमि कृष्णाला ऐकून माहिती असणारच. वारणावतातून सुटून गेल्यावर वनांत हिंडताना हिडिंब व बकासुर या दोन महाबलवानांचा त्याने निव्वळ शरीरबळावर वध केला होता. हे वध कोणी केले हे आधी नक्की कळलेले नसले तरी पांडवांचा परिचय झाल्यावर ते कृष्णाला कळले होते. अर्जुनाने पण जिकल्यावर इतर राजांशी युद्ध करावे लागले तेव्हा एक झाड उपटून घेऊन भीमाने सर्वांना झोडपलेले कृष्णाने स्वत:च पाहिले होते. या साऱ्या गोष्टीतून कॄष्णाने मनाशी काही आडाखे बांधले असावे पण तो योग्य संधीची वाट पाहात होता. त्याच्यापुढे एक मोठा प्रष्ण होता! कृष्णाने कंसवध करून आजोबा उग्रसेन याला मथुरेच्या राज्यावर स्थापन केले. कंस हा जरासंधाचा जावई. जावयाच्या वधाने चिडलेल्या जरासंधाने तेव्हापासून वारंवार मथुरेवर हल्ले करून यादवांना सतावले होते. अठरावेळा युद्ध होऊनहि कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता. मात्र यादवांची खात्री झाली की आपण सुखाने मथुरेत राहू शकत नाही वा जरासंधाला मारूहि शकत नाही. नाइलाजाने वृष्णी, अंधक व भोज या तिन्ही यादवकुळानी, सर्व संपत्ति, गुरेढोरे यासह देशत्याग करून शेकडो मैल दूर पश्चिम समुद्रकिनारी नवीन द्वारकानगरी वसवून मजबूत राजधानी बनवली. यानंतर पुन्हा यादव व जरासंध यांचे युद्ध उद्भवले नाही. या अठरा युद्धांमध्ये, बहुधा, अनेक यादववीर कैदी झाले असावे. द्वारकेला दूर निघून गेल्यामुळे त्यांना सोडवण्याचा कोणताच मार्ग, यादवांना वा कृष्णाला उपलब्ध राहिला नव्हता. हा कृष्णापुढील जटिल प्रष्न होता. द्रौपदी स्वयंवरानंतर कृष्ण व पांडव याची मैत्री उत्तरोत्तर दृढ होत गेली. भीष्माने निक्षून सांगितल्यामुळे अखेर धृतराष्ट्राने पांडवाना अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थाला पाठवले. इंद्रप्रस्थ वसवण्यास कृष्णाने पांडवांना सर्व मदत केली. दीर्घकाळ इंद्रप्रस्थात राहून कृष्ण द्वारकेला परत गेला. नंतर त्याची व अर्जुनाची पुन्हा भेट अर्जुन तीर्थयात्रा करीत द्वारकेला पोचला तेव्हा झाली. तेव्हाही अर्जुनाला आवडलेल्या सुभद्रेशी त्याचा विवाह होण्यासाठी कृष्णाने सर्व मदत केली. त्याच्या सांगण्यावरूनच यादवानी अर्जुनाशी लढण्यापेक्षा अर्जुनाशी सख्य करणे श्रेयस्कर मानले! अर्जुन-सुभद्रा इंद्रप्रस्थाला परत गेलीं, मग अभिमन्यूचा व पांच पांडवपुत्रांचा जन्म झाला. या सर्व सुखाच्या काळातील पांडव व कृष्ण यांची मैत्री व परस्पर आदरभाव वाढत गेला. कृष्णार्जुनांनी मिळून खांडव वन जाळणे ही यातील अखेरची पायरी म्हणता येईल. त्यानंतर कृष्ण द्वारकेला परत गेला. आगीतून वांचलेल्या मयासुराकडून पांडवांनी मयसभा बनवून घेतली. मग त्यांना राजसूय यज्ञाची कल्पना सुचवली गेली. त्यानी अर्थातच लगेच कृष्णाला सल्लामसलतीसाठी बोलावून घेतले. आपला जटिल प्रष्न सोडवण्यासाठी कृष्ण बराच काळ ज्या संधीची वाट पहात होता ती आता आयतीच चालून आली! तिचा कॄष्णाने कसा फायदा करून घेतला हे पुढील भागात पाहू!