Android app on Google Play

 

बैद्यनाथ - ( सध्याचे झारखंड)

 


शिव पुराणानुसार, रावण भगवान शंकराचा भक्त होता. त्याने अतिशय कठीण तपश्चर्या केली आणि एक एक करून आपली मस्तके शंकराला अर्पण केली. त्याच्या या तपश्चर्येमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले. त्याची १० मस्तके शंकर भगवानांनी पुन्हा जोडली. रावणाने त्यांच्याकडून वर म्हणून भगवान शंकराला आपल्यासोबत लंकेला येण्यासाठी सांगितले. शंकरांनी रावणाची मागणी मान्य केली, पण त्याला एक अट घातली. अट अशी की लंकेला जाताना रावणाने भगवान शंकराचे शिवलिंग जर वाटेत कुठेही खाली जमिनीवर ठेवले, तर भगवान शंकर त्याच ठिकाणी स्थानापन्न होतील. रावणाने शंकराची ही अट मान्य केली आणि शिवलिंग उचलून लंकेकडे जाण्यास प्रारंभ केला. ही गोष्ट समजताच देवांच्या गोटात खळबळ उडाली. जर यदाकदाचित शंकर भगवान लंकेत प्रस्थापित झाले तर लंकेला पराभूत करणे कोणालाही कालत्रयी शक्य झाले नसते. रावणाला कोणीही कधीही हरवू शकले नसते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सार्वजण भगवान विष्णूंकडे गेले. सर्व देवतांनी विष्णूला विनंती केली की काहीही करून त्यांनी रावणाला शिवलिंग घेऊन लंकेला जाण्यापासून थांबवावे. देवांच्या प्रार्थनेला मान देऊन विष्णू भगवान एका ब्राम्हणाचे रूप घेऊन पृथ्वीवर गेले. त्यासोबतच, वरून देवाने रावणाच्या पोटात प्रवेश केला. वरुणदेव रावणाच्या पोटात शिरताच रावणाला तीव्र लघुशंका लागली. लघुशंका करण्यासाठी रावणाला शिवलिंग कोणाच्यातरी हातात देणे भाग होते. तेव्हाच तिथून ब्राम्हण रूपातील विष्णू भगवान त्याच्यासमोरून जात होते, रावणाने त्यांना काही वेळासाठी शिवलिंग पकडण्यासाठी विनंती केली. त्यांच्याकडे शिवलिंग देऊन तो लघुशंका करण्यासाठी निघून गेला. परंतु त्याच्या पोटात तर वरुणदेव जाऊन बसलेले होते. बराच वेळ झाला तरी रावण आला नाही म्हणून ब्राम्हणाने शिवलिंग खाली ठेवले. आणि लगेच वरुणदेव रावणाच्या पोटातून बाहेर निघून गेला. रावण जेव्हा ब्राम्हणाकडे आला तेव्हा त्याने पहिले की शिवलिंग खाली ठेवलेले आहे आणि ब्राम्हण निघून गेलेला आहे. त्याने शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु अटीनुसार भगवान शंकर त्याच जागेवर स्थानापन्न झालेले होते. शेवटी क्रोधीत होऊन रावणाने शिवलिंगावर मुष्टीप्रहार केला, ज्यामुळे ते शिवलिंग जमिनीत रुतून बसले. मग रावणाने त्याची क्षमा मागितली. असं म्हणतात की तो रोज लंकेहून शिवपूजा करण्यासाठी बैद्यनाथला येत असे. ज्या जागेवर ब्राम्हणाने शिवलिंग ठेवले, त्याच जागेवर आज शिवमंदिर आहे ज्याला बैद्यनाथ धाम असे म्हणतात.