Android app on Google Play

 

बनावट चलनी नोटा कशा ओळखाव्यात ?

 

भारतामध्ये सध्या खुप मोठ्या प्रमाणात खोट्या चलनी नोटा पसरल्या आहेत. तुम्ही बँक मध्ये पैसे डीपॉझीट करण्यासाठी गेलात आणि त्यामधील एखादी नोट बनावट आहे असे लक्षात आले तर बँक ती नोट रीझर्व बँकेकडे पाठवते मात्र त्याबदल्यात तुम्हाला काहीही मिळणार नाही. असे नुकसान होऊ नये म्हणून चलनी नोटा स्वीकारताना त्या नीट तपासून घ्या.

या नोटा ओळखता याव्यात यासाठी रीझर्व बँकेने एक वेबसाईट तयार केली आहे.
http://www.paisaboltahai.rbi.org.in/ येथे क्लिक करुन रीझर्व बँकेच्या वेबसाईटला भेट देता येईल.

१० रुपयांपासुन १००० रुपयांची नोट कशी तपासुन पहावी हे या वेबसाईटवर सविस्तर सांगण्यात आले आहे. येथे उदाहरणादाखल आपण ५०० रुपयांची नोट कशी तपासावी हे पाहुया -

खाली ५०० रुपयांच्या नोटेचे चित्र दिले आहे. या चित्रामध्ये ११ आकडे दर्शविण्यात आले आहेत. हे अकरा आकडे म्हणजे खर्या व बनावट नोटांमधील अकरा फरक आहेत.
१. वरील चित्रात जेथे १ आकडा दर्शविला आहे तेथे एक छोटीशी डीझाईन दिसतेय. ही डीझाईन म्हणजे 500 असे अर्धवट लिहिले आहे. जर नोट प्रकाशासमोर (Against light) धरुन पाहिली तर 500 असे पुर्ण लिहिले आहे असे आढळून येईल.
२. मोकळी दिसत असली तरी या जागेवर महात्मा गांधीजींचे चित्र आहे. नोट प्रकाशासमोर धरल्यास हे चित्र दिसून येईल.
३. एका विशिष्ट प्रकारच्या शाईने नोटेच्या मधोमध 500 असे मोठ्या टाईपमध्ये लिहिलेले असते. समोर नोट धरल्यास ही शाई हिरवी दिसते आणि विविध कोनांमध्ये (Different angles) धरल्यास ही शाई निळी दिसते.
४. हा फरक मानवी डोळ्यांना दिसत नाही. जेथे नोटेचा क्रमांक लिहिला आहे तो भाग अल्ट्रा व्हायोलेट (अतिनील किरणे) लाईट मध्ये धरल्यास चमकतो.
५. नोटेच्या मधोमध असणारी ही पातळ पट्टी तुटक तुटक दिसत असली तरी ती पुर्ण असते. नोट प्रकाशासमोर धरल्यास ती पुर्ण पाहता येते. यावर 'RBI', 'Bharat' आणि '500' असे लिहिलेले असते. ही पट्टी देखिल हिरवा आणि निळा असा रंग बदलते.
६. नोटेच्या मधोमध ''पाच सौ रुपये'' असे अक्षरात लिहिलेले असते ते एका वेगळ्या शाईने लिहिलेले असते. असे लिहिलेले आपण स्पर्शाने ओळखु शकतो. अंध व्यक्तींना नोट ओळखता यावी यासाठी ही सोय केलेली आहे. (मला मात्र स्पर्श करून असे जाणवले नाही !)
७. सातव्या क्रमांकाने दर्शविलेली, फुलांचे नक्षीकाम असलेली जी हिरवी पट्टी दिसतेय त्यामध्ये 500 रुपये असे लिहिलेले असते. नोटेची पातळ बाजू नजरेस समांतर ठेवून नीरखून पाहिल्यास असे लिहिलेले दिसते.
८. वर उल्लेख केलेली हिरवी पट्टी आणि गांधीजींचा फोटो यामधल्या भागात सुक्ष्म अक्षरात RBI आणि 500 असे लिहिलेले असते. सुक्ष्मदर्शीच्या (Magnifying glass) सहाय्याने हे पाहता येते.
९. अशोकस्तंभाच्या थोड्या वरच्या बाजूला एक छोटा ठीपका दिसतो. अंध व्यक्तींना स्पर्शाने ओळखता येईल असा हा ठीपका असतो.
१०. नोटेच्या मागील बाजुला नोट ज्या वर्षी छापली गेले ते नमूद केलेले असते.
११. वर पहिल्या क्रमांकावर उल्लेख केल्या प्रमाणे इथेही अर्धवट 500 असे लिहिलेले असते.

तेव्हा यापुढे नीट तपासून चलनी नोटा स्वीकारा आणि खोट्या नोटांमुळे होणार्या नुकसानापासून स्वतःला वाचवा.

लेखं- प्रणव उंडे.