Android app on Google Play

 

लैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र !!

 

वस्तुतः वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यात समाधानी लैंगिक जीवनाचा फार मोठा वाटा आहे. वैवाहिक जीवनात सुखदुःखाचा वाटा पतीपत्नीनी समानतेने उचलावा असं जर मानलं तर लैंगिक जीवनात मात्र ती भोग्य वस्तू म्हणून का ठरावी ? भावनेच्या भरात तिनं आपली इच्छा व्यक्त केली तर तिला वाईट चालीची कामिनी मानवयाचे आणि क्वचित प्रसंगी तिनं नापसंती दर्शविली तरी ती धर्मपत्नी म्हणून तिच्यामनाविरुद्ध समागम करावया, हा कुठला न्याय ? गर्भारपण-बाळंतपण ह्या सातत्याने येत राहणाऱ्या दिव्यातून ती आत्ता कुठं मोकळी होऊ पाहाते आहे आणि लैंगिक जीवनाचा मोकळेपणनं आनंद घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी तिच्या निरनिराळ्या वयातील भूमिकेनुरूप तिला लैंगिक ज्ञान मिळाले – मुलगी, तरुणी, नववधू, पत्नी आणि माता या सर्व अवस्थेत तिला योग्य मार्गदर्शन मिळालं तर लैंगिक शिक्षण हा सुखाचा मूलमंत्र ठरेल.

लैंगिक शिक्षण खरं म्हणजे आपल्याकडे नवीन नाही. वात्स्यायनादी ऋषिमुंनींनी त्याचा शास्त्रीय बैठकीवर विचार करून ग्रंथरचानाही केली होती. त्यांनी त्याला असं अवास्तवं महत्त्व दिलं नव्हतं. तसा तो विषय त्याज्यही मानला नव्हता. पुढे त्याला अनिष्ठ वळण लागलं आणि त्याचा बाऊ करून तो विषय त्याज्य मानला गेला. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे समाजजीवन झपाट्याने बदलत गेल व स्त्री पुरुष संमिश्र समाजपद्धती वाढत गेली, प्रौढ विवाहकडे तरुण वर्ग झुकू लागला. लैंगिक भावनेला खतपाणी घालून चेतविणारं हरतऱ्हेचे वाटल, व्यावसायिक भडक जाहीर बाजी व करमणूकीची साधने ह्यामुळे भोगवादी स्वैराचाराला उधाण आलं. त्यामुळं अवांच्छीत गर्भधारणा, गर्भपात, गुप्तरोग ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं. ह्या सर्व परिस्थिमुळे समाजशास्त्रज्ञांना वैद्यकवर्गाला व शिक्षणतज्ज्ञांना निकोप व जबाबदार लैंगिक शिक्षण देण्याची गरज भासू लागली. लैंगिक शिक्षणात पुढील माहितीचा अंतर्भाव होण्याची आवश्यकता आहे.

 (१) स्त्री पुरुष जननेंद्रियाची शारीरिक रचना व कार्य व त्याचा अर्थ-
स्त्री-
४६ गुणसुत्रे
स्त्री-बीजांड
(OVUM)
२३ गुणसूत्र
गर्भ २३+२३ = ४६ गुणसूत्रे = गर्भधारणा
पुरुष -
४६ गुणसुत्रे

शुक्रजंतू
(SPERM)
२३ गुणसूत्रे
 (२) भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षणाचा अर्थ जाणिवा व त्यायोगे दुसऱ्यावर अन्याय होणार नाही ह्याबाबत मार्गदर्शन.
 (३) जोडीदाराची निवड : गुण-दोष
 (४) जीवनातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीची आणि परिणामाची व त्यातील कर्तव्यबुद्धीची जाण निर्माण करणे.
 (५) गुप्तरोगांची माहिती.
 (६) जबाबदार पालकत्वाच्या दृष्टिकोणातून कुटुंबनियोजनाची माहिती देणं.

स्त्रीपुरुषाच्या जीवनात त्याच्या वयोमानानुसार त्यांना झेपेल एवढे लैंगिक शिक्षण शालेय शिक्षणक्रमांतून व पालकांकडून घरोघरी दिलं गेलं पाहिजे. मुलीला मातेकडून व मुलाला पित्याकडून पौगंडावस्थेत निरनिराळ्या पद्धतीनं ज्ञान दिलं गेलं पाहिजे.

५ ते १२ वयोगट-
ह्या वयात त्यांना लैंगिक आकर्षणाची भावना निर्माण झालेली नसते. शाळेत : प्राथमिक आरोग्याचे धडे देत असताना निसर्गातील प्रजोत्पादनाची माहिती पुरविणे. ह्याचा संदर्भ पुढील शिक्षणात मनुष्याच्या प्रजोत्पादनाशी जोडावयाचा असतो.

घरोघरी -
आईवडील आपल्याला आचरणातून सहजपणे काही ज्ञान उद्दिष्ट व मूल्ये यांचे संदेश मुलांमुलींना देत असतात. लहान मुलं कुतहुलापोटी आपल्या शरीराचा शोध घेतात व स्वतःच्या अवयवांपासून आनंद घेतात. उदाहरणार्थ लिंगाशी खेळणं,. नागडे उघडं वावरणं. अशावेळी पालक त्यांना रागवतात व चापटसुद्धा मारतात. लिंगाशी निगडीत गोष्टी घाण असतात लज्जास्पद आणि लपवावयाच्या असतात. अशा भावना मुलाच्या मनावर कुठंतरी खोलवर रुजतात व त्याबाबतची माहिती मिळविण्याची धिटाई मोकळेपणा त्यांना वाटत नाही. एवढंच नव्हे, तर भावी लैंगिक जीवनावर अशा अनुभवाचा विपरीत परिणाम होण्याची फार शक्यत असते. पालक विशेषतः स्त्रिया मुलामुलींशी वागताना त्यांच्यात भेदभाव करतात आणि मुलांमध्ये अहंगंड व मुलंमध्ये न्यूनगंड निर्माण करतात. ह टाळायला पाहिजे. लहान मुलं कुतुहलाच्यापोटी अनेक प्रश्न विचारून भंडावतात व पालक कौतुकानं, सहजतेनं त्याची उत्तरेही देतात परंतु ‘मी कुठून आलो ? कसा आलो ? या प्रश्नांबाबत बिचकतात. पळवाट शोधून खोटी उत्तर देतात तर कधी रागवतातसुद्धा. मुलाचे वय, त्याची जाण लक्षात घेऊन त्याला समजेल अशा सोप्या भाषेत, पण थोडक्यात व झेपेल ( मुलामुलींच एकत्र खेळणं, अभ्यास करणं हे त्यांच्या मनाला निरोगीपण मिळवून देत असतं. मुलांचं वय, त्यांची जाण लक्षात त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, पण झेपेल एवढं शास्त्रीय ज्ञान निःसंकोचपणे द्यायला हवे. ) एवढं शास्त्रीय ज्ञान निःसंकोचपणे त्यांना दिलं पाहिजे.

पौगंडावस्थेतील वयोगट १२ ते १८ :-
शालेय व विश्वविद्यालयापर्यंत शिक्षणक्रमात मानवी प्रजोत्पानाच्या अवयवांची रचना, कार्यपद्धती त्याचा अर्थ व उद्दिष्ट सांगितली पाहिजेत. गुप्तरोग, संभोग, जबाबदार लैंगिकत्व ह्याचं ज्ञान दिलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकही तयार करण्यची जरुरी आहे.

घरोघरी -
आईनं आपल्या मुलीला मासिक पाळी सुरू होण्याच्या सुमारास तिची मानसिक बैठक तयार करावयास हवी. शरीरात होणारे बदल, भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण, मासिक पाळी ह्याचे उद्देश व हे सर्व फरक कसे स्वागतार्ह आहेत ह्याची कल्पना दिली पाहिजे. मासिक पाळीच्या वेळची स्वच्छता, विश्रांती त्याबाबतचे गैरसमज नीट सांगितले पाहिजेत. संमिश्र समाजात वावरताना विशेषतः एकांताची स्थळे, होस्टेल्स, हॉटेल्स, शिबिरे व सहली अशा ठिकाणी मुलांच्या बरोबर जो आनंद मिळतो, सहवास घडतो त्या त्यावेळी आकर्षणाच्या, शरीरस्पर्श, सुखाच्या धुंद वातावरणात त्याच्या आनंदाला कुठं आवर घालावयास पाहिजे व तो का, हे सूचित करणं अवश्य आहे. लैंगिक संबंध व त्याचे परिणाम ह्यांची जाणीव निःसंकोचपणे दिली जाणे योग्यच ठरेल.

विवाहपूर्व अवांच्छित गर्भधारणेचा धोका कसां असतो व जिला अनियमित पाळी असते तिला कसा फसवतो, स्वतः मुलगी भीतीने पाळी चुकल्याचे कसे लपविते हे उघड स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आणि मुलींमध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण केला पाहिजे नाहीतर फार उशीर झाल्यावर मुली डॉक्टरांकडे आणण्यास येतात, आई म्हणते ‘मला कल्पनाच आली नाही’ आईवडिलांची एकमेकांतील आदरणीय प्रेमाची नाती, त्यांचे जबाबदार लैंगिक जीवन, दैनदिन जीवनातील त्यांच्या परस्परपूरक व्यक्तिगत उन्नतीला वाव देणाऱ्या भूमिका ह्या सर्वांचा परिणाम मुलाच्या मनावर सहजरीत्या होत असतो, हीच घरगुती संस्कृती त्यांच्या वैवाहिक जीवनाची उद्दिष्टं व मूल्य ठरवित असते. नुसत शालेय पुस्तकी लैंगिक शिक्षण त्याची गुणवत्ता वाढवू शकत नाहीतं.

नववधूला मातेने द्यावयाचे लैंगिक शिक्षण :-
वैवाहिक जीवनातील लैंगिक आनंद हा जसा शारीरिक आहे त्साच तो मानसिक व भावनिकही आहे. परस्परांच्या सहवासात एकमेकांना सर्वस्वी जाणून घेणं एकात्मता व समंजसपणा निर्माण करणं, शरीरांचा शोध घेताना लैंगिकसंबंध ही त्याची एक इष्ट आनंददायक परिणिती आहे. ह्याची माहिती आवश्य आहे. कुणाची एकाला इच्छा झाली, किंवा संबंध नकोसा वाटला, तर मुळातच त्याबद्दल सूचना देणं शहापणाचं कसं असत, त्यात स्त्रीत्वाला किंवा पुरुषार्थाला धक्का बसण्याचं कारण नाही, हे स्पष्ट केलं पाहिजे. दोघांच्याही स्वेच्छेनं दोघांच्याही आनंदासाठी कुठंलही दडपण न आणता जर लैंगिक संबंध झाला, तरच तो संभोग ठरतो, नाहीतर तो नुसताच भोगच असतो. तसच दोघांनाही एकचवेळी आणि दरवेळी आनंदाचा उच्चांक गाठला पाहिजे आणि त्या संभोगसुखाची तीव्रता प्रत्येक वेळी जाणवली पाहिके. ही भ्रामक कल्पना मोडली जाणे जरुरीच आहे. संभोगक्रिया कष्ट व दुःखप्रद होत असेल, तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करण्यास त्यांनी लाजू नये हे सुचविले पाहिजे, अनेक नवविवाहितांना पहिलीच गर्भधारणा नकोशी होते आणि ते गर्भपातासाठी डॉक्टरकडे येतात. अशा पहिल्याच खेपेला गर्भपातास कुणी डॉक्टर तयार होत नाहीत. पण असा प्रसंग येऊच नये. मनोवांच्छित गर्भधारणा व्हावयास हवी असेल, तर आपापसात मोकळेपणानं अगोदरच विवाहानंतर किती दिवसांनी ही जबाबदारी घ्यावयाची हे ठरवून संततीनियमनाचा सल्ला वेळीच घेणं हेच योग्य ठरेल, अशी चर्चा तुम्ही अगोदरच करा आणि सल्ला घ्या. हे आईनं मुलीला वेळीच सुचविणे महत्त्वाचं आहे. काहींना पहिल्याच आठवड्यात लैंगिक संबंधानंतर योनीस्त्राव योनीमुखावर खाज सुटणं, आग होणं, लघवीची आग होण सुरु होतं. अशावेळी निराश होऊन घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी परिणामकारक उपाययोजना असते.(मुलीच्य शरीरात बदल होत जात असताना आईनं तिला लैंगिक शिक्षन द्यायला हवं.)

विवाहितांच्या काही शंका-

मासिक पाळी आणि लैंगिक संबंध-
वैयक्तिक स्वच्छता, शारीरिक त्रास व मानसिक अस्वस्थता लक्षात घेऊन मासिक पाळी चालू असताना लैंगिक संबंध ठेवणं योग्य नाही.

गर्भवती स्त्री आणि लैंगिक संबंध-
गर्भवती स्त्रीला योनीस्त्रावांचा त्रास होत नसेल, तिची मानसिक अवस्था व शारीरिक प्रकृत्ती गर्भवाढीच्या दृष्टीनं उत्तम असेल व तिला गर्भपाताचा पूर्वतिहास नसेल, तर अशा स्त्रीनं पहिल्या चार पाच महिन्यांत दोघांच्याही आनंदासाठी संभोग करण्यास हरकत नाही.

बाळंतपणानंतर केव्हा संभोग करणे इष्ट ?
बाळंतपणानंतरच्या काही दिवसात अशक्तपणा, योनीमार्गातील स्त्राव, कंबर दुखणं सुरू असतं, म्हणून सर्वसाधारणपणे बाळंतपणा नंतर दोन ते तीन महिन्यांनी संततीप्रतिवेधक उपाययोजना करून संबंध सुरू करण्यास हरकत नाही. बाळंतपणानंतर जोपर्यंत मासिकपाळी सुरू होत नाही आणि जोपर्यंत बालकाचे स्तनपान चालू असतं तोपर्यंत लैंगिक संबंधातून गर्भधारणा होत नाही हा एक मोठा गैरसमज आहे.

उतारवय - म्हातारपण आणि लैंगिक संबंध -
म्हातारपणी लैंगिकसंबंध ठेवणं हे काहीतरी लज्जास्पद आणि गैर आहे असं मानणं चूक आणि अन्यायकारक आहे. पती-पत्नीची इच्छा आणि क्षमता असेल तर लैंगिक संबंध चालू ठेवणं योग्य आणि हितकारक आहे. शारीरिक व लैंगिक क्षमतेनुसार अशा संबंधाबद्दलच्या अपेक्षा आणि पद्धती बदलाव्या लागतील एवढचं.

लैंगिक संबंधाबद्दलची निरीच्छता -
काहींना अशा संबंधाबद्द्ल इच्छाच नसते किंवा घृणा असते, किंवा त्या व्यक्ती अशा व्यवहारात रमूच शकत नाहीत किंवा त्यांना त्या दुःखदायक असतात अशांनी तज्ज्ञांकडून वेळीच उपाययोजना करून घेणं आवश्यक आहे.

लैंगिक संबंधाचे प्रमाण-
हे वैयक्तिक क्षमतेवर व आनंद मानण्याच्या कल्पनेवर अवलंबून आहे. लैंगिक संबंधामुळे थकवा येऊन त्याचा दैनदिन जीवनावर विपरीत परिणाम होत नसेल व तो संबंध दोघांनाही आनंददायक होत असेल तर त्याला कुठलही प्रमाण किंवा माप लावणं योग्य ठरणार नाही.

लैंगिक भावनेला उत्तेजित करणारी व क्षमता वाढविणारी औषधे.-
अशा औषधांचा अजिबात उपयोग होत नाही, उलट त्यामुळे निराशा पदरी येऊन न्यूनगंड मात्र निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आधुनिक शास्त्रीय उपाययोजना विशेषतः मानसोपचाराच्या पद्धतीनं करणं हितकारक ठरेल.

संतती नियमनाची साधनं व लैंगिक संबंध-
कुठलीही योग्य अशी साधन वापरली, किंवा कुणाचीही नसबंदी, शस्त्रक्रिया झाली असली, तरी त्याचे कुठलेही वाईट परिणाम लैंगिक क्षमतेवर होत नाहीत. काहीजण मुठीत संभोग करून वीर्य पाडतात. काहीजण वीर्य योनीबाहेर पडू देतात. यात स्त्रीवर अन्यायच होतो. क्वचित प्रसंगी दोघांच्याही भावनेसाठी असा संबंध केला तर अपवाद म्हणूनच असावा. तो एक नित्याचा प्रकार असेल तर त्याचा स्त्रीच्या मनावर तसंच शारीरिक प्रकृतीवर वाईट परिणाम होत आणि काही वेळा योग साधला नाही, तर गर्भधारणेचाही धोका निर्माण होतो. योग साधण्यासाठी दोघांच्याही मनावर नेहमीच ताण पडतो. जरी कामजीवन हा मानवी जीवनातला एक अत्यंत आनंददायी व जीवनाला स्थीरता आणणारा महत्त्वपूर्ण घटक आहे, तरी ते जीवनाचे सर्वस्व नव्हे. लैंगिक शिक्षण, कुटुंब जीवन शिक्षण या अर्थानं ते शिकावलं, तर मानवाची गुणवत्ता वाढू शकेल आणि असं परिपूर्ण शिक्षण सुखाचा मूलमंत्र ठरू शकेल !

-  प्रबोधन टीम (संग्रहित लेखं)